प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 27
यावरून जुन्या, अनुभवी, मुरब्बी अशा लोकांचे शहाणपण त्यांनी दाखविले. ह्या सर्व गोष्टी नि:संशय अभिमानास्पद आहेत. हे साधणे सोपे नाही. परंतु ह्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या भरीस पडल्यामुळे मनुष्य हा समाजाचा एक भाग, एक घटक आहे. त्या दृष्टीला मुळीच महत्त्व राहिले नाही, समाजाकरता व्यक्तीने करावयाचे कर्तव्य किरकोळ ठरले. चातुरर्वण्यांच्या क्रमवार सामाजिक पध्दतीतील आपल्या विवक्षित, संकुचित क्षेत्रातील काही ठरीव साच्याची कर्तव्ये आणि जबाबदार्या पार पाडणे इतकेच निश्चित कर्तव्य ठरून प्रत्येकाचे जीवन निश्चित, ठोकळेबाज असे झाले. अनेक वर्णाचा, जातींचा मिळून एक समाज आहे ही भावना व या समाजाबाबत आपले काही कर्तव्य आहे ही जाणीव व्यक्तीला नव्हती. या समाजाचाच मीही एक घटक आहे, त्याच्याशी मी संबध्द आहे, असे मनावर ठसावे म्हणून, ही सामाजिक एकतेची जाणीव अनुभवास यावी म्हणून काहीएक करण्यात आले नाही. तसा प्रयत्न दिसत नाही. ही कल्पनाच अर्वाचीन आहे आणि कोणत्याही प्राचीनसमाजात ती आढळत नाही. तेव्हा प्राचीन भारतवर्षात ही कल्पना असायला पाहिजे होती अशी अपेक्षा करणे दुराग्रही ठरते. परंतु आर्यावर्तात व्यक्तिवादावर, जातिभेदावर, श्रेष्ठकनिष्ठ वर्णावर अधिक भर दिला गेला हे स्पष्ट दिसते. पुढच्या काळात ही वर्णव्यवस्था म्हणजे आपल्या मनाला एक सामाजिक तुरुंग बनला. ज्यांना अधिक हालअपेष्टा यामुळे सोसाव्या लागत त्या खालच्या जातीच्याच मनाचा कोंडमारा झाला असे नाही तर वरिष्ठवर्गातील लोकांचेही मन कैदेत पडल्यासारखे झाले. आपला इतिहास पाहिला तर आपण दुबळे झालो याचे एक कारण हा जातिभेदही आहे असे दिसते. जातिबंधने जसजशी कडक होत गेली त्या प्रमाणातच आपले मन, आपली बुध्दी कडक झाली व त्यामुळे आपली नवनिर्मितीची शक्ती हळूहळू लोपत गेली.
या विषयाकडे पाहू लागले म्हणजे आणखी एक चमत्कारिक घटना घडलेली ठळक उमटून दिसते. कोणाची कोणत्याही देवावर, धर्ममतावर श्रध्दा असो, अगदी मूर्खपणाची का असेना सर्वांचे चालू द्यावयाचे या परमसहिष्णुवृत्तीचा एक वाईट परिणाम असा झाला की, काही दुष्ट चाली रूढ होऊन बसल्या. प्रगतीला मारक झालेल्या कित्येक परंपरागत रूढींचे ओझे फेकून द्यायला अडथळा येऊ लागला. वाढत्या भिक्षुकशाहीने या परिस्थितीचा स्वत:च्या फायद्यासाठी उपयोग करून घेतला. बहुजनसमाजातील भोळसटपणा आणि अंधश्रध्दा यांच्या पायावर स्वत:ची मिरासदारी यांनी भक्कमपणे उभारली. ख्रिश्चन धर्मातील काही संप्रदायांत भिक्षुकशाहीचे जितके प्रस्थ माजले होते तितके येथे नव्हते ही गोष्ट खरी. कारण या सार्या गोष्टींवर कोरडे ओढणारे संत, थोर पुरुष हेही नेहमी त्या त्या काळात आले. शिवाय आपल्या आवडीचा कोणताही पंथ किंवा संप्रदाय पसंत करण्याची मोकळीक सर्वांना असे आणि असे कितीतरी पंथ व संप्रदाय असतही. असे असले तरी भिक्षुकशाही बलिष्ठ होती आणि बहुजनसमाजावर आणखी पकड कायम ठेवून त्यांच्या अज्ञानाचा फायदा घ्यायला तिने कमी केले नाही. अशा रीतीने सनातनी व बुध्दिप्रामाण्य मानणारे स्वतंत्र विचारवादी यांची ही मिसळ एकत्र नांदू लागली व यातूनच शब्दपांडित्य व हटवादी विधिनिषेधांचे कर्मकाण्ड फैलावले. जेथे तेथे प्राचीन आधार अखेर प्रमाण धरण्याची, ''बाबावाक्यं प्रमाणम्'' वृत्ती निर्माण झाली, मात्र त्या प्राचीन ग्रंथांतील तत्त्वाचा बदललेला वेगळ्या परिस्थितीत काय अर्थ होतो ते पाहण्याचा प्रयत्न झाला नाही. समाजाची, संस्कृतीची, नवनिर्मितीची प्रतिभा, आध्यात्मिक शक्ती दुबळी होऊन एकेकाळी चैतन्याने रसरसलेला समाज, अर्थाने भरलेली संस्कृती यांचा गाभा जाऊन नुसता सांगाडा राहिला. अरविंद घोष लिहितात, ''उपनिषदांतील बुध्दकालीन किंवा त्यानंतरच्या विदग्ध नाट्यवाङ्मयाच्या काळातील एखाद्या भारतीयाला उचलून आजच्या हिंदुस्थानात एकदम आणून ठेवला तर त्याला असे दिसेल की, भूतकाळातील केवळ बाह्य आकार, सांगाडे, चिंध्या उराशी कवटाळून बसलेल्या या त्याच्या वंशजांच्या हाती त्या उदात्त भूतकालाचा प्राण, त्याचा अर्थ लागलेला नाही, नुसता देखावा उरला आहे...कंगाल मने, कसलीही हालचाल करावयाला नाराज झालेली बुध्दी, निर्जीव, तीच तीच पोपटपंची, शास्त्रीय ज्ञानाचा ओघ पार थांबलेला, कला वांझ झालेली व अंत:प्रेरणा क्षीण होऊन सर्वत्र नुसती धुगधुग राहिलेली पाहून तो थक्क होईल.''