प्रकरण २ : बेडेनवेलर : लॉसेन 1
२
बेडेनवेलर : लॉसेन
कमला
आल्मोरा येथील त्या पहाडातील तुरुंगातून १९३५ सप्टेंबरच्या चौथ्या तारखेस एकाएकी माझी सुटका करण्यात आली. कमला अत्यवस्थ असल्याची वार्ता आली होती. जर्मनीतील काळ्या जंगलामधील बेडेनवेलर येथील एका सॅनिटोरियममध्ये कितीतरी दूर ती होती. मी मोटारने धावलो. पुढे आगगाडीने अलाहाबादला दुसर्या दिवशी येऊन पोचलो. त्याच दिवशी तिसरे प्रहरी विमानाने मी युरोपला निघालो. कराची, बगदाद, कैरो घेत मी अलेक्झांड्रिया येथे आलो. तेथे समुद्रवाही विमानात बसून मी वृंदिसीला पोचलो. तेथे आगगाडीत बसून स्वित्झर्लंडमधील बास्ले येथे आलो. सप्टेंबर ९ ला मी बेडेनवेलर येथे सायंकाळी येऊन दाखल झालो. तेव्हा आल्मोरा सोडून पाच व अलाहाबाद सोडून चार दिवस झाले होते.
मी कमलाला भेटलो. तिला पाहिजे. तिच्या मुखावर तेच चिरपरिचित असे दुर्दम्य स्मित होते. ती फारच खंगली होती, दु:खविव्हळ असल्यामुळे ती फार बोलू शकली नव्हती. कदाचित माझ्या येण्याचा परिणाम म्हणून की काय दुसर्या दिवशी तिला जरा बरे वाटले. आणि थोडेसे दिवस खरेच जरा बरे गेले. परंतु धोका होताच, आणि हळूहळू परंतु निश्चितपणे जीवनाचा झरा सुकत जात होता. तिच्या मृत्यूचा विचार माझ्या मनाला पटणे अशक्य होते, म्हणून तिची प्रकृती सुधारत आहे अशी कल्पना मी करीत असे आणि वाटे की या धोक्यातून निभावलो की पुढे सारे ठीक होईल. डॉक्टरही त्यांच्या नेहमीच्या पध्दतीने मला आशा दाखवीत. आलेला धोका टळला असे वाटले; कमला नेटाने टिकून राहिली. बराच वेळ बोलण्याइतपत तिला केव्हाही शक्ती नव्हती. आम्ही थोडेथोडे बोलत असू व तिला थकवा आला आहे असे दिसताच मी बोलणे थांबवीत असे. कधी कधी मी तिला वाचून दाखवीत असे. पर्ल बकची 'गुड अर्थ' ही कादंबरी अशा रीतीने वाचून दाखविल्याचे मला स्मरते. आणखीही काही पुस्तके वाचून दाखविली. माझे हे करणे तिला आवडे, परंतु आमची प्रगती फारच मंदगतीने होई.
त्या लहानशा गावात मी एक जागा घेतली होती. तेथून सकाळी व तिसरे प्रहरी मी त्या सॅनिटोनियमकडे चालत येत असे आणि कमलाबरोबर थोडेसे तास घालवीत असे. कितीतरी गोष्टी माझ्या मनात होत्या. तिला त्या सांगायची मला इच्छा होती. परंतु मी स्वत:ला प्रयत्नाने आवरीत असे, आवरणे भागच होते. कधी कधी मागच्या गोष्टी निघत, जुन्या आठवणी येत. हिंदुस्थानातील उभयतांच्या मित्रांसंबंधी बोलणे निघे. कधी कधी भविष्यासंबंधीही आम्ही बोलत असू. पुढे काय करायचे ते बेत ठरत. परंतु त्या बोलण्यात एक प्रकारची वेडी आशा असे. जरी तिची प्रकृती अत्यवस्थ होती तरी आशेने मी भविष्यकाळाला चिकटून राही. तिचे डोळे तेजस्वी चैतन्यमय दिसत व चर्या नेहमी उत्साही नि आनंदी दिसे. अधूनमधून क्वचित कुणी मित्र येत. कल्पनेपेक्षा तिची स्थिती सुधारलेली पाहून त्यांना आश्चर्य वाटे. ते तेजस्वी डोळे व हसती मुद्रा यामुळे त्यांची फसवणूक होई.
शरदॠतूतील त्या प्रदीर्घ सायंकाळी मी एकटाच माझ्या बिर्हाडी असे किंवा कधी शेतामधून किंवा झाडीतून फिरायलाही जात असे. माझ्या मनात एकामागून एक कमलेची शेकडो चित्रे येत. तिच्या समृध्द, खोल, विपुल अशा व्यक्तिमत्त्वातील शेकडो विशेष माझ्या डोळ्यांसमोर येत. आमचे लग्न होऊन आता वीस वर्षे झाली होती तरीही तिच्या मनाचे, तिच्या आध्यात्मिकतेचे एखादे नवीनच स्वरूप अद्याप मला एखादे वेळेस दिसे नि मी थक होत असे. किती विविध रीतींनी मी तिला पाहिले होते, तिचे अनेक विशेष समजून घेतले होते. पुढे पुढे तर तिचे पूर्णस्वरूप नीट कळावे म्हणून माझ्याकडून मी पराकाष्ठा केली होती. या कामात मला कधी अडथळा आला नाही, पण हिला आपण खरोखर पुरी ओळखली का ? हिचा स्वभाव आपल्याला नीट कळला का ? असे एखाद वेळेस, मनात आल्यावाचून राहात नसे. भूलोकापासून वेगळे, विरलदेही, खरे भासणारे पण पकडू म्हटले तर न सापडणारे असे काहीतरी तिच्यात होते. कधी कधी मी तिच्याकडे, डोळ्यांकडे बघे तेव्हा त्या डोळ्यांतून कोणीतरी अपरिचितच माझ्याकडे बघत आहे असे वाटे. काही थोडे शाळेतले शिक्षण यापलीकडे शिक्षणाच्या चाकोरीतून, त्या पध्दतीतून तिची बुध्दी तयार झालेली नव्हती. ती आमच्याकडे आली ती एक साधी सरळ मुलगी. आजच्या सुशिक्षित मुलींत मनोविश्लेषणशास्त्रातले 'गंड' असतात, असे म्हणतात, तसा काही प्रकार नव्हता. तिच्या तोंडावरील मुलीची अल्लड वृत्ती फारशी कधी गेलीच नाही. पुढे वाढत्या वयाबरोबर तिच्या डोळ्यांत मात्र गंभीरपणा आला, तेज आले. शांत सरोवराच्या मागे प्रचंड वादळे घोंघावत असावीत असे तिचे डोळे पाहून वाटे. आजकालच्या मुलींच्या ज्या सवयी असतात, त्या तिला नव्हत्या. अर्वाचीन मुलींचा नमुना म्हणून ती शोभली नसती. अर्वाचीन मुलींत संयम कमी असतो, तोल नसतो, तसे कमलाचे नव्हते. असे असूनही आधुनिकपणा तिने सहज उचलला. परंतु गुणविशेष ती भारतकन्या होती, त्यात विशेष करून काश्मिरी कन्या होती. अतिसंवेदनाशील, स्वाभिमानी, पोक्त असूनही अल्लड, शहाणी व वेडीही. ज्यांच्याशी परिचय नसे किंवा जे तिला आवडत नसत त्यांच्याशी ती मोकळेपणाने वागत नसे. परंतु ज्यांची ओळख असे, जी माणसे तिला आवडत त्यांच्याशी ती मोकळेपणाने हसे; त्यांच्याशी वागताना आनंदाने उत्साहाने उचंबळे. ती तत्काळ निर्णय घेई, तो बरोबरच असे, योग्य असे असे नाही. परंतु स्वत:च्या नैसर्गिक उपजत आवडीनावडींना ती चिकटून बसे. तिच्याजवळ आतबाहेर काही नव्हते. जर एखादा मनुष्य तिला आवडत नसला तर ते ताबडतोब दिसून येई. खरी गोष्ट लपवून ठेवण्याचा तिने कधी प्रयत्न केला नाही, तसा तिने कधी यत्न केला असता तर तिला त्यात यश आले नसते. प्रामाणिकपणाचा कमलाने जेवढा ठसा माझ्या मनावर उमटवला आहे तसा क्वचितच कोणी उमटवला असेल.