प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 32
धर्म, तत्त्वज्ञान व विज्ञान
हिंदुस्थानने आपल्या जीवनाच्या भूतकालातला खूपसा भाग सोडून दिला पाहिजे, त्या भूतकालाची बाधा वर्तमानकालाला लागू देऊ नये. आपल्या जीवनाच्या बर्याच भागात या भूतकालातल्या वठून गेलेल्या वृक्षाच्या निर्जीव लाकडांची अडगळ साचली आहे; ज्याची उपयुक्तता संपली, ज्याच्यात प्राण राहिला नाही त्याचा त्याग करणे अवश्य असते, पण ह्याचा अर्थ असा नव्हे की, भूतकालातले जे काही अजूनही चैतन्यमय, वा प्राणदायी असेल त्याचाही संबंध तोडावा, तेही विसरून जावे. आमच्या भारतीय मानववंशाची ध्येये भारतीयांच्या मनश्चक्षूं पुढे युगायुगातून तरळलेली कल्पनासृष्टी, आमच्या पूर्वजांचा उचंबळता उत्साह, जीवनात रंगून जाण्याची त्यांची प्रेमी वृत्ती व निसर्गावरची त्यांची प्रीती, त्यांची जिज्ञासा व अज्ञाताचा ठाव घेऊ पाहणारी साहसी वृत्ती, वाङ्मय, कला व सुसंस्कार, या क्षेत्रांत त्यांनी मिळवलेले उज्ज्वल यश, त्यांची सत्यनिष्ठा, सौंदर्यप्रीती व स्वातंत्र्यभक्ती, त्यांनी निश्चित केलेली मूलगामी मूल्ये, जीवन ज्या नानाविध गहनगूढ मार्गांनी चालते त्यांचे आकलन करणारी त्यांची प्रज्ञा, आपल्या आचारविचारावेगळे भिन्न आचारविचार असतील त्याबद्दलची त्यांची सहिष्णू वृत्ती, परकीय लोक व त्यांच्या आचारविचार संस्कारातील चांगले भाग आत्मसात करून घेऊन व या संयोगातून नवनिर्मिती करून नानाविध परंतु संमिश्र अशा संस्कृतीचा विकास करीत राहण्याचे त्या पूर्वजांच्या अंगी वसत असलेले सामर्थ्य, या सर्व गोष्टीचा आम्हाला विसर पडणे शक्य नाही, इष्ट नाही. जे अनंत अनुभव घेत घेत आमच्या ह्या प्राचीन वंशाची रचना झाली, ते आमच्या लोकांच्या अंतर्यामी खोल जाऊन वंशपरंपरा रुजले आहेत, ते आम्ही विसरू म्हटले तरी विसरणे शक्य नाही. आम्ही त्यांची विस्मृती होऊ देणार नाही, त्या वंशपरंपरागत बहुमोल धनाचा अभिमान आम्ही सोडून देणार नाही. भारताला त्यांचे स्मरण राहिले नाही तर त्याला स्वत्व राहणार नाही, भारतीय हे त्याचे स्वरूपच नाहीसे होईल, व ज्यामुळे आम्हाला तो भारत प्रिय आहे, ज्याचा आम्हाला अभिमान आहे, ते बहुतेक सारे विलय पावेल.
भारतमातेच्या त्या स्वरूपावरची आमची निष्ठा आम्हाला सोडायची नाही, पण शतकानुशतकाच्या दीर्घकालात तिच्या सर्वांगावर धूळ पडत राहून व घाण साचत राहून तिचे अंतरंगातले मूळचे सौंदर्य व तिच्या स्वरूपातला अर्थ पार झाकून गेला आहे म्हणून ती धूळ व घाण आम्हाला झाडून काढली पाहिजे, तिच्या अंतरात्म्याची ओढाताण करून, त्याला पीळ पाडून, तो दगडासारखा घट्ट बनवून, त्याला ठरीव आकाराच्या कडक सांगाड्यात कोंबून त्या अंतरात्म्याचा विकास कुंठित करणारी भारतमातेच्या देहावरची ही भयाण गळणे, हे वेडेवाकडे अर्धवट वाढलेले हिडिस मांस, नाहीसे केले पाहिजे. हे सारे भेसूर आगंतुक प्रकार कापून काढले पाहिजेत, व त्या प्राचीन, त्या पुरातन ज्ञानाच्या सारांशाचे पुन्हा स्मरण करून प्रस्तुत परिस्थितीशी त्याचा मेळ घातला पाहिजे. आमच्या त्या परंपरागत विचारपध्दतीने व जीवनक्रमाने पूर्वीच्या युगात कोणे एके काळी आपले कितीही कल्याण झाले असेल, (आणि त्यात चांगले असे पुष्कळच भाग होते हे नि:संशय आहे) परंतु आता ह्या युगात त्या विचारपध्दतीला व त्या जीवनक्रमाला काही अर्थ उरलेला नाही. म्हणून आम्ही त्या विचारपध्दतीत व जीवनक्रमात फेरफार करणे अवश्य आहे. भारतीय मानववंशाखेरीजच्या इतर वंशांनी आजपावेतो जे काही आमच्या-व्यतिरिक्त संपादन केलेले आहे तेही सारे आम्ही ग्रहण करून आत्मसात केले पाहिजे. अज्ञात भवितव्याकडे चाललेला मानववंशाचा प्रवास हे एक साहसच आहे, वेळोवेळी आलेल्या प्रसंगामुळे त्या साहसाबद्दलची मानवाची उत्कंठा वाढत गेली आहे, आणि प्रस्तुत काळी ती उत्कंठा इतकी आहे की, यापूर्वी कधीही ती इतकी झाली नसेल. मानववंशाचे हे साहस जे पूर्वापार चालत आलेले आहे त्यात इतरांनी जे काही साधले आहे ते आत्मसात करून घेऊन भारतानेही इतरांना बरोबरीने पुढे चालले पाहिजे, व तसे करताना राष्ट्रांच्या सीमा किंवा जुने भेद यांना मानवी प्रगतीच्या दृष्टीने काही महत्त्व उरलेले नाही, हे साहस अखिल मानववंशाचे साहस आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. सत्य, सौंदर्य व स्वातंत्र्य ह्यांचा ध्यास जिवाला लागला असला तरच या जीवनात अर्थ आहे, तो ध्यास आम्हा भारतीयांतून लोपला आहे, तो पुन्हा आम्हाला लागला पाहिजे, कैक युगापूर्वीच्या त्या प्राचीन कालात ज्या आमच्या पूर्वजांनी आम्ही चिरकाल नांदावे म्हणून या भरभक्कम अक्षय पायावर आमच्या समाजाची उभारणी करून उज्ज्वल कीर्ती मिळवली, त्यांच्या अंगी असलेली चैतन्यवृत्ती, त्यांचे साहसप्रेम, आम्ही, त्यांच्या वंशजांनी, पुन्हा आपल्यात निर्माण करून वाढवले पाहिजे. मानवाच्या अतिप्राचीन इतिहासाच्या मानवी भगीरथ प्रयत्नांच्या, मानववंशाच्या प्रभातकालच्या आठवणी आम्हाला आहेत, इतका आमचा भारतीय वंश प्राचीन आहे. पण आता आम्हाला पुन्हा नवयौवन प्राप्त करून घेऊन प्रचलित युगाशी समरस झाले पाहिजे, नवयुवकाला वाटत असलेला जगण्याचा आनंद, त्याचा दुर्दम्य उत्साह, आपला भावीकाल रम्य आहे हा त्या नवयुवकाला वाटत असलेला भवितव्याचा विश्वास, आमच्या अंगी आला पाहिजे.
अक्षर, अंतिम, मूलतत्त्व म्हणून जर काही असेल तर सत्त्याचे हे मूळरूप अनंत, अविनाशी व अविकारी असणार. पण मानवी मनाची, माणसाच्या बुध्दीची धाव काही ठराविक मर्यादेपर्यंतच जाऊ शकत असल्यामुळे, सत्याच्या या अमर्यादित अनंत अचल मूळरूपाचे ज्ञान मानवाला संपूर्णपणे आकलन होणे शक्य नाही. स्थलकालच्या सीमेत, मनाची उन्नती जेवढी झाली असेल त्या प्रमाणात, जे प्रचलित विचारप्रवाह प्रभावी असतील त्यांच्या अनुरोधाने, या अनंत सत्याचे जेवढे एखादे लहानंसे अंग त्या मानवाला आकलन होण्यासारखे असेल तेवढ्याचेच काय ते ज्ञान फार तर त्याला होऊ शकेल, त्या सत्याचा गाभा, त्याचे मूलतत्त्व जरी जसेच्या तसे अविचल राहात असले तरी आपले मन जसजसे प्रगल्भ होत जाऊन विचारक्षेत्रात व्याप जसजसा वाढत जाईल, प्रचलित विचारप्रवाहात स्थित्यंतरे होऊन विचार व्यक्त करण्याची नवीनवी साधने जसजशी प्रचारात आणली जातील, तसतशी त्या सत्याची नवीनवी अंगे आपल्याला दिसू लागतात. आणि म्हणूनच मानवी जीवनाचा व्याप, मानवी विचारांचे क्षेत्र जसजसे वाढत जाईल तसतसा सत्याचाही विस्तार होत जावा. एवढ्याकरिता सत्याचा शोध सतत घेत राहावा लागतो, सत्याच्या स्वरूपात नावीन्य आणावे लागते, त्याचा आकार बदलावा लागतो, सत्याचा विकास करीत राहावे लागते. हा क्रम चालत राहिला तरच सत्याच्या जागत्या जिवंत स्वरूपाची प्रचीती मानवजातीला होत राहते, ज्या श्रेयाची मानवी मनाला तळमळ लागलेली असते ते त्याला सापडते, मानवाला आज कसे वागावे, व भावी कालाकरिता काय करावे याचे मार्गदर्शन होते.