प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 28
हिंदुस्थानचा विकास विरोधामुळे थांबला
एकाच व्यक्तीच्या प्रसंगानुरूप वेगवेगळ्या अनेक भूमिका असतात, जीवनाशी संबंध येताना एकाच व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू दिसतात, आणि तोच प्रकार राष्ट्रातही आढळतो. या वेगवेगळ्या मनोभूमिकांचा परस्परसंबंध दृढ राखणारा, त्यांना एकत्र ठेवणारा, जिव्हाळ्याचा बंध जर बळकट असला तर सर्व सुरळीत चालते, नाहीतर या भिन्न भूमिका एकमेकीपासून अलग होऊन व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व छिन्न होते, त्याचे वेगवेगळे तुकडे होऊन आपत्ती ओढवते. वास्तविक नेहमी असे घडत असते की, ह्या भिन्न भूमिका एकमेकींशी जुळत्या करून त्यांचा समन्वय साधण्याची क्रिया एकसारखी चाललेलीच असते, आणि त्यामुळे त्यांचे परस्पर प्रमाण व्यवस्थित राहते. एखाद्या भूमिकेची वाढ यथाक्रम होण्यात व्यत्यय आला, किंवा तिची भरमसाठ वाढ एकाएकी होऊन ती व्यक्तीला सहज आत्मसात करता आली नाही तर या वेगवेगळ्या भूमिकांत परस्पर विरोध उत्पन्न होतो. हिंदी राष्ट्राच्या स्वत्वात, हिंदी लोकांच्या मनोभूमीत, वरवर दिसणार्या त्यांच्यातील अनेक विरोध व भेदांच्या खाली, आत अंतर्यामी असाच मूलभूत विरोध उत्पन्न झाला आहे, आणि त्याला कारण असे झाले की, हिंदुस्थानातील जनमनाची वाढ यथाक्रम होऊ देण्यात व्यत्यय आला. कोठल्याही समाजाला आपले स्थैर्य संभाळणे व आपली प्रगती करणे या दोन्ही गोष्टी साधावयाच्या असल्या तर त्या समाजाला काही निश्चित तत्त्वाची बैठक पाहिजे व आपल्या अंगीच्या अचल शक्तीचे चल शक्तीत रूपांतर करण्याची तयारीही पाहिजे. समाजात नावीन्य निर्माण करण्याची वृत्ती नसली तर समाजाची कोंडी होऊन तो कुजू लागतो! समाजाला जर काही निश्चित तत्त्वांची बैठक नसेल तर त्यातील घटक उखळून पडून अलग होऊन समाजाचा नाश होण्याचा संभव असतो.
कधीही न बदलणारी, सर्वत्र तीच राहणारी, कधीही खोटी न पडणारी अशी ही मूलभूत, ही अचल सर्वव्यापी निर्दोष तत्त्वे शोधून काढण्याचा यत्न हिंदुस्थान देशात फार प्राचीन काळापासून चालला होता. पण त्या प्राचीन काळच्या त्या प्राचीन तत्त्ववेत्त्यांची संसाराचे, पालटत जाणार्या जगाचे, यथायोग्य मूल्य ओळखण्याची, युगधर्म ओळखण्याची, चैतन्ययुक्त दृष्टीही होती. मूलभूत अचल सर्वव्यापी निर्दोष तत्त्वे व परिस्थित्यनुरूप नावीन्य निर्माण करण्याची वृत्ती या दोन मूलाधारांवर त्या काळात एका सुव्यवस्थित व प्रगतिपर समाजाची क्रमश: बांधणी होत गेली, परंतु त्या बांधणीत समाजाच्या स्थैर्याकडे, त्या समाजाची धारणा नीट राहील, संकटे आली तरी समाज त्यातून सुखरूप पार पडेल अशी योजना करण्याकडे विशेष लक्ष दिले गेले होते. पुढे असे होत गेले की, मूळच्या दोन आधारांपैकी परिस्थित्यनुरूप नावीन्य निर्माण करण्याच्या वृत्तीचा लोप होत गेला व त्रिकालाबाधित तत्त्वांच्या नावावर समाजव्यवस्था कडक करण्यात आली, तिच्यात काहीही स्थित्यंतर होता कामा नये असे ठरविले गेले. परंतु वस्तुस्थिती मात्र अशी होती की, ही समाजव्यवस्था प्रत्यक्षात तितकी कडक नव्हती. तिच्यात स्थित्यंतरे हळूहळू परंतु सतत होतच होती. पण या व्यवस्थेचे ध्येय, तिचे अंतिम कल्पना स्वरूप, तिच्या बांध्याच्या ठेवणीचे रूढ स्वरूप, यांत काहीही पालट न होता तिचे स्वरूप तेच राहिले. सामूहिक जीवनाच्या कल्पनेचे प्रत्यक्षात स्वरूप दर्शविणारी काही उदाहरणे म्हणजे भारतीय समाजातील जातिसंस्था, एकत्र कुटुंबसंस्था व ग्रामसंस्था ही ह्या भारतीय समाजाचे आधारस्तंभ होते, त्या समाजाची उभारणी या संस्थांवर झाली होती. जातिसंस्थेत ज्या भिन्न जाती होत्या त्यांतील प्रत्येक जातीला तिच्यातील व्यक्तीवर सत्ता चालविण्याचा अधिकार कमीअधिक प्रमाणात होता व ग्रामसंस्थेत प्रत्येक गावाचे जीवन सामुदायिक स्वरूपाचे व स्वायत्त असे. ह्या संस्था त्यांच्यात काही दोष असले तरी इतक्या शतकानुशतके आलेल्या संकटातून चिरकालपर्येत टिकून राहिल्या याचे कारण मानवी स्वभावाच्या व मानवी समाजाच्या काही मूलभूत गरजा या संस्थांमुळे भागत होत्या. त्यांच्यामुळे प्रत्येक समूहाला स्थैय लाभत होते, समूह सुरक्षित राहात होता व त्याला समूहस्वातंत्र्याची जाणीव राहात होती. जातिसंस्था टिकून राहिली याचे कारण समाजात काय अधिकार आहेत व त्यांचे परस्परसंबंध काय आहेत ते जातीवरून समजत राहिले. विशिष्ट वर्गांना दिलेले विशेष अधिकार अबाधित राहिले ते त्या काळी ती तत्त्वे सार्वत्रिक मान्य होती एवढ्यामुळेच केवळ नसून ते विशेष अधिकार असलेल्या वर्गात तसे सामर्थ्य, बुध्दी, कार्यक्षमता व त्यांच्या जोडीला तशीच आत्मत्यागाची तत्परताही होती. वेगवेगळ्या हक्कांच्या परस्पर विरोधावर ही तत्त्वरचना झालेली नसून, उलट प्रत्येक व्यक्ती उपकारबध्द असल्यामुळे तिला फेडावयाची असलेली ॠणे व त्याकरिता योग्य कर्तव्यपालन, एका समूहात असलेल्या व्यक्तींनी एकमेंकांशी व प्रत्येक समूहाने इतर समूहांशी करावयाचे सहकार्य, व विशेषत: कलहाऐवजी शांतीची प्रस्थापना, या तत्त्वावरच ह्या समाजरचनेचा विचार आधारलेला होता. समाजव्यवस्थेची बंधने कडक होती, पण मन:स्वातंत्र्यावर कसलेही बंधन नव्हते.