प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 14
जसजसा मनुष्य पोक्त होत जातो तसतसे ह्या बाह्य दृश्य जगात त्याचे मन गढून राहात नाही व तेवढ्यावर त्याचे समाधान होत नाही. या जीवनातील आंतरअर्थ तो शोधू लागतो. त्याला मनाचे समाधान हवे असते. हे जसे व्यक्तीच्या बाबतीत दिसते तसेच राष्ट्रांच्या व संस्कृतींच्या बाबतीतही दिसून येते. राष्ट्रे किंवा संस्कृती जसजशी प्रौढावस्थेला जातात तसतशी त्यांची वृत्ती अधिक अंतर्मुख होते. कोणतीही संस्कृती घ्या, कोणतेही लोक घ्या, आंतर आणि बाह्य जीवनातील हे समांतर प्रवाह त्यांच्यात दिसून आल्याशिवाय राहणार नाहीत. या आध्यात्मिक आणि आधिभौतिक जीवनांच्या प्रवाहांचा संगम झाला किंवा निदान ते एकमेकांना अगदी लागून वाहत राहिले तर त्या राष्ट्राला वा संस्कृतीला समतोलपणा व स्थिरता लाभलेली आढळते. परंतु जर हे प्रवाह भिन्न दिशेने वाहू लागून त्यांच्यात विरोध आला तर मनाला व आत्म्याला क्लेश देणारी क्रांतीची परंपरा येते.
ॠग्वेदापासून पुढे आपण जसजसे जाऊ तसतसे जीवनाचे आणि विचाराचे हे दोन्ही प्रवाह वाढत चालले आहेत असे आपणांस दिसेल. प्रथम प्रथम हे प्रवाह या भौतिक जगातच रमताना दिसतात; निसर्गाचे सौन्दर्य आणि गूढता, संसाराचा आनंद, ओतप्रोत भरून राहिलेली जीवनशक्ती या गोष्टी आरंभी या प्रवाहातून दिसतात. ग्रीक देवदेवतांप्रमाणे येथले देवदेवता माणसासारख्या वाटतात. कथापुराणांतून हे देव स्वर्ग लोकातून भूलोकावर येऊन मानवांच्या संगतीत वावरताना दिसतात. देव आणि मानव यांच्यात स्पष्ट विभाग दाखविणारी अशी रेषा दिसत नाही. परंतु याच्यानंतर विचार सुरू झालेला, जिज्ञासावृत्ती जागी झालेली दिसते. इंद्रियातील अशा जगासंबंधीची गूढता अधिकच सखोल व गंभीर होते. भरपूर प्रमाणात जीवनप्रवृत्ती टिकलेली दिसते, परंतु जीवनाच्या बाह्य आविष्कारापासून हळूहळू निवृत्तीही दिसू लागते. सामान्यपणे कानांनी ऐकू न येणार्या, डोळ्यांना न दिसणार्या व सामान्य माणसाला अनुभवता न येणार्या या दृश्य सृष्टीकडे लक्ष लागून, दृष्टी अंतर्मुख होताच एक प्रकारची अनासक्त वृत्ती वाढते. या सर्व चराचराचा, या सर्व जीवनाचा हेतू काय ? विश्वात काही हेतुमयता आहे का ? आणि विश्वाचे काही उदिष्ट असेल, प्राप्तव्य असेल तर त्याच्याशी मानवी जीवनाचा मेळ कसा घालायचा ? ते त्याच्याशी सुसंवादी कसे करायचे ? दृश्य आणि अदृश्य जगांच्या मध्ये आपण सुसंवादी संबंध निर्माण करून या एकतानतेच्या साहाय्याने हे जीवन जगण्याचा योग्य मार्ग सापडणे शक्य आहे का ?
अशा रीतीने इतर देशांप्रमाणे हिंदुस्थानातही हे वृत्ती व निवृत्तीचे दोन विचारप्रवाह-जीवनाचा स्वीकार व प्रवृत्ती की जीवनापासून पराङ्मुखता व निवृत्ती-बरोबरीने वाढत होते. कधी या तर कधी त्या वृत्तीवर निरनिराळ्या कालखंडांत निरनिराळ्या वृत्तिप्रवृत्तींवर जोर दिलेला पाहायला मिळतो. परंतु काही असले तरी या संस्कृतीची पार्श्वभूमी पारलौकिक नव्हती. संसार असार आहे या वृत्तीची नव्हती. तात्त्विक चर्चाप्रसंगी जगाचे माया म्हणून वर्णन येत असेल, हे जगत् म्हणजे केवळ आभास आहे असे जरी प्रतिपादिले जात असले, तरी हा विचार निरपेक्ष असा नसून सापेक्ष होता. अंतिम सत्याच्या दृष्टीने हे जगत् म्हणजे माया किंवा आभास आहे असा हा सापेक्षवाद होता. (प्लेटोच्या 'सत्याच्या छाये' प्रमाणेच हा विचार आहे.) त्या प्रवृत्तिनिवृत्ती वादाच्या पार्श्वभूमीतसुध्दा दोन्ही वृत्तींत असे दिसते की, दोन्हीतही हे जग आहे ते असे आहे हे जमेस धरूनच संसार नेटका करून जीवनातील बहुविध सौंदर्याचा आनंदाने उपभोग घेण्याचा प्रयत्न सुरू होतो. हिंदी संस्कृतीपेक्षा सेमिटिक संस्कृती अधिक पारलौकिक दृष्टीची असावी; कारण त्या संस्कृतीपासून जे धर्म निघाले त्यांचा आणि विशेषत: प्रारंभीच्या ख्रिश्चन धर्माचा परलोकावर जास्त भर होता. टी. ई. लॉरेन्स म्हणतो, ''विजयी व पराभूत अशा सर्व सेमिटिक धर्मांना सामान्य असे मूलभूत तत्त्व असे आहे की, संसार असार आहे. आणि या विचारामुळे कधी सुखविलासांना ऊत आलेला दिसतो, तर कधी संपूर्ण वैराग्य दिसते.''
हिंदुस्थानात जेव्हा जेव्हा संस्कृतीला बहर आलेला दिसतो तेव्हा तेव्हा निसर्गाचा व संसाराचा उपभोग घेण्यात भरपूर आनंद, सुखाचे जिणे जगण्याची हौस व कला, संगीत, साहित्य, गायन, नृत्य, चित्रकला या सर्वांचा विकास झालेला आढळतो. कामशास्त्राचीसुध्दा अगदी सुसंस्कृत सांकेतिक चर्चा झालेली आहे. जर हिंदी संस्कृती संसार असार म्हणणारी असती, जीवनाकडे पाहण्याची हिंदी दृष्टी पारलौकिक वृत्तीची असती तर हे सारे कलाविलास व कलाविकास, विविध विपुल जीवनाचे हे आविष्कार आपणास दिसले नसते. जी संस्कृती मुळात पारलौकिक वृत्तीची आहे ती हजारो वर्षे सतत चालूच राहिली नसती. ही गोष्ट स्पष्टच आहे.