प्रकरण ५ : युगायुगांतून 75
भारतीय कलेच्या आरंभीच्या कालखंडात बाह्य सृष्टीचे निसर्गसौंदर्य दाखविण्याच्या वृत्तीत सुकाळ आढळतो. चिनी संस्कृतीचा कदाचित हा परिणाम असेल. त्याप्रमाणे हिंदी ध्येयवादाने चीन-जपानमध्ये जाऊन त्यांच्या काही कालखंडावर अपार परिणाम केला आहे त्याप्रमाणे हिंदी कलेच्या इतिहासातही निरनिराळ्या काळी चिनी संस्कृतीच्या कल्पनांचा परिणाम झालेला दिसतो; विशेषत: निसर्गानुसारी वृत्तीत हा परिणाम दिसून येतो.
इ. सनाच्या चौथ्या ते सहाव्या शतकांत गुप्त राजवट हिंदुस्थानात होती. हिंदी इतिहासातील तो सुवर्णकाल मानला जातो. याच काळात अजिंठा येथील लेणी खोदली गेली, तेथील भव्य चित्रे रंगविली गेली. बदामी आणि बाग येथील कलाकृतीही याच काळातील आहेत. अजिंठा येथील चित्रकला अतिसुंदर आहे यात शंका नाही. परंतु या चित्रकलेचा शोध लागल्यावर हिंदी कलावंतांवर तिचा अपार परिणाम झाला आणि आपल्याभोवतीच्या जगाकडे पाठ फिरवून हिंदी कलाकार अजिंठा नमुन्याची शैली आणू लागले. याचा परिणाम फारसा चांगला झालेला नाही.
अजिंठा आपणास एका स्वप्नमय सृष्टीत घेऊन जाते, परंतु ही सृष्टी स्वप्नमय नसून सत्य होती, यथार्थ होती. बौध्दभिक्षूंनी ही चित्रे रंगविली आहेत. कैक शतकांपूर्वी बुध्द म्हणाले होते, ''स्त्रियांपासून दूर राहा; त्यांच्याकडे बघूही नका, कारण स्त्रिया म्हणजे संकट.'' परंतु अजिंठा येथील भिंतींवरील विशाल चित्रमय सृष्टीत स्त्रियांची रेलचेल आहे. सुंदर स्त्रिया, राजकन्या, गाणारणी, नाचणार्या, बसलेल्या व उभ्या, मिरवणुकीत सामील झालेल्या किंवा वेषभूषा शृंगारसाज करीत स्वत:ला नटवीत असलेल्या, नाना स्वरूपात येथे स्त्रिया रंगविलेल्या दिसतील. अजिंठ्यातील स्त्रियांच्या चित्रांची सगळीकडे जगभर ख्याती झाली आहे. त्या चित्रकार भिक्षूंनी जगाचे किती नीट ज्ञान करून घेतलेले असेल, जीवनाचे हे करूण गंभीर नाटक त्यांच्या किती परिचयाचे असेल नाही ? बोधिसत्त्वांचे चित्र, पारलौकिक वैभवाने नटलेली ती बुध्दांची मूर्ती जितक्या भक्तिप्रेमाने त्यांनी रंगविली, चितारली तितक्याच हळुवारपणाने व भावनापूर्ण वृत्तीने त्यांनी सारा संसारही रंगविला आहे.
वेरुळची प्रचंड लेणी सातव्या शतकात निव्वळ पाषाणात खोदली गेली. त्यात मधोमध अवाढव्य कैलास मंदिर खोदलेले आहे. मनुष्यप्राण्यांना अशा या मंदिरांची कल्पना तरी कशी आली आणि मनातील ती कल्पना, ते स्वप्न त्यांनी पाषाणात कसे मूर्त केले याचे खरोखर आश्चर्य वाटते. मुंबईजवळील घारापुरी येथील लेणी आणि येथील भव्य त्रिमूर्ती याच काळातील आहेत. दक्षिण हिंदुस्थानातील मामल्लापुरम् येथील अनेक अवशेषही याच काळात सापडतात.
घारापुरी येथील लेण्यात नृत्यमग्न शिवाची-नटराज शिवाची-एक भग्न मूर्ती आहे. हॅव्हेल म्हणतो की या भग्न स्थितीतही त्या मूर्तीतील विशाल कल्पना, तिच्यातील अतिमानवी विराट शक्ती प्रतीत झाल्याशिवाय रहात नाही. हॅव्हेल सांगतो, ''नृत्याच्या तालबध्द गतीने सारा पाषाण थरथरतो आहे, कापतो आहे असे वाटते; परंतु बुध्दाच्या मुखकमलावर जे शांत, निर्विकार तेज खुलले आहे, तेच अविचल तेज नटराज शिवाच्या भव्य मुद्रेवर विराजते आहे.''