प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 5
गांधींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सभा शीघ्रगती प्रभावी
कार्य करणारी संस्था होते.
पूर्वी गांधी काँग्रेसमध्ये आलेले नव्हते ते आले व आल्याबरोबर त्यांनी त्या संस्थेची घटना आमूलाग्र बदलली. त्यांनी ती लोकमताप्रमाणे चालणारी, सर्वसामान्य बहुसंख्य लोकांची संस्था केली. पूर्वीसुध्दा ती संस्था लोकमताप्रमाणे चालली होतीच, पण त्या संस्थेचे मतदार थोडे असत. त्यांत बहुधा समाजाच्या वरवरच्या वर्गातले लोक असत. संघटना बदलल्यानंतर शेतकरी वर्गाचा लोंढाच्या लोंढा संस्थेत येत राहिला व तिच्या या नव्या रूपात काँग्रेस म्हणजे मुख्यत: कृषिव्यवसायी लोकांची परंतु मधूनमधून मध्यमवर्गीयांचे दाट ठिपके दिलेली एक प्रचंड संस्था दिसू लागली. पुढेपुढे तिचे कृषिव्यावसायिकांची संस्था हे रूप वाढत जाणार होते. कारखान्यातले कामगारही काँग्रेसमध्ये आले पण ते व्यक्ती म्हणून आले, स्वतंत्र कामगार संस्थांची संघटना होऊन त्या संघटनेचे घटक म्हणून नव्हे.
ह्या संस्थेचे मुख्य तत्त्व उद्देश प्रत्यक्ष कृती शांततामय मार्गाने चालविलेले चळवळीचे कार्य असे निश्चित झाले होते. आतापर्यंतचे दोन पर्याय असे होते की, एकतर नुसती भाषणे करावी व ठराव मंजूर करावे, नाहीतर क्रांतिकारकांची चळवळ चालवावी. हे दोन्ही पर्याय राष्ट्रीय सभेने सोडले, विशेषत: क्रांतीचा मार्ग त्याचा निषेध करून टाकून दिला, कारण तो काँग्रेसच्या मूळ धोरणाविरुध्द होता. चळवळीचे एक नवे तंत्र तयार करण्यात आले. त्या तंत्रान्वये पूर्ण शांततेच्यामार्गानेच चळवळ चालवावयाची होती ती अशी की, अन्याय आहे असे राष्ट्रीय सभेला वाटत होते तसल्या प्रकारची कोणतीही गोष्ट चालू द्यावयाची नाही, व अर्थातच याचा परिणाम म्हणून जे दु:ख व क्लेश सोसावे लागतील ते खुषीने पत्करण्याची तयारी ठेवावयाची. गांधींचा शांततेचा पुरस्कार जरा विलक्षण होता, कारण स्वत: ते ज्वलंत स्फूर्तिने सतत चळवळ चालविणारे होते. त्यांच्या मते जे काही वाईट, अपायकारक असेल ते मुकाट्याने सहन करून चालू देणे किंवा आपल्या दैवात तसे आहे असे मानून स्वस्थ बसणे त्यांना माहीत नव्हते, तसल्या गोष्टींचा प्रतिकार त्यांनी निकराने परंतु शांत व सविनय मार्गांनी केला.
जे करावयाचे होते त्याकरता व्दिविध स्वरूपाच्या चळवळीची आवश्यकता होती. परकीय सत्तेला आम्ही जुमानणार नाही असे आवाहन देऊन तिचा प्रतिकार करण्याकरिता अवश्य ती चळवळ करायलाच पाहिजे होती, परंतु त्याशिवाय आपल्या स्वत:च्या सामाजिक दोषाविरुध्द लढा देण्याचीही चळवळ अवश्य होतीच. हिंदुस्थानला स्वातंत्र्य प्राप्त करून देणे व त्याकरता शांततेच्या मार्गाने चळवळ करणे या काँग्रेसच्या मुख्य उद्देशाव्यतिरिक्त काँग्रेसच्या कार्यक्रमातले मुख्य मुख्य भाग होते ते असे की, देशात ऐक्य निर्माण करणे व अर्थातच त्याकरता अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडवणे, दलित वर्गांना वर आणणे व समाजाला लागलेली अस्पृश्यतेची उपाधी नाहीशी करणे.