प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 31
हिटलर सत्तारूढ झाल्यापासूनच्या नाझी प्रचारतंत्राचा मी सूक्ष्म अभ्यास केला आहे. हिंदुस्थानात तसेच काही होत आहे हे पाहून मला आश्चर्य वाटले. १९३८ मध्ये जेव्हा चेकोस्लावेकियाला सुडेटनलँडच्या आणीबाणीच्या प्रसंगाला तोंड देण्याची पाळी आली, तेव्हा येथे उपयोगात आणलेल्या नाझी प्रचारतंत्राचा मुस्लिम लीगच्या पुढार्यांनी अभ्यास करून त्याला त्यांनी पसंती दर्शविली होती. सुडेटनलँडमधील जर्मनांची आणि हिंदी मुसलमानांची एकच स्थिती आहे असे सांगण्यात आले. दोहोंची तुलना करून दाखविण्यात आली. वर्तमानपत्रांतून आणि व्यासपीठावरून अत्याचारप्रवर्तक आणि चिथावणी देणारी लिखाणे आणि भाषणे बाहेर पडू लागली. राष्ट्रसभेच्या एका मुस्लिम मंत्र्याला भोसकण्यात आले. परंतु एकाही मुस्लिम लीगच्या पुढार्याने याविषयी निषेध दर्शविला नाही, या गोष्टीचा धिक्कार केला नाही. निषेध दूरचा राहिला. जणू काही झालेच नाही असे दर्शविण्यात आले. अत्याचाराची नानाविध प्रदर्शने वरचेवर दिसून येऊ लागली.
या घडामोडींनी मी अती रंजीस आलो. सार्वजनिक आणि नागरिक जीवनातील या अध:पाताने मी विषण्ण झालो, उदासीन झालो. अत्याचार, शिवराळपणा, बेजबाबदारपणा वाढतच राहिला. मुस्लिम लीगच्या जबाबदार पुढार्यांची यासर्व गोष्टींना पसंती होती असेही दिसू लागले. या वृत्तीला कृपा करून आळा घाला असे मी अनेक मुस्लिम लीगच्या पुढार्यांना लिहिले, परंतु काही उपयोग झाला नाही. राष्ट्रसभेच्या सरकारांना सर्व अल्पसंख्याकांना आपलेसे करून घ्यावयाचे असल्यामुळे, त्यांनी तशा प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मुसलमानधार्जिणेपणाचे आरोपही त्यांच्यावर करण्यात आले. इतकी उदारता राष्ट्रसभेचे मंत्री दाखवीत होते. इतरांच्या हिताचा बळी देऊन तुम्ही मुसलमानांचे अधिक पाहात अशा तक्रारी होऊ लागल्या तरीही मुस्लिम लीगचा प्रचार सुरूच. अमुक एक अन्यास दूर करा, अमक्या गोष्टीचा समजुतदारपणे विचार करा, अशी मागणी वगैरे काही नाही. मुस्लिम लीगवाल्यांचा आणि त्यांच्याशी सहानुभूती दाखविणार्यांचा एकच हेतू होता की, काही तरी भयंकर हात आहे असे मुसलमान जनतेला वाटावे, ''मोठे अरिष्ट येत आहे आणि राष्ट्रसभेची ही सारी कारवाई आहे'', असे मुसलमानांच्या मनावर सतत प्रचाराने ठसविणे हे ध्येय होते. कोणते भयंकर अरिष्ट कोसळणार होते ते कोणालाच कळत नव्हते. परंतु इतका शिवराळपणा ज्या अर्थी होत आहे, राष्ट्रसभेला इतके शिव्याशाप देण्यात येत आहेत, सारखी आरडाओरड होत आहे, त्याअर्थी काहीतरी कोठेतरी घडत असले पाहिजे असे मुसलमानांस वाटे. पोटनिवडणुकीत ''इस्लाम धोक्यात आहे'' अशा गर्जना होऊ लागल्या. कुराण हातात देऊन मुस्लिम लीगच्याच उमेदवाराला मत देईन अशा मतदारांना शपथा घ्यायला लावीत.
या सर्व प्रचाराचा मुस्लिम बहुजनसमाजावर नि:संशय अपार परिणाम झाला. असे असूनही अनेकांनी या प्रचाराचा प्रतिकार केला; मुस्लिम लीगलाही विरोध केला ही गोष्ट आश्चर्यकारक आहे. पोटनिवडणुकी बहुतेक मुस्लिम लीगने जिंकल्या; काही गमावल्या. मुस्लिम लीगच्या उमेदवारास यश मिळाले असले तरी प्रतिस्पधी उमेदवारासही चांगलीच मते पडलेली दिसून येत. ही मते कोण देई ? राष्ट्रसभेच्या शेतकर्यांसंबंधीच्या कार्यक्रमामुळे ही मते मिळत. परंतु इतिहासात प्रथमच मुस्लिम लीगला बहुजनसमाजाचा पाठिंबा मिळाला आणि बहुजनसमाजाची संस्था या दृष्टीने तिची संघटना होऊ लागली. जे काही घडत होते त्याचे मला वाईट वाटत असूनही, एका अर्थी नवीन घटनांचे मी स्वागतही करीत होतो. आशा वाटे की, यातून अखेरीस सरंजामशाही नेतृत्व झुगारले जाऊन अधिक पुरोगामी असे जनतेचे नेतृत्व पुढे येईल. खरी अडचण आतापर्यंत एकच होती की, मुसलमान समाज राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या फार मागासलेला होता आणि त्यामुळे प्रतिगामी पुढारी त्यांच्या त्या स्थितीचा फायदा घेत.