प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 62
एच. जे. मॅकिंडर यांनी हा भूरचनानुवर्ती राजकारणाचा सिध्दान्त प्रथम मांडला व त्याची पुढे जर्मनीत वाढ होत गेली. त्या सिध्दान्ताला त्यांची आधारभूत कल्पना अशी की, मानववंशाच्या संस्कृतीची वाढ प्रथम आशिया व युरोप मिळून होणार्या भूखंडाच्या समुद्रकिनार्यावरच्या प्रदेशात होत गेली, आणि या भूखंडाच्या 'मध्यस्थित हृदयप्रदेश' म्हणजे युरोप व आशियामधील मध्यप्रदेशातील लोकसमाजांची संख्या व शक्ती वाढून ते चौफेर पसरताना त्यांनी भूमिप्रदेशावरून चाल करून येऊन या किनार्यावरच्या सुधारलेल्या प्रदेशातील समाजावर आक्रमण चालवले आहे, आणि त्यापासून मानवी संस्कृतीचे संरक्षण केले पाहिजे. म्हणून, पुढे त्यांचे म्हणणे असे की या 'मध्यस्थित हृदयप्रदेशा'वर सत्ता ठेवता आली की सार्या जगावर आपोआप सत्ता ठेवता येईल. त्यांची ही अशी विचारसरणी आहे, पण निदान हल्लीच्या काळी तरी सुसंस्कृत मानवसमाज केवळ समुद्राजवळच्या प्रदेशातच सापडतो अशी स्थिती राहिलेली नाही, संस्कृती व सुधारणा यांचा विस्तार व आशय जागतिक होऊ पाहात आहे. शिवाय या सिध्दान्तातील एक कल्पना, युरोप व आशिया मिळून होणार्या युरेशिया या भूखंडाचा 'मध्यस्थित हृदयप्रदेश' हाच जगभर सत्ता चालविणार ही कल्पना, अमेरिका खंडातील देशांची जी वाढ चालली तिच्याशी विसंगत आहे; आणि भूमीवर प्रभावी ठरणारे सैन्यबल व सागरावर प्रभावी ठरणारे युध्द नौकाबल या आतापर्यंतच्या युध्दसाधनांच्या खेरीज तिसरे वैमानिक शस्त्रास्त्रबल हे नवे युध्दसाधन उपलब्ध झाले आहे. त्यामुळे पूर्वीच्या दोन युध्दसाधनांच्या उपयुक्ततेचे प्रमाण आता बदलले आहे.
सारे जग पादाक्रांत करण्याचे स्वप्न आपल्या मनात सतत घोळणार्या जर्मन राष्ट्राला, आपल्या राष्ट्राला चोहोकडून वैर्यांनी घेरले आहे अशा भीतीने ग्रासले होते. सोव्हिएट रशियाने अशी भीती घेतली होती की, आपले वैरी आपल्याविरुध्द एकजूट करतील. युरोपखंडातील राष्ट्रांचे सामर्थ्य परस्परांविरुध्द समतोल राहावे, तेथील कोणत्याही राष्ट्राला वरचढ होऊ देऊ नये या तत्त्वावर इंग्लंडचे राष्ट्रीय धोरण पुराण काळापासून चालत आलेले आहे, त्यामुळे त्यांना त्या इतर युरोपियन राष्ट्रांची नेहमीच भीती वाटत आली, आणि त्या भीतीमुळे इंग्लंडने नेहमी कोणाची तरी आगळीक काढण्याचा व वक्रमार्गाने दुरून आपण नामानिराळे राहून डाव टाकण्याचा उपक्रम चालवला होता. आता ह्या चालू महायुध्दानंतर ही सर्व परिस्थिती पालटून जाऊन नव्या परिस्थितीत जागतिक सामर्थ्य असलेली फक्त दोन राष्ट्रे, एक अमेरिकन संयुक्त संस्थाने व दुसरे रशियन सोव्हिएट संस्थाने एवढीच पहिल्या श्रेणीत राहणारे आणि उरलेल्या इतर राष्ट्रांनी काहीतरी संघ बनवला नाही तर ती सामर्थ्याच्या दृष्टीने या दोन राष्ट्रांच्या मागे कोठेतरी लांब पडणार. आता तर अमेरिकन संयुक्त संस्थाने या राष्ट्राला सुध्दा प्रोफेसर स्पाइकमन हे आपला निर्वाणीचा संदेश देऊ लागले आहेत की त्याही राष्ट्राला वैर्यांनी वेढा देण्याचे भय उत्पन्न झाले आहे, म्हणून त्यांनी वर निर्दिष्ट केलेल्या कोणत्यातरी 'सीमास्थित कटिप्रदेशा'तल्या समुद्रकिनार्यावरच्या राष्ट्राशी स्नेह संपादला पाहिजे, आणि काहीही झाले तरी त्यांनी निदान 'मध्यस्थित हृदयप्रदेश' (म्हणजे आता प्रोफेसरांच्या मते रशिया) व 'सीमास्थित कटिप्रदेश' यांचा एकोपा होऊ देऊ नये.
हे सारे विवेचन मोठे बुध्दिचातुर्याने व यथार्थता दृष्टी ठेवून केल्यासारखे, वरवर पाहिले तर. दिसते खरे, पण हा सारा शुध्द वेडेपणाचा प्रकार आहे, कारण त्याच्या मुळाशी विचार आहेत ते पुन्हा राष्ट्राराष्ट्रांमध्ये भांडणे व युध्दे उभी करणार्या त्याच जुन्या धोरणाचे, म्हणजे आपला राज्यविस्तार वाढवून साम्राज्य भोगण्याचे आणि मग भिन्न भिन्न गटांमध्ये शक्तीचा तोल राखण्याचे. पृथ्वी वाटोळी आहे, त्यामुळे कोणत्याही राष्ट्राच्या अवतीभोवती इतर राष्ट्रांचा वेढा असणारच. भोवती शत्रूंचा गराडा पडू नये म्हणून शक्तिसाधनेच्या राजकारणाचा उपयोग करणार्याला काही राष्ट्रांशी मित्रसंबंध जोडावे लागतील. मग इतर काही राष्ट्रे आपली एकजूट या संघाविरुध्द करतात, दोघांचाही विस्तार वाढवला जात असतो, त्याकरिता काही देश जिंकावेही लागतात, पण कोणत्याही देशाचे राज्य किंवा सत्तेचे क्षेत्र कितीही मोठे झाले, तरी त्या राज्यात किंवा सत्ताक्षेत्रात न आलेल्या इतर देशांचा वेढा या देशाभोवती राहणारच, आणि या राज्याबाहेरच्या त्या इतर राष्ट्रांना आपल्या या प्रतिस्पर्ध्याची भीती वाटणारच. या सार्या संभाव्य संकटांपासून निर्बंध राहण्याचा मग एकच उपाय उरतो, आणि तो म्हणजे सारे जगच जिंकायचे, किंवा आपल्याला संभाव्य प्रतिस्पर्धी म्हणून जो वाटेल त्याचा नि:पात करायचा. वर्तमानकालात नुकत्याच घडलेल्या घटनांचा इतिहास पाहिला, तर जग जिंकायचा एका राष्ट्राचा अगदी अलीकडचा प्रयत्न फसलेला आपल्या डोळ्यांसमोर दिसतो आहे. त्यापासून घ्यायचा तो बोध इतर राष्ट्रे घेणार, का महत्त्वाकांक्षा, वंशाभिमान, आपल्या सामर्थ्याचा गर्व, असल्या गोष्टींच्या आहारी जाऊन काही राष्ट्रे याच विनाशभूमीवर आपल्या दैवाची परीक्षा पाहणार आहेत ?