प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 48
टागोर व गांधी यांच्या संबंधीचे हे विवेचन म्हणजे वर्तमानकालासंबंधीची चर्चा होते. पण प्रस्तुत विचार चालला होता तो त्याच्या अगोदर विवेकानंद व तत्कालीन विचारवंतांनी भारताच्या प्राचीन वैभवाचा जो विशेष उल्लेख चालविला होता व त्या वैभवाचा त्यांना जो अभिमान वाटत होता, त्यामुळे भारतीय जनतेवर, विशेषत: हिंदू समाजावर काय परिणाम झाला ते आपण पाहात होतो. केवळ भूतकालात गढून जाऊ नका, भविष्याकडे दृष्टी ठेवा असे विवेकानंदांनी स्वत: अनेकदा बजाविले आहे. ते लिहितात : ''देवा प्राचीन कालातच गढून राहण्याची ही आमची प्रवृत्ती कधी सुटेल ?'' पण स्वत: त्यांनी व तत्कालीन विचारवंतांनीच त्या प्राचीन कालाला आवाहन केले होते, त्या प्राचीन कालाची जी मोहिनी होती तिच्यातून सुटकाच नव्हती.
ही प्राचीन कालाकडे, मार्ग वळून सारखे पाहात बसण्याची व त्या प्राचीन कालाचेच सुख मानून तेवढ्यावर निर्वाह करण्याची जी वृत्ती होती, ती प्राचीन वाङ्मयाचा व इतिहासाचा जो पुन्हा अभ्यास चालला होता त्यामुळे बळावली. पूर्वेकडील समुद्राच्यापार भारतीयांनी ज्या वसाहती स्थापन केल्या होत्या त्यांचा इतिहास जसजसा अधिक सापडू लागला तसतशी आणखी या वृत्तीची वाढ होऊ लागली. हिंदू समाजाच्या मध्यमवर्गीयांना त्यांच्या पूर्वजांनी त्यांच्याकरता ठेवलेल्या आध्यात्मिक व राष्ट्रीय पितृधनाबद्दल जो भरवसा वाटत होता त्यात श्रीमती अॅनी बेझंट यांच्या प्रभावाची खूपच भर पडली. हे जे सारे घडत होते त्याच्याभोवती धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरण होतेच. परंतु त्याच्यापाठीमागे प्रबळ अशी राजकीय पार्श्वभूमी होती. उगवती मध्यमवर्गीय पिढी राजकीय वृत्तीची होती. परंतु चिकटून राहायला, पाय रोवायला सांस्कृतिक आधारही त्यांना हवा होता. आपल्यातही काही सत्ता आहे, पात्रता आहे याचा पुरावा त्यांना हवा हाता. विफलतेची, दीनवाणेपणाची जी भावना परकीय आक्रमाणामुळे आणि सत्तेमुळे निर्माण झाली होती, ती नष्ट करायला आपल्याजवळही काही मोलाचे आहे हा आत्मविश्वास उपयोगी पडला असता. ज्या ज्या राष्ट्रात राष्ट्रीयतेची भावना वाढत असते, तेथे तेथे भूतकाळात जाण्याची ही वृत्ती दिसून येते. केवळ धर्म म्हणून हे भूतकाळात जाणे नसते. आपण वैभवशाली होतो ही पुन्हा एकदा आत्मविश्वासाची जाणीव वैभवशाली होऊ अशी श्रध्दा निर्मायला उपयोगी पडत असते इराणही आपली आजची धर्मश्रध्दा यक्तिंचितही कमी होऊ न देता इस्लामपूर्व अशा स्वत:च्या गौरवपूर्ण भूतकाळाकडे हेतुपुरस्सर पाहू लागला; आणि आजची राष्ट्रीयतेची भावना त्या स्मरणाने वाढवू लागला. इतर देशांतही हाच प्रकार दिसून येईल. हिंदुस्थानचा भूतकाळ सर्वांनी बनविला आहे. हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन इत्यादी सर्वांनी ही विविध रंगी संस्कृती, हा भूतकालीन मोठेपणा निर्मिला आहे. त्या सर्वांचा समान वारसा आहे. धर्मांतरामुळे हा वारसा जातो असे नाही. ग्रीक जरी ख्रिश्चनधर्मी झाले तरी पूर्वजांच्या थोर वैभवाविषयीचा, थोर कर्तृत्वाविषयीचा त्यांचा अभिमान तिळभरही कमी झाला नाही; किंवा रोमन साम्राज्याच्या आरंभीचे वैभवशाली दिवस, रोमन प्रजासत्ताकाचे दिवस पुढे ख्रिश्चन धर्म आला तरी इटॅलियन लोक विसरत नाहीत. हिंदुस्थानातील सारे लोक मुसलमान किंवा ख्रिस्ती झाले असते तरीही पूर्वीच्या सांस्कृतिक वारशामुळे त्यांना सदैव स्फूर्तीच मिळाली असती; जीवनाचे नानाविध प्रश्न सोडविताना जे मानसिक क्लेश, दीर्घकालीन सांस्कृतिक जीवन जगताना पडत असतात, अशा सांस्कृतिक परंपरेच्या प्राप्तीमुळे एक प्रकारची धीर गंभीरता, उदात्तता, समतोलपणा प्राप्त होतो, तोही या लोकांना मिळाला असता.