प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 29
देव, धर्म, तत्त्वज्ञान याविषयी पूर्वी सांगितले म्हणून ते प्रमाण मानण्याच्या वृत्तीविरुध्द खुद्द त्या प्रमाणवाक्यावर व असे सांगण्यातच हितसंबंध असलेल्या वर्गावर या जडवादी तत्त्वज्ञान्यांचा हल्ला होता. वेद, उपाध्यायवृत्ती व परंपरागत धर्मसमजुतींची ते उघडउघड निंदा करीत. त्यांचे म्हणणे असे की जे ज्याला पटेल ते त्याने मानायला मोकळीक पाहिजे, प्रमाणवाक्य म्हणून किंवा पूर्वजांनी सांगितले म्हणून ते खरे मानलेच पाहिजे असे नाही. मंत्रतंत्र व भोळ्या समजुतींच्या सर्व प्रकारांविरुध्द त्यांनी मनसोक्त तोंडसुख घेतले आहे. आधुनिक जडवाद्यांची दृष्टी व त्यांची सर्वसामान्य दृष्टी यांत पुष्कळ बाबतीत तुलना होण्यासारखी आहे. भूतकालाच्या बंधनकारक शृंखला तोडून जुन्या कल्पनांचे ओझे त्यांना फेकून द्यावयाचे होते. ज्या गोष्टी अदृश्य आहेत त्यांच्यासंबंधीची तर्कटे रचण्याला त्यांचा विरोध होता. काल्पनिक देवांची पूजा करीत बसणे त्यांना मूर्खपणा वाटे. ज्याची प्रत्यक्ष अनुभूती घेणे शक्य आहे तेवढेच काय ते खरे मानावे; त्याव्यतिरिक्त काही गृहीत धरून किंवा तर्क करून बसविलेला सिध्दांत खरा असण्याचा जितका संभव आहे, तितकाच खोटा असण्याचाही आहे. म्हणून खरे अस्तित्व जर कशाला असेल तर ते ह्या दृश्य जगाला; जड प्रकृती आणि तिची ही विविध रूपे आणि त्यांचे बनलेले हे दृश्य जग, हेच काय ते सत्य. दुसरा परलोक नाही, स्वर्ग-नरक नाहीत, शरीराहून निराळा आत्मा वगैरे काहीएक नाही. आपले मन, बुध्दी इत्यादी सारे प्रकार पंचमहाभूतांतून या मूलभूत जड प्रकृतीतून उत्क्रान्त झाले. हा सृष्टीचा पसारा व त्यातील घडणार्या घटनांवर मनुष्याच्या नैतिक मूल्यांचा काडीमात्र परिणाम होत नाही. सृष्टी चालली आहे, तुम्ही कशाला सत् म्हणता, असत् म्हणता याची दखल घ्यायला हा निसर्ग क्षणभरही थांबत नाही. नैतिक नियमांना मनुष्यांनी निर्माण केलेल्या सामाजिक रूढी केवळ सामाजिक संकेत यापलीकडे अर्थ नाही हे सारे विचार अगदी आपल्या ओळखीचे वाटतात. दोन हजार वर्षांपूर्वीचे नसून जसे काय चालू काळातले दिसतात. हे विचार, या शंका, हे संघर्ष परंपरागत शास्त्रप्रमाणाविरुध्द हे बुध्दीचे बंड, याचा उदय कसा झाला ? कारण काय ? तत्कालीन सामाजिक व राजकीय परिस्थितीची आपणांस नीटशी कल्पना आज नाही; परंतु राजकीय संघर्षाचा, सामाजिक प्रक्षोभांचा तो काल असावा हे निश्चित. त्यामुळे श्रध्देचा भंग झाला, नवीन बौध्दिक चिकित्सा प्रखरपणे सुरू झाली. मनाला समाधान देणारा निराळा मार्ग शोधण्याची खटपट सुरू झाली. या मानसिक प्रक्षोभातून आणि गोंधळातून व सामाजिक अव्यवस्थेतून नवीन पंथ आले आणि नवीन दर्शने जन्मली. उपनिषदांतील तत्त्वज्ञान हे अंत:प्रेरणेवर, आंतरिक अनुभूतीवर, साक्षात्कारावर उभारलेले होते. ती पध्दती आता गेली. आता तर्कशुध्द बुध्दिवादावर मंडनखंडन, पूर्वपक्ष उत्तरपक्षावर आधारलेले तत्त्वज्ञान निर्माण करण्याचे नाना प्रयत्न, नाना रूपांनी सुरू झाले. जैन, बुध्द आणि (दुसरा चांगला शब्द वापरायला नाही म्हणून हिंदू हाच शब्द वापरतो) हिंदू तत्त्वज्ञाने या पध्दतीनें मांडण्यात येऊ लागली. याच काळात रामायण, महाभारत, भगवद्गीता यांची रचना झाली. नाना मते आणि नाना दर्शने ही एकमेकांवर सारखी क्रियाप्रतिक्रिया करीत होती, त्यामुळे कोणता विचार, कोणते तत्त्वज्ञान आधीचे, कोणते मागूनचे हे सांगणे, या युगाची बिनचूक कालगणना करणे, क्रमवारी लावणे, पौर्वापर्य ठरविणे कठीण आहे. ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात बुध्द झाले. यांपैकी काही घटना त्यांच्या जन्माआधीच्या होत्या, आणि काही नंतरच्या होत्या व काही एकाच वेळी घडत, वाढत होत्या.
बौध्द धर्माच्या उदयाच्या वेळेला इराणी साम्राज्य सिंधू नदीला येऊन भिडले होते. हिंदुस्थानच्या सीमेला एका बलाढ्य परकी राजसत्तेने येऊन भिडणे, या गोष्टीचा लोकांच्या विचारावर फारच मोठा परिणाम झाला असला पाहिजे. ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकातच अलेक्झांडरची हिंदुस्थानच्या वायव्य भागावर क्षणजीवी स्वारी झाली. त्या स्वारीला फारसे महत्त्व नाही. परंतु पुढे हिंदुस्थानात जी अनेक दूरगामी स्थित्यंतरे झाली त्यांची ही आगामी सूचना होती. अलेक्झांडर तिकडे मरतो न मरतो इतक्यातच इकडे चंद्रगुप्ताने प्रयंड मौर्य साम्राज्य उभारले. ऐतिहासिक असे हिंदुस्थानातील हे पहिले विशाल, सामार्थ्यशाली, सर्वसत्ता मध्यवर्ती असणारे साम्राज्य होते. हिंदुस्थानात पूर्वी असे अनेक राजेमहाराजे होऊन गेले, चक्रवर्ती सम्राट झाले, असे परंपरेवरून दिसते. एका राजाने हिंदुस्थानची सार्वभौमसत्ता हाती यावी म्हणून कशा लढाया केल्या त्याची हकीगत एका महाकाव्यात आहे. त्या काळात हिंदुस्थान म्हणजे उत्तर हिंदुस्थान असाच अर्थ असे. परंतु एकंदरीत प्राचीन हिंदुस्थान प्राचीन ग्रीस देशाप्रमाणेच लहान लहान राज्यांचा एक समूह असाच होता. काही जातिजमातींची मोठमोठ्या प्रदेशांवर लोकसत्ताक राज्ये होती; काही ठिकाणी छोटे छोटे राजे होते, आणि ग्रीस देशातल्याप्रमाणे काही नगरराज्येही होती, तेथे मातब्बर व्यापारी संघ असत. बौध्दांच्या काळात अनेक संघराज्ये जातिजमातींची लोकशाही राज्ये होती. आणि मध्य व उत्तर हिंदुस्थानात चार मुख्य राज्ये होती. गांधार म्हणजे अफगाणिस्तान, याचा समावेश त्या वेळेस हिंदुस्थानातच होत असे. संघटनेचे शासनसंस्थेचे स्वरूप कोणतेही असो, प्रत्येक नगराची किंवा ग्रामाची स्वायत्तता, स्वत:पुरते स्वातंत्र्य असावयाचे अशी परंपरा फार बळकट होती, आणि एखाद्याची सार्वभौम अधिसत्ता मान्य केली तरी त्या सत्तेची त्या माण्डलिक राज्यातील कारभारात कधी लुडबूड नसे. एक प्रकारची प्राथमिक अवस्थेतील लोकशाही होती असे म्हणाना, परंतु ही लोकशाही ग्रीस देशातल्याप्रमाणे वरिष्ठ वर्गापुरतीच असे.