प्रकरण ३ : शोध 17
उमेदवारांच्या नावे मी क्वचितच उल्लेख करीत असे. आम्ही उभे केलेले उमेदवार म्हणजे आमच्या ध्येयाचे निशाण धरणारे याहून काही अधिक अर्थ नाही असे मी सांगत असे. माझा प्रचार विचारात्मक असे, ध्येयाच्या भूमिकेवरून असे. मतदारांच्या मनोबुध्दीला मी जागृत करू बघत असे. ते हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याला व त्याकरता कराव्या लागणार्या संग्रामाला म्हणून मागत असे. मी इतर वचने देत नसे, फक्त स्वातंत्र्य मिळेपर्यंत आम्ही सारखे लढत राहू एवढे एकच अभिवचन मी देत असे. आमचे ध्येय, आमचा कार्यक्रम पसंत असेल, व त्याप्रमाणे वागण्याची तयारी असेल तरच मत द्या व त्याप्रमाणे आम्ही वागू ही खात्री ठेवा; काँग्रेसचे ध्येय, कार्यक्रम यांच्यावर श्रध्दा नसेल, या गोष्टी पटत नसतील तर मते देऊ नका असे मी स्पष्ट सांगत असे. आम्हांला खोटी मते किंवा उमेदवार व्यक्तिश: आवडतो म्हणून मते नको होती. मते व निवडणुकी यांचा पल्ला ध्येयाच्या लांबच्या प्रवासातल्या चार पावलांइतकाच होतो. मत देणे याचा अर्थ काय व त्यामुळे पुढचा ठरेल तो कार्यक्रम पार पाडण्याची जबाबदारी किती हे नीट समजावून घेतल्याशिवाय आम्हाला मते देणे म्हणजे आम्हाला फसवणे व देशाचा विश्वासघात करणे होय. आमच्या पक्षाचे उमेदवार चांगले व प्रामाणिक तर पाहिजेतच, पण उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वापेक्षा ध्येयाला, ते ध्येय असलेल्या संस्थेला व ती संस्था ज्याच्या स्वातंत्र्याकरता झटत होती त्या राष्ट्राला जास्त महत्त्व दिले पाहिजे. त्या स्वातंत्र्यातील अर्थ मतदारांना मी समजावून सांगत असे. गोरी नोकरशाही जाऊन तेथे काळी येणे म्हणजे स्वराज्य नव्हे; सत्ता लोकांच्या हाती येणे; ती सत्ता लोकांनी लोकांच्यासाठी चालविणे; दारिद्र्य, दैन्य, दु:ख, उपासमार नष्ट होणे म्हणजे स्वराज्य असे मी सांगत असे.
माझ्या भाषणांचा हा रोख असे. त्या निवडणुकीच्या दौर्यात अशा व्यक्तिनिरपेक्ष रीतीनेच मी समरस होऊ शकत होतो. हा उमेदवार यशस्वी होतो की नाही, त्या उमेदवाराचे काय हे विचार मला सतावीत नसत. त्याचे मला फारसे महत्त्व वाटत नसे. अमक्यातमक्याच्या निवडणुकीतील यशापेक्षा फार मोठा प्रश्न माझ्यासमोर असे आणि एखाद्या उमेदवाराच्या यशाच्या दृष्टीनेही अशा उच्च भूमिकेवरून प्रचार करणे हेच योग्य होते. कारण अशामुळे ती व्यक्ती व त्याची निवडणूक ही एकदम संकुचित वातावरणातून उच्च वातावरणात जात; दारिद्र्याचा सनातन शाप नष्ट करण्यासाठी धडपडणार्या कोट्यवधी लोकांशी त्या प्रश्नाचा संबंध येऊन जुळे; महान भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या भूमिकेवर ती व्यक्ती आणि त्याची निवडणूक येऊन पोचत. अनेक प्रमुख काँग्रेसकार्यकर्ते या अशा विचारांचा सर्वत्र तुफानी प्रचार करीत हिंडत होते; समुद्रावरून जोरदार स्वच्छ वारे यावेत आणि वातावरण निर्मळ व्हावे तसे देशात झाले; निवडणुकीतील इतरांचे क्षुद्र प्रचार क्षुद्र विचार, नाना नीच हिकमती व थोतांडे— या सर्वांचा धुव्वा उडाला. मी भारतीय जनतेला ओळखून होतो. तिच्यावर माझे प्रेम होते व त्याच्या लाखो डोळ्यांनी बहुजनसमाजाचे मानसशास्त्र मला शिकविले होते.
सकाळपासून रात्रीपर्यंत दररोज निवडणुकीसंबंधी मी सारखा बोलत होतो. परंतु या निवडणुकीत माझे लक्ष क्वचितच असे; निवडणुकीचा विचार मनात वरवर तरंगे. केवळ मतदारांकडे माझे चित्त लागलेले नव्हते. मतदारांची संख्या ज्याच्या पासंगालासुध्दा पुरणार नाही अशा एक विशाल वस्तूशी- भारतातील कोट्यवधी जनतेशी माझा निकट संबंध येऊ लागला होता व मला जो काही संदेश द्यावयाचा होता तो मतदार व शिवाय इतर प्रत्येक हिंदी स्त्री-पुरुष-मुलापावेतो पोचवावयाचा होता. मोजणे शक्य नाही इतक्या असंख्य व्यक्तींचा प्रत्यक्ष देहाने व भावनेने जो मला परिचय होत होता तो एक अपूर्व चित्तक्षोभाचा अनुभव होता व त्यात मी रंगून गेलो; परंतु गर्दीत सापडले म्हणजे आपण जनसंमर्दात आहो, गर्दीतल्या अनेकांपैकी एक आहोत, व बरोबरच्या लोकांची जी लहर लागेल तीच आपली अशी त्या गर्दीची छाप माझ्यावर पडत नसे. माझ्या डोळ्यांकडे त्यांचे डोळे लागत व आमची दृष्टिभेट झाली म्हणजे आम्हाला कोणी अनोळखी भेटले असे न वाटता सांगू म्हटले तरी भाषेतल्या शब्दांनी सांगता येणार नाही अशी काही अंतरीची खूण पटे. मी हात जोडून त्यांना नमस्कार करताच हजारो हात वर होत व मलाही नमस्कार करीत. त्यांच्या तोंडावर एक मित्र भेटल्याचा आनंद दिसे व त्या अफाट जनसंमर्दातून माझे शब्दांनी स्वागत करताना जो अस्पष्ट ध्वनी येई तो मला प्रेमाने मिठी मारतो आहे असे वाटे. मी भाषण करी व मला जे सांगायचे होते ते सांगे. पण माझे शब्द व त्यांचा अर्थ त्यांना कितपत कळेल याची मला शंका वाटे. परंतु शब्दापलीकडचा काही खोल अर्थ त्यांना पटल्याचा प्रकाश त्यांच्या डोळ्यांत मला दिसे.