प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 33
हिंदुस्थानात ब्रिटिश सत्तेचा उदय झाल्यापासून मुसलमानांत लोकोत्तर व्यक्ती-अर्वाचीन स्वरूपाच्या लोकोत्तर व्यक्ती-फारशा झाल्या नाहीत. जवळजवळ नाहीच म्हणा ना. काही नामवंत व्यक्ती झाल्या, नाही असे नाही. परंतु प्राचीन संस्कृती आणि परंपरा पुढ चालविणारे ते होते. अर्वाचीन प्रगतीशी त्यांचे सहजासहजी जुळत नसे. बदलत्या काळाबरोबर पुढे जाणे, सांस्कृतिक दृष्ट्या आणि इतर रीतींनी नव्या परिस्थितीशी जुळवून घेणे हे त्यांना जमेना. मुसलमानांत काही स्वाभाविकत:च उणिवा आहेत म्हणून हे होई असे नाही. याला काही ऐतिहासिक कारणे आहेत. नवीन प्रकारचा औद्योगिक मध्यमवर्ग निर्माण व्हायला उशीर झाला. तसेच मुसलमानांमध्ये अतिशयत्वाने असणार्या सरंजामशाही वृत्तिप्रवृत्ती ज्यांच्यामुळे विकासाचा, वाढीचा रस्ता अडे, आणि बुध्दीला कार्यक्षेत्रच न उरे. बंगालमधील मुसलमान अधिकच मागासलेले होते, त्याची दोन कारणे होती. ब्रिटिश राजवटीच्या आरंभीच्या काळात मुसलमानांतील वरचे वर्ग नष्ट झाले आणि हिंदूंतून धर्मान्तर करून जे आले ते अत्यंत खालच्या वर्गापैकी होते; त्यांना वाढीची, निकास करून घेण्याची संधी कधी मिळालेली नव्हती. उत्तर हिंदुस्थानातील सुसंस्कृत असा वरिष्ठ मुस्लिम वर्ग जुन्या परंपरागत रीतिभातींशी आणि जमीनदारी पध्दतीशी जखडलेला होता. अलीकडे अलीकडे मुसलमानांत स्पष्ट फरक दिसून येत आहे आणि नव्या मध्यमवर्गाची झपाट्याने निर्मिती होत आहे. परंतु हिंदूंच्या आणि इतरांच्या मानाने विज्ञान व उद्योगधंदे यांत ते फार मागासलेले आहेत. हिंदूही मागासलेले आहेत. मुसलमानांपेक्षाही कधीकधी रूढिबध्द आणि प्रगती न करता स्थाणुवत राहणारे असे ते दिसतात. परंतु तरीही त्यांच्यात विज्ञान, उद्योगधंदे, इतर क्षेत्रे यांतील फार मोठमोठी माणसे पैदा झाली आहेत. लहानशा पारशी समाजातही अर्वाचीन उद्योगधंद्यांतील अव्दितीय माणसे निर्माण झाली आहेत. लक्षात ठेवण्यासारखे आहे की जिनांचे कुटुंबही मूळचे हिंदूच होते.
हिंदू आणि मुसलमान दोघांतील बरीचशी बुध्दिमत्ता आणि हुशारी सरकारी नोकरी-चाकरीकडे गेली. कारण आकर्षक असे तेवढेच काय ते क्षेत्र मोकळे होते. स्वातंत्र्याची चळवळ जसजशी वाढू लागली तसतसे सरकारी नोकरीचे आकर्षण कमी होऊ लागले आणि उत्कटवृत्तीची, धडाडीची, समर्थ अशी माणसे स्वातंत्र्याच्या चळवळीकडे ओढली जाऊ लागली. अशा रीतीने मुसलमानांतीलही काही उत्कृष्ट नमुने राष्ट्रसभेकडे आले, तिला मिळाले. अगदी अलीकडे अलीकडे तरुण मुसलमान मंडळी समाजवादी किंवा कम्युनिस्ट पक्षालाही जाऊन मिळू लागली आहेत. परंतु हे सारे उत्कटवृत्तीचे आणि पुरोगामी प्रवृत्तीचे लोक सोडले तर एकंदरीत मुसलमानांत लायक पुढार्यांची चणचणच दिसून येईल, आणि म्हणून पुढे येण्यासाठी सरकारी नोकरीकडे पाहण्याचीच त्यांची वृत्ती होई. जिनांचा एक निराळाच नमुना आहे. ते हुशार आहेत, चिकाटीचे आहेत; त्यांना सरकारी नोकरी-चाकरीचा मोह नाही. इतर मुसलमान पुढार्यांत बड्याबड्या जागांचा कोण मोह. परंतु जिना याबाबतीत अलिप्त आहेत, आणि म्हणूनच मुस्लिम लीगमधील त्यांचे स्थान एकमेवाव्दितीयम् असे आहे. लीगमधील दुसर्या प्रतिष्ठित धेंडांना जो मानसन्मान मिळणे अशक्य, तो जिनांना सहज मिळतो. त्यांना मान दिल्याशिवाय राहवत नाही. एकाच गोष्टीला हट्टाने चिकटून बसल्यामुळे दुसर्या नव्या विचारांच्या ग्रहणासाठी त्यांच्या मनाचे दार उघडतच नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. स्वत:च्या संघटनेवर निर्विवाद हुकमत असल्यामुळे जिना हे दुसर्या संघटनांविषयी आणि मतभेद असणार्यांविषयी अत्यंत असहिष्णू असे झाले आहेत. परंतु मुस्लिम लीग जसजशी बहुजन मुस्लिमांची होऊ लागली, तसतसा प्रश्न उभा राहू लागला की, हे जुनाट विचारांचे सरंजामी नेतृत्व कोठवर तग धरणार ? कोठवर टिकाव धरू शकणार ?
राष्ट्रसभेचा अध्यक्ष असताना अनेकवार जिनांना पत्रे लिहून मी विचारले की, काय केले असता तुमचे समाधान होईल ते स्वच्छ सांगा. आम्ही काय करावे असे तुम्हाला वाटते ते नीट रीतीने मांडा. लीगचे मागणे काय आणि निश्चित प्राप्तव्य काय ते सांगा म्हणून मी लिहिले. राष्ट्रसभेच्या मंत्रिमंडळाविरुध्द तुमचे निश्चित आरोप काय तेही कळवा म्हणून सांगितले. माझा हेतू असा होता की, पत्रद्वारा आम्ही अनेक गोष्टींचा नीट उलगडा करू शकू. जिनांनी लांबलचक उत्तरे धाडली, परंतु त्यातून मला प्रकाश मिळेल तर शपथ. नेमके काय पाहिजे ते सांगण्याचे त्यांनी टाळले; मुस्लिम लीगची कोणती गार्हाणी आहेत त्यासंबंधीही स्वच्छ त्यांनी काही लिहिले नाही. त्यांनी मलाच काही निश्चित लिहिण्याचे टाळले असे नाही, इतरांच्याही बाबतीत त्यांनी हेच केले. पुन:पुन्हा आम्ही एकमेकांस पत्रे पाठवली. परंतु सदैव तेच गोलमेल, अनिश्चित असे लिहिणे. निश्चित असे मला कधीच उत्तर मिळाले नाही. मला खरोखर याचा अचंबा वाटला आणि मला एक प्रकारे थोडे अगतिक असेही वाटले. कारण करायचे तरी काय ? असे दिसले की जिना कोणत्याही बाबतीत बांधून घ्यायला तयार नव्हते. तडजोड व्हावी अशी त्यांना खरोखर उत्कट इच्छाच नव्हती.