प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 43
तात्पर्य असे की हिंदुस्थानने आपली धर्मावरची सांप्रदायिक निष्ठा थोडी आवरती घेऊन विज्ञानशास्त्राकडे लक्ष दिले पाहिजे. विचारक्षेत्रात व सामाजिक रीतीत अमुक निषिध्द, तमुक निषिध्द असे होता होता एकलकोंडेपणा वाढून सार्या देशभर बंदिवासात असल्यासारखे झाले आहे, मनोवृत्ती कोती बनून देशाची वाढ थांबली आहे. विशेष विधिप्रसंगी शूचिर्भूतपणा पाळावा ह्या कल्पनेपायी, एकमेकाकडे येऊन जाऊन, खाऊन पिऊन, मिळून मिसळून वागण्यात निर्बंध आले आहेत व सर्वांनी एकत्र येऊन करावे अशा कार्याचे क्षेत्र संकुचित झाले आहे. एखाद्या सनातनी कर्मठ हिंदूंचा दैनंदिन धर्म पाहिला तर त्यात अध्यात्मदृष्ट्या कशाचे महत्त्व काय यापेक्षा काय खावे, काय खाऊ नये, कोणाच्या पंक्तीत बसून जेवावे, कोणापासून दूर राहावे याचाच विचार विशेष. त्याच्या सामाजिक जीवनात त्याच्या ह्या पाकशालेतल्या नियम-निर्बंधांचाच अम्मल चालतो. सुदैवाने मुसलमानांच्या मागे या भक्ष्याभक्ष्याच्या व शिवाशिवीच्या निर्बंधांची भुणभूण कमी, पण त्याच्याही मागे खास त्यांच्याचकरिता सांगितलेले स्वतंत्र वेगळे निर्बंध व विधी आहेतच, आणि त्यांच्या इस्लाम धर्माने शिकवलेले बंधुभावाचे धडे तो विसरला तरी 'जो पीछेसे आयी वो आगे चली' अशी आपली रोजची वहिवाट तो मोठ्या कसोशीने पाळीत असतो. त्याचे जीवनहेतू, जीवनाविषयी त्याची दृष्टी, त्या हिंदूपेक्षाही कदाचित अधिकच संकुचित, अधिकच निष्फळ म्हणता येतील. वस्तुत: आजचा कोणताही सर्वसाधारण हिंदू पाहिला तर विचारस्वातंत्र्याची त्याची परंपरा व त्याच्या जीवनचित्राचे रंग खुलविणारी पार्श्वभूमी या दोन्हीलाही तो अंतरल्यामुळे त्याला हिंदुत्वाचा प्रतिनिधी कितपत म्हणता येईल हा प्रश्नच आहे, पण तरीसुध्दा तुलना करू गेले तर ही हिंदू व मुसलमानांची आजची परिस्थिती आढळते.
हिंदू लोकांतील या व्यावर्तक, दुसर्याला आपल्याला न घेण्याच्या प्रवृत्तीचे प्रतीक, तिचा साक्षात अवतार म्हणजे हिंदूचे चातुरर्वर्ण्य. केव्हा केव्हा असे प्रतिपादन केले जाते की, चातुरर्वर्ण्याची मूळची कल्पना चालू ठेवायला प्रत्यवाय नको. त्या कल्पनेची जी पुढे वाढ झाली आहे, तिला जे अनेक फाटे फुटून घोटाळे उत्पन्न झाले आहेत ते मात्र काढून टाकले पाहिजेत, व वर्णव्यवस्था जन्मजात न ठेवता ती गुणावर अवलंबून ठेवली पाहिजे. हा दृष्टीकोण अप्रस्तुत आहे, त्यामुळे वाद भलतीकडेच वाहवतो. इतिहासातील एक विषय या दृष्टिने जातिसंस्थेची वाढ कशी होत गेली याच्या अभ्यासाला काही महत्त्व आहे, पण या जातिसंस्थेला, या वर्णव्यवस्थेला ज्या काळात आरंभ झाला त्या काळाकडे परत जाणे, ती परिस्थिती आजच्या काळात आणणे आपल्याला शक्य नाही हे उघड दिसते. आजच्या समाजव्यवस्थेत चातुरर्वर्ण्याला स्थान उरलेले नाही. गुणावरून जात ठरवावयाची व सर्वांना समान संधी द्यावयाची असे म्हटले तर जात ओळखण्याची आज जी काही लक्षणे ठरली आहेत ती नाहीशी होणार व त्याचा अर्थ हल्लीची जातिसंस्थाच नाहीशी होणार. जातिसंस्थेमुळे पूर्वीच्या काळात काही काही इतरांकडून खाली दडपले गेले इतकेच नव्हे तर केवळ सिध्दान्तरूप पांडित्यप्रचुर विद्येचा व प्रत्यक्षातल्या हस्तव्यवसायाचा संबंध तुटला व तत्त्वज्ञानाचा रोख प्रत्यक्ष जीवन व त्या जीवनात उद्भवणारे प्रश्न यांच्यावर न राहता तत्त्वज्ञानाची जीवनाकडे पाठ फिरली. ही समाजव्यवस्थेची दृष्टी केवळ परंपरेला महत्त्व द्यावयाचे या तत्त्वाच्या आधाराने उच्चनीच असा भेद ठरविणारी होती. ही दृष्टी आता पार पालटली पाहिजे, कारण ती आधुनिक परिस्थितीच्या व लोकशाहीच्या ध्येयाच्या अगदी उलट आहे. हिंदुस्थानातील लोकांचे जे वेगवेगळे पोटविभाग आहेत त्यांनी वेगवेगळी ठराविक कामे करावयाची अशी व्यवस्था कदाचित यापुढेही चालू राहील. पण आधुनिक यांत्रिक उत्पादनाच्या रीतीत फरक होत जाऊन कामाचे नवेनवे प्रकार निघून काही जुने प्रकार पार बंद होतील त्या मानाने ह्या व्यवस्थेतही मोठे स्थित्यंतर होत जाईल. कामाच्या प्रकारावरून समाजाची वर्गव्यवस्था करण्याची प्रवृत्ती आजकाल सर्वत्र दिसते आहे. समाजात वर्गव्यवस्था करण्याची प्रवृत्ती आजकाल सर्वत्र दिसते आहे. समाजात कोणी काहीही काम करीत असो, त्याच्या सामाजिक अधिकाराशी त्या कामाचा संबंध नाही, त्याचे सामाजिक अधिकार, समाजात त्याचे स्थान कार्यनिरपेक्ष आहे, ही कल्पना जाऊन कार्यपरत्वे अधिकार मानण्याची प्रथा पडत चालली आहे. हे प्राचीन भारतीय ध्येयाला अनुसरूनच आहे.
हल्लीची युगप्रवृत्ती समानतेचे तत्त्व मान्य करण्याकडे आहे, पण प्रत्यक्ष आचरणात ते जवळजवळ सर्वत्र अमान्य दिसते. गुलामगिरी या शब्दाचा अर्थ, शेती, गुरेढोरे यांच्यावर जशी एखाद्याची मालकी असावी तशी एका माणसाची दुसर्या माणसावर मालकी असणे एवढाच संकुचित घेतला तर त्या अर्थाने आजच्या जगाने गुलामगिरी नष्ट केली आहे. पण काही बाबतीत जुन्यापेक्षाही वाईट अशी एक नवीन गुलामगिरी सार्या जगभर प्रस्थापित झाली आहे. जगात ज्या वेगवेगळ्या राजकीय व आर्थिक समाजव्यवस्था आहेत त्यांत व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावावर मानवी प्राणी अन्याय्य रीतीने राबविले जात आहेत, लुबाडले जात आहेत, देवाण-घेवाण करायच्या मालाच्या किंमतीने वागवले जात आहेत. शिवाय, कोणा एका व्यक्तीला आपल्या मालकीची वस्तू समजून दुसर्या व्यक्तीने वागविणे आजच्या जगाला अमान्य असले तरी कोणा एखाद्या देशाला किंवा राष्ट्राला आपल्या मालकीची वस्तू समजून दुसर्या राष्ट्राने वागविले तर ते मात्र जगाला अमान्य नाही, आणि अशा रीतीने वैयक्तिक गुलामगिरीच्या ऐवजी सामुदायिक गुलामगिरी केलेली जगाला चालते. वंशभेद मानणे हेही ह्या आधुनिक युगाचे भूषणभूत वैशिष्ट्य झाले आहे आणि आजच्या जगात इतर राष्ट्रांवर धनीपणा गाजविण्याचा हक्क सांगणारी राष्ट्रेच नव्हे, तर इतर मानववंशांवर आपल्या वंशाचा, वंशश्रेष्ठत्वाचा, अधिकार सांगणारे मानववंशही उपस्थित आहेत.