प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 76
एकीकडे पूर्वेला ही अशी वाढ लोकसंख्येत चालली आहे, तर पश्चिम युरोपात घटत चाललेल्या जननप्रमाणाचा प्रश्न अधिकाधिक महत्त्वाचा होत चालला आहे. चीन, हिंदुस्थान, जावा व रशियन राज्यसंघातले देश हे ठळक अपवाद सोडून, अन्यत्र जगभरच ही जननप्रमाणातील घट पसरली आहे, बहुतेक सार्या देशांना तिची बाधा झाली आहे. औद्योगिक प्रगतीत पुढारलेल्या देशांतून ती विशेषच आढळते. फ्रान्सच्या लोकसंख्येची वाढ पुष्कळ वर्षापूर्वीपासूनच थांबली आहे, आणि आता तेथील लोकसंख्या हळूहळू घटते आहे. इंग्लंडमध्ये गेल्या शतकात इ.स. १८८० ते १८९० या कालापासून जननक्षमतेचे प्रमाण सारखे हळूहळू घटत चालल्याचे आढळते, आणि हल्ली तर ते प्रमाण फ्रान्स सोडून युरोपातील बाकी सार्या देशांच्या मानाने सर्वांत कमी आहे. हिटलर व मुसोलिनी यांनी जर्मनी व इटलीत जननप्रमाणे वाढविण्याकरिता केलेल्या उपायांचा परिणाम तात्पुरता काय झाला तेवढाच. उत्तर, पश्चिम व मध्ययुरोपात, दक्षिण व पूर्व युरोपपेक्षा (रशियन सोव्हिएट प्रदेश या हिशेबात न धरता) ही जननसंख्येची घट अधिक स्पष्ट आढळते, पण एकंदर ह्या सार्याच प्रदेशात जननसंख्या घटण्याकडेच प्रवृत्ती आढळते. रशिया वगळून बाकीचे सबंध युरोप घेतले तर तेथील लोकसंख्येचा आकडा आतापर्यंतचा अधिकात अधिक, हल्लीचे तपमान पाहता सन १९५५ ला होतो, आणि त्यानंतर तो घटत जाण्याचे लक्षण दिसते. ह्या हिशेबात युध्दामुळे झालेली हानी विचारात घेतलेली नाही, ती घेतली तर ही लोकसंख्या घटत जाण्याची प्रवृत्ती अधिक तीव्र ठरेल.
याच्या उलट, सोव्हिएट युनियनमधील लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे, ती इ.स. १९७० च्या सुमारास पंचवीस कोटींच्या वरपर्यंत पोचण्याचा संभव दिसतो. या युध्दामुळे सोव्हिएट युनियनला जो अधिक प्रदेश कदाचित मिळेल तेथील लोकसंख्या यात धरलेली नाही. ही लोकसंख्येची वाढ व कला, विज्ञान व इतर शास्त्रीय ज्ञानात झालेली प्रगती यामुळे सोव्हिएट युनियन आशिया व युरोप या दोन्ही खंडांत सत्ता चालविणारे एक बलाढ्य राज्य होणे क्रमप्राप्तच आहे. चीन व हिंदुस्थान या देशांतून औद्योगिक वाढ जी काय होईल तिच्यावर आशियातील परिस्थिती अवलंबून राहील. ह्या दोन देशांतील प्रचंड लोकसंख्येची त्यांच्याकडून शक्य तितके अर्थोत्पादन होईल व त्यांच्यात कार्यक्षमता येईल अशी व्यवस्था लागली नाही, तर ही अजस्त्र लोकसंख्या म्हणजे त्यांना एक ओझे आहे, तिच्यामुळेच ते दुर्बल आहेत. युरोपातील राष्ट्रे पाहिली तर गतकाळी दूरवर आक्रमण करून वसाहती राज्ये ज्यांनी मिळविली त्यांना आता नव्याने आक्रमण करण्याची, आपला राज्यविस्तार वाढविण्याची स्थिती राहिलेली नाही असे निश्चित दिसते. त्यांच्या राजकीय व आर्थिक कार्यक्षम व्यवस्थेमुळे त्यांना जगाच्या कारभारात यापुढेही महत्त्व राहणे शक्य आहे, पण यापुढे त्यांनी संघ करून कार्य चालविले तर वेगळे, नाहीतर यापुढे बलाढ्य राष्ट्रांत त्यांची गणना होणे उत्तरोत्तर कमी होत जाणार. ''वायव्य व मध्ययुरोपातील कोणतेही राष्ट्र यापुढे जगाला युध्दाचे आव्हान देईल असे दिसत नाही. आपली प्रगती अधिकाधिक त्वरेने करीत चाललेल्या देशोदेशींच्या लोकांत कलाविज्ञानातील सुधारणांचा प्रसार होत चालल्यामुळे, जर्मनीच्या शेजारच्या राष्ट्राप्रमाणेच जर्मनीचेही जगातले एक सत्ताधारी बलाढ्य राष्ट्र होण्याचे दिवस निघून गेले आहेत.''*
---------------------------
* अमेरिकेतील 'फॉरिन अफेअर्स' चा एप्रिल १९४४ चा अंक—यातील फ्रँक डब्ल्यू. नोटस्टाईन यांचा लेख आय.एल.ओ. या संस्थेने 'युरोपातील लोकवस्तीची स्थानांतरे' या विषयावर ई. एम्. कुलिशर यांनी लिहिलेला एक अभ्यासपूर्ण लेख (१९४३) प्रसिध्द केला आहे.
यंत्रकलाविज्ञानात झालेली प्रगती व औद्योगिक प्रगती यामुळे पश्चिमेकडील अनेक देशांचे सामर्थ्य वाढले, तेथील लोकांच्या हाती सत्ता आली, सत्तेची ही साधने काही थोड्याशा राष्ट्रांच्याच हातात राहतील असा संभव फार थोडा आहे. अशी वस्तुस्थिती आहे, तेव्हा युरोपची जगाच्या इतर भागांवर असलेले आर्थिक व राजकीय वर्चस्व उत्तरोत्तर कमी होत जाणार व युरोप आणि आशिया एकत्र विचारात घेतली तर जे युरेशियाखंड होते त्यातील व आफ्रिका खंडातील सर्व घडामोडींना चालना देणारे सर्वशक्तिमान केंद्र म्हणून हल्ली युरोपकडे असलेला अधिकार नाहीसा होणार हे निश्चित. ह्या मूलगामी महत्त्वाच्या कारणामुळे आतापर्यंतच्या सत्ताधारी बलाढ्य युरोपियन राष्ट्रांना शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्याचे विचार अधिकाधिक सुचत जातील, युध्दाचा प्रसंग होता होईल तो टाळण्याची त्यांची प्रवृत्ती राहील. आक्रमण करायला निघाले तर आपल्यावरच विनाशाची संक्रांत येण्याचा संभव, अशी अवस्था असली म्हणजे आक्रमण करण्याची हौस जागच्या जागी जिरून जाते. पण हल्ली जगातच्या ज्या बलाढ्य राष्ट्रांकडे सत्ता आहे त्यांना इतरांशी सहकार्याने वागण्याची तितकीशी ऊर्मी आलेली नाही. तसले काही विचार त्यांच्या मनात आलेच तर ते न्यायनीती म्हणूनच यावयाचे, पण सत्तेची संगत न्यायनीतीशी सहसा आढळत नाही.