प्रकरण ५ : युगायुगांतून 80
निर्वाणातून (शून्यातून) विद्युत्-यंत्रे निर्माण करण्याप्रमाणे हे आहे मानवी बुध्दी आणि शक्ती यांचा पाय पुढे पडण्याचे कामी गणितशास्त्रातील कोणत्याही शोधाने जर अपार प्रेरणा दिली असेल तर ती ह्या शून्याच्या शोधाने होय.*
दुसर्याही एका अर्वाचीन गणितज्ञाने शून्याच्या या ऐतिहासिक महत्त्वाच्या शोधाविषयी उत्साहाने लिहिले आहे. या गणितज्ञाचे नाव डँझिंग. तो आपल्या 'नंबर' या पुस्तकात लिहितो, ''पाच हजार वर्षांच्या या प्रदीर्घ काळात नाना संस्कृती उदयाला आल्या व वाङ्मय, कला, तत्त्वज्ञान, धर्म इत्यादींचे धन मागे ठेवून त्या अस्त पावल्या. परंतु मनुष्याने सराव ठेवलेली सर्वांत जुनी कला म्हणजे मोजण्याची. त्या क्षेत्रात एकंदरीत मानव जातीची एकूण कितीशी प्रगती झाली होती ? वेडीवाकडी एक मोजण्याची पध्दती होती तिच्यामुळे पाऊल पुढे पडणे केवळ अशक्य होते; तसेच गोट्यांच्या चौकटीसारखी मोजण्याची एक युक्ती शोधून काढण्यात आली होती; परंतु तिची कार्यक्षमता इतकी मर्यादित होती की, साध्या बेरजा-वजाबाकीसाठीही तज्ज्ञ माणसाला बोलवावे लागे...हजारो वर्षे मनुष्य हे ओबडधोबड गणनाप्रकार वापरीत होता. त्या गणनायंत्रात त्याने फारशी कधी सुधारणा केली नाही, किंवा त्या पध्दतीत एखाद्या क्रांतिकारक विचाराची भर घातली नाही... अज्ञानयुगात कल्पनांची वाढ फारच मंदगतीने होई. परंतु त्या मंदगतीशी तुलना करता गणितशास्त्रातील ही गती फारच निराशाजनक आणि गतिहीन वाटते आणि अशा संदर्भात पाहिले म्हणजे त्या अज्ञात हिंदू संशोधकाचे खरे महत्त्व लक्षात येईल. ख्रिस्त शकाच्या आरंभीच्या काळात केव्हातरी त्या अज्ञान शोधकाने अंकाचे स्थानमूल्य ठरविणारा शोध लाविला; तो शोध म्हणजे जगातील एक अत्यंत महत्त्वाची अशी घटना होती.'' **
ग्रीस देशातील गणितज्ञांना हा शोध कसा लागला नाही याचे डॅन्झिगला आश्चर्य वाटते. तो म्हणतो, ''विज्ञानाचा, शास्त्राचा व्यवहारात उपयोग करण्याविषयी ग्रीकांना इतका तिरस्कार वाटे की काय, की आपल्या मुलांना शिकविण्याचे कामही ते गुलामांकडे सोपवीत. परंतु तसे असेल तर ज्यांनी भूमितीचे प्रगतिपर शास्त्र आम्हांला दिले, त्यांना प्राथमिक तर्हेचे का होईना बीजगणित का देता आले नाही ? बीजगणित म्हणजे
---------------------------
* जी. बी. हॉल्स्टेड् 'अंकगणिताचा पाया आणि तंत्र' 'On the Foundation & Technique of Arithmetic' पृष्ठ २० (शिकागो, १९१२) हा उतारा १९३५ मधील बी. दत्त आणि ए. एन्. सिंग यांच्या 'हिंदू गणिताचा इतिहास' या पुस्तकातून घेतला आहे.
** हॉग्बेनच्या 'लाखोंसाठी गणित' या पुस्तकातून घेतलेला उतारा. (लंडन, १९४२)
आजच्या गणिताचा प्राण; परंतु हे शास्त्रही हिन्दुस्थानात जन्मावे आणि तेही ज्या काळात अंकांच्या स्थानमूल्याचा शोध लागला, त्याच वेळेला, हे आश्चर्य नव्हे काय ?