प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 10
याप्रसंगी अहिंसेचे धोरण तात्पुरते लोपले असले तरी अहिंसाव्रताचे शिक्षण इतके दिवस घेता घेता लोकांना जी शिस्त लागली होती तिचा एक महत्त्वाचा इष्ट परिणाम झाला. लोकांच्या भावना इतक्या प्रक्षुब्ध झाल्या होत्या तरीसुध्दा वर्णद्वेषाची, काळ्यागोर्यांत फरक ठेवण्याची भावना त्यांत मुळीच नव्हती म्हटली तरी चालेल, आणि एकंदरीत पाहता प्रतिपक्षाला होता होईल तो शारीरिक दुखापत न करण्याची दक्षता लोकांनी पाळली. देशातील दळणवळणाची साधने व सरकारी मालमत्ता यांची पुष्कळच नासधूस करण्यात आली पण ती चालली असतानादेखील काही प्राणहानी होऊ नये इकडे लोकांनी विशेष लक्ष दिले. पोलिस किंवा इतर सशस्त्र सैन्याशी प्रत्यक्ष झटापटी होत त्या प्रसंगी प्राणहानी टाळणे सर्वस्वी नेहमीच शक्य नव्हते. सरकारनेच प्रसिध्द केलेल्या माहितीवरून, निदान मला आढळले त्याप्रमाणे सबंध हिंदुस्थानात मिळून ह्या दंग्यातून जमावाच्या हातून सुमारे १०० लोक मारले गेले. हे दंगे लहान की मोठे असे त्यांचे प्रमाण व ते कोठे कोठे झाले याचा क्षेत्रविस्तार पाहिला तर व झाल्या त्या झटापटी पोलिसदलाशी झाल्या हे लक्षात घेतले तर झाली ती प्राणहानी अगदी थोडी वाटते. झालेल्या प्रकारांपैकी एक विशेष क्रूरपणाचा व दु:खदायक प्रकार घडला तो म्हणजे बिहारमध्ये कोठेतरी जमावाच्या हातून दोन कॅनिडिअन वैमानिकांची हत्या झाली. पण एकंदरीत पाहता या दंग्यात वर्णद्वेषाचा जो प्रभाव आढळतो तो विशेष लक्षात येण्यासारखा आहे.*
---------------------
* क्लाइव्ह ब्रॅनसन नावाच्या एका सैनिकाने लिहिलेल्या पत्रांचा संग्रह 'एका ब्रिटिश सैनिकाला हिंदुस्थानात काय दिसले' या नावाने प्रसिध्द झाला आहे. त्यात एका प्रसंगाचे वर्णन आले आहे त्यावरून ह्या काळात घडलेल्या गोष्टींवर खूपच प्रकाश पडतो. ब्रॅन्सन हा या युध्दापूर्वी धंद्याने कलाकार व मताने कम्युनिस्ट होता. स्पेनमधील यादवी युध्दात 'आंतराष्ट्रीय दल' या तुकडात त्याने काम केले होते व सन १९४१ साली तो ब्रिटिश सैन्याच्या 'रॉयल आर्मर्ड कोअर' या विभागात नोकरीला लागला आणि त्यात तो सार्जंट होता. सन १९४२ साली त्याला त्याच्या पलटणीबरोबर हिंदुस्थानात यावे लागले. सन १९४४ फेब्रुवारीत ब्रह्मदेशात आराकानमध्ये तो लढाईत मारला गेगला. सन १९४२ साली काँग्रेस पुढार्यांना अटक झाली. त्यानंतर तो मुंबईस होता. त्या वेळी मुंबईत लोक खवळून गेले होते व त्यांच्यावर गोळीबार सुरू होता. त्या काळाबद्दल ब्रॅनसनने खाली दिल्याप्रमाणे उद्गार काढल्याचे त्याच्या पुस्तकावरून दिसते : ''तुमची राष्ट्रीय वृत्ती किती मोकळ्या मनाची, किती निकोप आहे ! वाटेवरच्या लोकांना मी तेथली कम्युनिस्ट कचेरी मोठे आहे म्हणून विचारले. माझ्या अंगावर गणवेश होता, माझ्यासारखाच गणवेश घातलेले सैनिक नि:शस्त्र हिंदी लोकांना गोळ्या घालून मारून टाकत होते, म्हणून मला साहजिकच कसेसेच वाटत होते, हे विचारताना. हे वाटेवर भेटलेले लोक ह्या सार्या परिस्थितीत कसे वागतील त्याचा नेम वाटत नव्हता माला, पण जो जो मला भेटला त्याने मला आस्थापूर्वक मदत केली, कोगणीही माझा अपमान केला नाही, आणि माझी वाट मुद्दाम चुकविण्याकरिता भलताच रस्ता कोणीही दाखविला नाही.''
------------------------------
१९४२ च्या दंग्यातून गोळीबार होऊन पोलिस व सैन्याच्या हातून जखमी झालेल्या व मारल्या गेलेल्या लोकांचे आकडे सरकारी अंदाजाप्रमाणे आहेत ते असे : १०२८ लोक प्राणास मुकले, ३२०० लोकांना जखमा झाल्या. हा सरकारी अंदाज खात्रीने चुकीचा आहे. त्यातले आकडे भलतेच कमी दाखवलेले आहेत, कारण सरकारी माहितीवरूनच असे दिसते की, असे गोळीबाराचे प्रसंग ५३८ वेळा आले आणि याखेरीज रस्त्यावरून लष्करी गाड्या फिरवून त्यातून पोलिस व लष्करच्या शिपायांनी येणार्या-जाणार्यावर मधूनमधून गोळ्या झाडल्या ते वेगळेच. तेव्हा, जमखी व मेलेल्या लोकांची संख्या जेमतेम अंदाजी सुध्दा सांगणे कठीण आहे. लोकांच्या सर्वसाधारण अंदाजावरून ही संख्या २५००० मेलेल्यांचीच भरते असे बोलले जात होते. पण बहुधा ही अतिशयोक्ती असावी. हा एकूण आकडा सुमारे १०००० च्या आसपास असावा.