प्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 17
भूतकाळाचे ओझे
तुरुंगातील २१ वा महिना जवळ जवळ संपत आला. चंद्राची क्षयवृध्दी चालली आहे. लौकरच दोन वर्षे पुरी होतील. माझा पुन्हा तुरुंगातील वाढदिवस येईल आणि मी वृध्द होत चाललो आहे याची मला आठवण देईल. गेले चार वाढदिवस तुरुंगातच गेले, येथे व डेहराडूनच्या तुरुंगात. मागील अनेक तुरुंगयात्रांत असे अनेक वाढदिवस गेले. त्यांची आठवणही आता मला नाही; त्यांची संख्या मी विसरून गेलो.
हे जे गेले एकवीस महिने गेले, त्या काळात सारखे मनात येई की काहीतरी लिहावे. आतून प्रेरणाही होई, परंतु त्याच वेळेस आतून नाखुषीही असे. माझ्या पूर्वीच्या तुरुंगवासातून मी ज्याप्रमाणे एखादे नवीन पुस्तक घेऊन बाहेर आलो त्याचप्रमाणे याही वेळेस एखादे नवे पुस्तक लिहून बाहेर आणीन ही गोष्ट माझे मित्र धरून चालले आहेत. ती एक सवयीची गोष्ट होऊन बसली आहे.
असे असूनही मी लिहिले नाही. ज्या पुस्तकात विशेष काही अर्थ नाही असे एखादे पुस्तक भरकटून टाकायचे जिवावर येई. लिहिणे फारसे कठीण नव्हते; परंतु लिहायला पाहिजे असे काहीतरी लिहिणे ही गोष्ट निराळी होती. जग बदलत आहे; तुरुंगात मी माझे हस्तलिखित जवळ घेऊन बसलो आहे नि ते शिळे जुने होत आहे, ही गोष्ट मला नको होती. चालू घडीला आज उद्या पुस्तक वाचले जावे, त्याऐवजी कधी काळी, कदाचित खूप वर्षांनी वाचकांना मिळायचे. मी कोणासाठी लिहावे ? कोणत्या काळासाठी ? खरेच कोणासाठी बरे ? कदाचित मी जे लिहीन ते प्रसिध्दही केले जाणार नाही. कारण माझी जी वर्षे तुरुंगात चालली आहेत, जाणार आहेत, त्या काळात युध्दाची जी वर्षे गेली त्यात घडलेल्या घडामोडींपेक्षा उलथापालथींपेक्षा प्रचंड घडामोडी होण्याचा संभव आहे, मोठे संघर्ष होण्याची शक्यता आहे. कदाचित हिंदुस्थानच रणक्षेत्र व्हायचे किंवा लोकक्षोभाचे येथे मोठे वादळ वाढायचे.
आणि समजा, असे काही न घडले, या सर्वांतून निभावलो, तरीही आता भविष्यकाळासाठी काही लिहिणे जरा धोक्याचेच आहे. कारण आजचे प्रश्न त्या वेळेस उरलेलेही नसतील, त्यांना मूठमाती मिळाली असेल; आणि नवे प्रश्न उभे असतील. आजच्या युध्दाकडे एक साधे महायुध्द, पूर्वीच्या महायुध्दांहून अधिक मोठे, अधिक भयंकर एवढ्याच दृष्टीने मी पाहू शकत नव्हतो. हे युध्द सुरू झाल्यापासून, सुरू होण्याच्या पूर्वीपासूनच असे वाटे की, प्रचंड घडामोडी होतील, उत्पात होतील, क्रान्ती होईल. एक भले वा बुरे नवे जग निर्माण होत आहे, वर येत आहे असे मनश्चक्षूंना दिसे; अशा परिस्थितीत मागे पडलेल्या पडद्याआड गेलेल्या काळासंबंधीचे माझे गरीब बापडे लिखाण त्याची कितीशी किंमत राहणार, त्याची काय मातब्बरी ?
असे हे विचार मनाला अस्वस्थ करीत आणि मला रोखीत. शिवाय या विचारापाठीमागे मनाच्या खोल कपारी आत असे काही गंभीर विचार आले होते की, त्यांचे उत्तर मला सहजासहजी देण्यासारखे नव्हते.
माझ्या मागील तुरुंगवासात असेच विचार मनात येत, अशाच अडचणी समोर उभ्या राहात. ऑक्टोबर १९४० ते डिसेंबर १९४१ पर्यंत डेहराडून जेलमधल्या त्या माझ्या जुन्या परिचित जागेत मी होतो. त्यापूर्वी सहा वर्षे माझ्या आत्मचरित्राला आरंभ मी तेथेच केला होता. परंतु या वेळेस लिहिणे जमेना. जवळजवळ दहा महिने गेले. मनाचा लय लागेना, लिहिण्याचे ठरेना. वाचनात व खणण्यात मी माझा वेळ दवडी; मातीत खेळावे, फुलांशी खेळावे असे चाले. परंतु अखेर मी लिहायला घेतले. माझ्या आत्मचरित्रातील कथाच मी पुढे चालविली. थोडेसेच आठवडे मी झपाट्याने सारखे लिहिले. माझी सजा चार वर्षांची होती. परंतु लिखाण पुरे होण्यापूर्वीच कितीतरी आधी मला सोडून देण्यात आले.