प्रकरण ६ : नवीन समस्या 37
बाहेरच्या हल्ल्याने संस्कृती नष्ट होत नाही इतकी आंतरिक रोगाने, आंतरिक दोषांमुळे ती नष्ट होते. कधी कधी तिच्यातील शक्ती संपल्यामुळे किंवा बदलत्या जगाला नवीन देण्यासारखे तिच्याजवळ काही उरले नसल्यामुळे ती नष्ट होते; किंवा त्या संस्कृतीच्या प्रतिनिधींचे स्खलन झाल्याने आणि आपली जबाबदारी योग्य रीतीने पेलण्याची त्यांच्यात कुवत नसल्याने ती संस्कृती नाहीशी होते. असेही असणे शक्य आहे की, सामाजिक संस्कृती अशा तर्हेची असते की, काही एका विशिष्ट मर्यादेनंतर प्रगतीच्या मार्गात तिचा अडथळा होतो. तो अडथळा दूर केल्या शिवाय पुढे प्रगती होऊच शकत नाही, किंवा प्रगती व्हावी म्हणून कधी कधी तिच्या गुणांत महत्त्वाचे फरकही करणे प्राप्त होते, तिचे स्वरूपच काही बाबतींत पार बदलावे लागते. तुर्की आणि अफगाण आक्रमणांच्या आधीच भारतीय संस्कृतीतील विनाश स्पष्ट दिसू लागला होता. या नवीनांच्या आक्रमणामुळे, जोरदार शिरकावामुळे, त्यांनी बरोबर आणलेल्या नवीन विचारांमुळे एक नवीन सामाजिक परंपरा, नवीन सामाजिक संबंध निर्माण झाले का ? बुध्दीची बंधने तोडणारा आणि नवीन शक्तीच्या झर्याला मुक्त करणारा असा काही प्रकार दिसून आला का ?
काही मर्यादेपर्यंत ही गोष्ट घडली. कला, वास्तुशास्त्र, चित्रकला, संगीत, जीवनाचे प्रकार, राहणी यांच्यावर परिणाम झाले. परंतु हे परिणाम फार खोलवर गेले नाहीत. वरवरचे हे फरक होते. सामाजिक संस्कृती बहुतांशी होती तशीच राहिली. काही बाबतीत ती अधिकच वज्रलेप, स्थाणुवत अशी झाली. अफगाणांनी प्रगतीची नवीन बीजे काही आणली नव्हती. देण्यासारखे नवीन असे त्यांच्याजवळ नव्हते. मागासलेल्या सरंजामशाही पध्दतीचे, जमातिप्रधान व्यवस्थेचे ते प्रतिनिधी होते. युरोपियन अर्थाने हिंदुस्थान सरंजामी नसला तरी हिंदी संरक्षणाचे आधारस्तंभ जे रजपूत त्यांची संघटना एक प्रकारे सरंजामशाही स्वरूपाचीच होती. मोगलही अर्धवट सरंजामशाहीच होते आणि मध्यवर्ती प्रबळ व अनियंत्रित राज्यसत्तेचे ते पुरस्कर्ते होते. रजपुतान्यातील मोघम सरंजामशाहीवर त्यांनी विजय मिळविला.
अकबराची जिज्ञासूवृत्ती, त्याची उत्कट शोधकबुध्दी, जगात काय चालले आहे हे पाहण्याकडे वळली असती तर सामाजिक क्रांतीचा, सामाजिक फेरबदलाचा त्याला पाया घालता आला असता. परंतु आपल्या साम्राज्याची बळकटी करण्यातच त्याची हयात गेली. त्यातच तो मग्न होता. धर्मप्रसार करणार्या इस्लामची हिंदुस्थानातील धर्मांशी कशी समजूत घालायची, दोघांचा सलोखा निर्मून, दोघांच्या रीतिभातींचा समन्वय निर्मून राष्ट्रीय ऐक्य कसे उभारावयाचे हा अकबरासमोर मोठा प्रश्न होता. धर्माचे बुध्दिप्रधान विवरण करण्याचा त्याने प्रयत्न केला, आणि क्षणभर असे वाटले की, भारतीय भूमीवर एक नवीनच महत्त्वाची घडामोड होणार, नवीन प्रकार दिसू लागणार. परंतु बुध्दीने धर्मासारख्या मूलभूत प्रश्नाला हात घालूनही येथे प्रश्न सुटले नाहीत, पुढे पाऊल पडले नाही. इतरत्रही अशा मार्गाने जाऊन फारसे यश आलेले आढळणार नाही.
म्हणून हिंदुस्थानात जी एक सामाजिक घडी होती. तिच्यात मूलभूत फरक अकबरानेही घडवून आणला नाही; आणि त्याने वातावरणात जी एक नवीन स्वतंत्र हवा आणली होती, जे एक बुध्दीचे साहस त्याने दाखविले होते, ती जी एक स्वतंत्र प्रवृत्ती त्याने नव्याने आणली होती, ते सारे त्याच्या नंतर विराम पावले, आणि आपले साचीव चाकोरीतले जीवन भारताने तसेच पुढे चालू ठेवले. *