प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 33
गटेची ही वृत्ती आपण ठेवली तर हा काल्पनिक इतिहास, सत्य घटना व कविकल्पनांची ही सारी सरमिसळ, प्रतीक म्हणून खरीच ठरते, व त्या प्रतीकावरून त्या युगातल्या लोकांच्या मनात कोणते विचार घोळत, त्यांच्या भावना व आकांक्षा काय होत्या ते आपल्याला कळते. शिवाय आणखी एका अर्थी हा इतिहास खरा ठरतो, कारण त्यातील घटनांमधूनच पुढचे विचार व कृती, म्हणजे पुढचा इतिहास निघाला. धर्म व तत्त्वज्ञान यांतील नैतिक विचार व कल्पनातरंगांचा प्रभावी परिणाम प्राचीन भारतीयांच्या इतिहासाच्या कल्पनेवरही झाला आहे. इतिहास ध्येये व विचार यांचे संकलन असेच त्यांना वाटे. केवळ जंत्रीवजा कथनाला घडलेल्या शेकडो गोष्टींचे वृत्तान्त नमूद करून ठेवण्याला त्यांनी फारच थोडे महत्त्व दिले. इतिहासकालात घडलेल्या घटना व केलेली कृत्ये यांचा मानवी वर्तनावर, मानवी जीवनावर काय परिणाम झाला, कोणता ठसा उमटला, कोणते वळण लागले, या गोष्टींकडे ते अधिक लक्ष देत, या गोष्टीला प्राधान्य देत. ग्रीक लोकांप्रमाणेच भारतीयही अतिकल्पनाशील आणि कलात्मक दृष्टीचे होते. गतकालीन घडामोडींच्या वर्णनात या कल्पनेला आणि कलात्मकतेला त्यांनी स्वच्छंद वाव दिला; कारण त्या घडामोडींतून भविष्यकालीन वागणुकीसाठी धडा घेणे, त्यातून काहीतरी तात्पर्य काढणे याच गोष्टीवर त्यांचा भर होता.
ग्रीक लोक तसेच चिनी व अरब लोक हे ज्या अर्थाने इतिहासकार होते त्या अर्थाने भारतीयांनी कधीही इतिहास लिहिला नाही. परंतु असे इतिहास त्यांनी ठेवले नाहीत यामुळे फार नुकसान झाले. यामुळे आपणास कालमर्यादा निश्चित करता येत नाही, तारखा ठरवता येत नाहीत; निरनिराळ्या घटना, घडामोडी एकमेकांत मिसळतात व सारा गोंधळ होऊन मागचे पुढे, पुढचे मागे असे होते. हिंदी इतिहास म्हणजे एक चक्रव्यूह भुलभुलावणी झाले आहे. त्यातून नक्की वाट शोधण्याकरता काही धागेधोरे हळूहळू संशोधकांच्या हाती फार कष्टाने लागत आहेत. कल्हण कवीची राजतरंगिणी म्हणजे बाराव्या शतकात लिहिलेला काश्मीरचा इतिहास, हाच फक्त इतिहासवजा ग्रंथ आहे. रामायण-महाभारत आणि असेच इतर समकालीन काही लेख, शिलालेख, नाणी, कलात्मक आणि शिल्पात्मक नमुने, संस्कृत साहित्य यातून जो काही बाकी तुंटपुजा इतिहास मिळेल तो गोळा करावा लागतो; तसेच ग्रीक व चिनी प्रवाशांनी प्रवासवृत्तांत लिहून ठेवले आहेत, आणि पुढे अरबी प्रवासीही आले होते. त्यांनीही लिहून ठेवलेल्या हकीकती आहेत, त्यांचाही फार उपयोग होतो.
त्या ऐतिहासिक दृष्टीच्या अभावामुळे सामान्य जनतेचे फारसे नुकसान झाले नाही. कारण इतर देशांतल्याप्रमाणे, किंबहुना त्यापेक्षाही अधिकच, हिंदी जनतेने भूतकालाच्या आपल्या इतिहासाचे चित्र घडवताना पिढ्यानपिढ्या तोंडातोंडी चालत आलेल्या गोष्टी, पुराणे, आख्यायिका, ही सामग्री वापरली. आख्यायिका व सत्यकथा यांतून बनलेला हा कल्पनारम्य इतिहास सार्या जनतेला सर्वत्र माहीत असे, आणि त्यामुळे त्यांना एक बळकट शाश्वत अशी सांस्कृतिक पार्श्वभूमीही प्राप्त झाली. परंतु इतिहासाकडे आपण दुर्लक्ष केले याचे दुष्ट परिणाम अद्यापही आपणास भोगावे लागत आहेत. कारण त्यामुळे डोळ्यांसमोर निश्चित असे काही येईना. एक प्रकारची कल्पनेत रमण्याची सवय झाली. भोवतालच्या प्रत्यक्ष जगाचा संबंध सुटला व भोळसटपणा आणि अंधश्रध्दा यांचे राज्य झाले. सत्यसंशोधनाच्या बाबतीत एक प्रकारची प्रखर दृष्टी असावी लागते. ती नाहीशी होऊन खरी घटना काय घडली ते पाहण्याच्या कामी बुध्दीला बुरशी चढली, मोघमपणा आला. तसे पाहिले तर इतिहासापेक्षा साहजिकच कितीतरी मोघम व अनिश्चित अशा तत्त्वज्ञानासारख्या क्लिष्ट विषयात हीच बुध्दी अगदी तल्लख होती. एखाद्या विचाराचा धागानधागा मोकळा करण्यात व या पसार्याचा समन्वय करण्यात ही बुध्दी सहज चाले, पुष्कळ प्रसंगी अगदी तर्ककर्कश बने व केव्हा केव्हा उघड अविश्वास दाखवी. परंतु प्रत्यक्ष घटना काय घडली या बाबतीत मात्र ही तर्कशुध्द विचारसरणी नव्हती. कदाचित याचे कारण हेही असेल की प्रत्यक्ष घटना म्हणून घटनेचे त्या बुध्दीला तितके महत्त्वच वाटत नसेल.