प्रकरण ६ : नवीन समस्या 5
इतिहासातील मोठ्यांतील मोठा जगज्जेता कोणत्याही स्वरूपातील बौध्दधर्माचा उपासक होता हा एक विरोधाभास आहे, ही मोठी विचित्र घटना आहे. *
----------------------
* आर्क्टिक सैबेरिया, मंगोलिया आणि सोव्हियट-मध्य-आशियातील तुन्नातुवा भागात अद्यापिही एक प्रकारचा शामाई किंवा शामानी धर्म आहे. भुताखेतांवरील विश्वास हे या धर्माचे मुख्य स्वरूप. बौध्दधर्माशी त्याचा फारसा संबंध नाही. परंतु पुष्कळ वर्षांपूर्वी, अनेक शतकांपूर्वी विकृत बौध्दधर्माचाही त्याच्यावर परिणाम झाला असेल, कारण बौध्दधर्माची पुढेपुढे तत्तत्स्थानीय रुढींशी, प्रकारांशी खिचडीच झाली होती. तिबेट म्हणजे खास बौध्दधर्माचे घर. परंतु तेथील बौध्दधर्माचा 'लामा' प्रकार झाला आहे. मंगोलियात जरी शामा धर्म असला तरी आजही बुध्दपरंपरा तेथे जिवंत आहे. अशा रीतीने उत्तर व मध्य आशियातील बौध्दधर्माचे नानाप्रकार व रूपांतरे होत शेवटी जुनाट कल्पनांत व रूढीत तो विलिन झाला.
मध्य आशियात आजही चार महान जेत्यांची नावे लोकांच्या समोर असतात. सिकंदर (अलेक्झांडर), गझनीचा सुलतान महमूद, चेंगीझखान आणि तैमूर. या चारांत आणखी एक पाचवे नाव घालायला हवे; हा पाचवा पुरुष लष्करी जेता नव्हता. निराळ्याच क्षेत्रातला तो महावीर होता. त्याच्या नावाभोवतीही दंतकथा व आख्यायिका मध्य आशियात आतापर्यंतच्या एवढ्याशा काळात सुध्दा गोळा झाल्या आहेत. या पाचव्या विजयी महापुरुषाचे नाव-लेनिन.