प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 10
एखाद्या दैवी किंवा श्रेष्ठ शक्तीचा नुसता संदेशवाहक होण्यापेक्षा मनुष्य स्वत:च्या आध्यात्मिकतेने, मनोबुध्दीने परमोच्च पदाला जाऊन पोचला आहे आणि मग इतरांनाही तो वर नेण्यासाठी प्रयत्न करीत आहे, हे दृश्य मला अधिक भव्य व उदात्त वाटते. काही धर्मसंस्थापक खरोखरच असामान्य विभूती होत्या, परंतु त्यांना मानव म्हणून मानायचे सोडताच त्यांची सारी दिव्यता व महत्ता माझ्या दृष्टीने नष्ट होते. मला मनुष्यजातीची थोरवी पटते. तिच्या भवितव्याची आशा वाटते, ती एखाद्या मानवाचा उपयोग नुसता संदेशवाहक झाला म्हणून नव्हे, तर मानवी मनाची, सत्वांशाची, चैतन्याची वाढ झालेली पाहूनच.
दंतकथांचाही याच प्रकारे माझ्यावर परिणाम होई. त्या त्या गोष्टी खरोखरच तंतोतंत तशाच घडल्या असे जर लोक मानीत असले तरी ते मला बुध्दीला न पटण्यासारखे हास्यास्पद वाटे. परंतु अशी अंधश्रध्दा सोडून पाहिले तर या पुराणातल्या कथांचा निराळाच प्रकाश दिसे. निराळेच सौंदर्य प्रतीत होई. अतिश्रीमंत अशा प्रतिभेचा हा आश्चर्यकारक मनोहर बहर आहे असे वाटे; आणि मनुष्याला उपयोगी असे कितीतरी धडे तेथे दिसत. ग्रीक देवदेवतांच्या कथांवर आजकाल कोणाचाही अंधविश्वास नाही आणि म्हणूनच प्रयत्न न करताच त्यातील सौंदर्य मनात भरते व मानसिक संस्कृतीच्या आपल्या संपत्तीत ही वडिलोपार्जित भर पडते. परंतु त्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवायचा म्हटले तर मनावर केवढा तरी बोजा होईल आणि अंधश्रध्देच्या या ओझ्याखाली त्यातले सौंदर्य दडपले जाऊन ते बहुधा आपल्या हाती लागणार नाही. आपली हिंदी पुराणे त्यापेक्षा कितीतरी संपन्न, विस्तृत, सौंदर्यमय व अर्थपूर्ण आहेत. मला राहूनराहून अचंबा वाटे की, ह्या लखलखीत स्वप्नसृष्टीला, ह्या नितांतरम्य कल्पनांना, ज्यांनी मूर्तस्वरूप दिले ती माणसे असतील कशा प्रकारची व त्यांनी कोणत्या प्रज्ञेच्या सोन्याच्या खाणीतून, कोणत्या प्रतिभेच्या मुशीतून ह्या मूर्ती घडवल्या !
धर्मग्रंथांकडे मानवनिर्मित या दृष्टीने पाहायचे ठरविणे, मानवी मनाचाच हा आविष्कार असे एकदा म्हटले म्हणजे मग कोणत्या काळात ते लिहिले गेले, कोणत्या परिस्थितीत, कोणत्या वैचारिक वातावरणात ते तयार झाले, आपल्यामध्ये व त्यांच्यामध्ये काळाचे, विचाराचे व अनुभवाचे किती मोठे अंतर आहे, हेही ध्यानात घेणे जरूर आहे. ज्या सामाजिक पार्श्वभूमीवर त्यांचा विकास झाला ती लक्षात घेणे जरूर आहे. मानवी जीवनाचे कितीतरी प्रश्न एक प्रकारे शाश्वत स्वरूपाचे आहेत. ते पूर्वी होते तसे आजही आहेत म्हणून ह्या प्राचीन ग्रंथांत लोकांचे मन पिढ्यानपिढ्या गुंतून गेले आहे. पण त्या काळापुरतेच महत्त्वाचे असेही काही प्रश्न त्या काळच्या जीवनात होते, त्यांचे आपल्याला आज काहीच वाटत नाही.