प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 51
श्री. रामस्वामी अय्यर यांचा ज्या दुसर्या एका गोष्टीवर भर आहे ती ही की, ह्या ६०१ हिंदी संस्थानांना सर्व एकसारखी समजून एकाच मापाने मोजणे शक्य नाही हे सत्य काहीही केले तरी सोडून चालता येणार नाही. हिंदुस्थानाकरिता नवी राज्यपध्दती ठरवताना या ६०१ संस्थानांची संख्या कमी करून ती सुमारे १५ ते २० पर्यंत आणून ठेवावी लागेल, बाकीच्या किरकोळ संस्थानांना त्यांच्यापेक्षा विस्ताराने मोठ्या अशा एखाद्या प्रांतात किंवा संस्थानात विलीन करावे लागेल.
श्री. रामस्वामी अय्यर यांना संस्थानातून राजकीय प्रगती होत राहावी या गोष्टीचे विशेष महत्त्व वाटते आहे, असे दिसत नाही, वाटतच असले तरी त्यांच्या मते या प्रगतीचे महत्त्व दुय्यम आहे असे दिसते. पण अशी प्रगती होत नसली तर संस्थानांतून, विशेषत: इतर बाबतीत पुढारलेल्या संस्थानांतून, प्रजा व अधिकारी यांच्यात सतत विरोध चालू राहतो.
-------------------------
आज मुस्लिम लीगची दृष्टी आहे त्या दृष्टीने तत्त्वत: हिंदू व मुसलमान हे वेगवेगळे समजून धर्मभेदाच्या आधारावर हिंदुस्थानची कशीही वाटणी करू गेले, तरी हिंदू व मुसलमान ह्या दोन मुख्य धर्मांतील लोकांना एकमेकापासून वेगळे करणे शक्य नाही, कारण ते सर्व देशभर इतस्तत: पसरलेले आहेत. यांपैकी एका धर्माचे लोक ज्यात बहुसंख्य आहेत असे प्रदेश वेगळे काढू म्हटले तरी दुसर्या धर्माच्या अल्पसंख्याकांची खूपच मोठी प्रचंड अशी संख्या त्या प्रदेशात उरतेच. परिस्थिती ही अशी असल्यामुळे अशा तर्हेने काही प्रदेश अलग केले तर एका अल्पसंख्याकांच्या प्रश्नाच्या जागी अनेक अल्पसंख्याकांचे प्रश्न मात्र येतील. शीख जमातीसारख्या इतर काही जमातीचा इच्छा नसताना त्याच्यावर अन्याय होऊन त्यांचे दोन भाग होऊन त्यांच्यावर वेगवेगळ्या राज्यात फुटून राहण्याचा प्रसंग येईल. एका जमातीला फुटून निघण्याचे स्वातंत्र्य दिले तर इतर काही जमाती अल्पसंख्य असूनही त्यांना मात्र ते स्वातंत्र्य नाकारले जाते आणि त्यांची अगदी स्पष्ट, तळमळून, मनापासून, जी हिंदुस्थानातील इतर भागांशी संलग्न राहण्याची इच्छा, ती दडपून टाकून त्यांना हिंदुस्थानातून अलग काढणे या योजनेने भाग योजनेने भाग होणार. प्रत्येक प्रदेशात त्या प्रदेशांतील धर्माने बहुसंख्य असलेल्या लोकांचे अलग व्हावे किंवा नाही याविषयी मत मानले जावे असे जर कोणी म्हणू लागले, तर हेच प्रादेशिक तत्त्व सबंध हिंदुस्थान देशाला लावून तेथील बहुसंख्य, धर्माने बहुसंख्य लोकांचे मत मान्य न करण्याला काही विशेष असे कारण नाही असेही उत्तर निघेल. किंवा आणखी एक असेही उत्तर देता येईल की, प्रत्येक लहानसहान प्रदेशाने स्वेच्छेने आपापल्यापुरते अलग राहणे व अशा तर्हेने हिंदुस्थानात असंख्य लहान लहान राज्ये निर्माण करून, या मतप्रणालींची अशी असंभाव्य व विचित्र, अखेरची स्थिती होऊ देणे शक्य नाही. अशी लहान लहान असंख्य राज्ये देशात असावी म्हटले तरी तेही तर्कशुध्द विचारसरणीला न पटणारे आहे, कारण सर्व देशभर जिकडेतिकडे धार्मिक जमाती एकमेकात जागोजागी मिसळलेल्या आहेत, प्रत्येक जागा भिन्नभिन्न धार्मिक जमातींनी व्यापलेली आहे.
नुसती राष्ट्रीयत्वाची कसोटी लावून कोणते स्थान कोणत्या राष्ट्रात येते हे ठरविण्याचा प्रश्न आला तरी सुध्दा असले प्रश्न फाळणी करून सोडवणे मोठे कठीण आहे. पण ही कसोटी केवळ धर्माचीच लावू गेले तर, कोणत्याही तर्कशुध्द सिध्दान्तान्वये, असे प्रश्न फाळणीमुळे सुटणे मुळीच शक्य नाही. ही असली विचारपध्दती म्हणजे आधुनिक जगात जिला कोठेच स्थान नाही अशा कुठल्यातरी जुन्यापुराण्या मध्ययुगीन कल्पनांचा फिरून आधार घेण्याचा प्रकार आहे.