प्रकरण ६ : नवीन समस्या 30
वर्णव्यवस्थेची कल्पना व आचार म्हणजे थोड्या निवडक लोकांनी सर्वांवर सत्ता चालवावी या ध्येयाचे मूर्तिमंत रूप होते, व अर्थातच हे ध्येय लोकशाही कल्पना विरुध्द होते. चातुरर्वर्ण्याच्या परंपरेने ठरविलेली पायरी कोणी सोडली नाही व ठरलेल्या क्रमाबद्दल कोणी संशय घेतला नाही तर या वरिष्ठवर्गांनी आपल्याला समाजात जितका मोठा मान आहे तितकेच मोठे ॠण समाजाला आपण लागतो, आपली जबाबदारी मोठी आहे ही जाणीव तीव्र ठेवण्याची वृत्ती होती. सांस्कृतिक वृत्ती होती. सांस्कृतिक क्षेत्रात भारताने जे काही मिळविले, जी सिध्दी मिळविली ती वरिष्ठ वर्गांनीच; खालच्या जातींना संधीच नसे, प्रसंगच फार थोडे येत. हे वरिष्ठ वर्ग लहान नव्हते. त्यांची संख्याही बरीच होती. आणि सत्ता, अधिकार, वर्चस्व त्या सर्वांनाच आली असल्यामुळे त्यांनी ही वर्णव्यवस्था खूप काळ यशस्वी रीतीने चालविली. वर्णव्यवस्था आणि भारतीय सामाजिक रचना यांतील मुख्य दोष आणि दौर्बल्य यात होते की बहुजनसमाज मागे ठेवण्यात आला; शैक्षणिक दृष्ट्या, सांस्कृतिक व आर्थिक दृष्ट्या त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्नच केला गेला नाही. या अवनतीमुळे शेवटी अध:पात झाला तो वरच्यांचाही झाला. भारतीय अर्थव्यवस्था, सगळे भारतीय जीवनच दगडासारखे घट्ट, निश्चल, थंडगार असणे ही भारताची विशेष खूण ह्या अवनतीमुळेच झाली. हिंदुस्थानातील सामाजिक रचना आणि इतर देशांतील पूर्वीच्या सामाजिक रचना यांत तसे पाहिले तर फार फरक नव्हता; परंतु गेल्या काही पिढ्यांत सर्व जगभर जे बदल घडून आले आहेत त्यामुळे हा फरक अधिक स्पष्टपणे प्रतीत होतो. आजच्या युगात, मानवजातीच्या आजच्या संदर्भात पाहू गेले तर असे दिसेल की, ही वर्णजातिव्यवस्था आणि तद्नुषंगिक सार्या गोष्टी ह्या प्रतिगामी, काळाशी विसंगत, बंधनकारक व प्रगतीच्या मार्गातील अडथळे आहेत. या वर्णजातिव्यवस्थेत सर्वांना समान संधी आणि समान प्रतिष्ठा मिळणे शक्य नाही; राज्यकारभारातील लोकशाही तिच्या चौकटीत शक्य नाही, आणि आर्थिक लोकशाही तर त्याहून अशक्य आहे. वर्णव्यवस्था आणि लोकशाही या गोष्टी परस्पर विरुध्द आहेत. मूलत: त्यांच्यात संघर्ष आहे, त्यांच्यातील कोणतीतरी एकच अखेर राहील.
बाबर आणि अकबर ; हिंदीकरणाची क्रमश: गती
जरा मागे जाऊ व पाहू. आपण अफगाण हिंदुस्थानात स्थायिक झालेले आणि हिंदी झालेले पाहिले. अफगाण राज्यकर्त्यांसमोर पहिला प्रश्न हा होता की, प्रजेला वाटणारा वैरभाव, दुजाभाव कमी कसा होईल आणि त्यांची मने कशी जिंकता येतील आणि म्हणून हेतुपुरस्सर त्यांनी आपले क्रूरपणाचे प्रकार बंद केले व ते अधिक सहिष्णू बनून प्रजेचे सहकार्य मागू लागले. आपण विदेशी विजेते नसून येथलेच राहणारे, येथेच जन्मलेले व वाढलेले असे हिंदी आहोत असे आपल्या वर्तनाने ते दाखवू लागले. प्रथम धोरण म्हणून ही नीती त्यांनी अंगिकारिली. परंतु पुढे जसजसे वायव्येकडून आलेले हे लोक हिंदी वातावरणात रुळले, येथल्या प्रवाहात मिसळले, तसतसे त्याचे हे वळणच बनले. वरती अमीरउमरावांत, राजदरबारांत हा क्रम चालला असता, खाली जनतेत तर समन्वयाचे, जीवन आणि विचार यांच्या एकीकरणाचे प्रवाह आपोआप जास्त जोराने वाहू लागले. संमिश्र अशी संस्कृती दिसू लागली आणि याच पायावर पुढे अकबराने टोलेजंग इमारती उठविली.
हिंदुस्थानातील मोगल घराण्यातील अकबर हा तिसरा बादशहा, परंतु साम्राज्याची नीट संघटना त्यानेच केली. इ.स. १५२६ मध्ये बाबर दिल्लीच्या तख्तावर आला. तो या देशात परका होता, आणि त्यालाही तसे वाटे. तैमुरी नवयुगाचा उत्कर्ष जेथे होता अशा मध्य आशियातील आपल्या मूळच्या मातृभूमीपासून तो इकडे दूर आला होता. इराणी कला व संस्कृती यांचा त्याच्या मनावर पगडा होता. ओळखीपाळखीचा समाज, गप्पागोष्टींची मजा, बगदाद व इराणमधून त्याच्या मूळ देशात पसरलेले रोजच्या राहणीतीतले शिष्टाचार व सुखसोयी यांची त्याला सारखी आठवण येई. त्या उत्तरेकडील डोंगरपहाडातील बर्फाची त्याला आठवण होऊन तो दु:खी होई. फरगाणातील फळे, फुले, तेथील रुचकर मांस त्याला आठवे. परंतु त्याला तेथे जे दिसले त्याने जरी तो निराश झाला तरी हिंदुस्थानही चांगला, सुंदर देश आहे असे त्याला वाटले. हिंदुस्थानात आल्यावर तो चारच वर्षे जगला. त्यातला त्याचा बराचसा वेळ लढाया करण्यातच गेला. इस्तंबूल येथून एका विख्यात वास्तुकलातज्ज्ञाला आणून आग्रा येथे भव्य राजधानीचा त्याने पाया घातला. इस्तंबूलमध्ये त्या वेळेस वैभवशाली सुलेमानची कारकीर्द सुरू होती, आणि शोभिवंत इमारती तेथे बांधल्या जात होत्या.