प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 64
ह्या महायुध्दातून दोन गोष्टी ठळक दिसू लागल्या आहेत त्या अशा की, संयुक्त अमेरिकन संस्थाने व संयुक्त रशियन लोकराज्ये यांचे सामर्थ्य पूर्वीच्या मानाने कितीतरी वाढले आहे आणि त्यांच्याजवळ हल्ली असलेल्या व यापुढे त्यांना मिळवता येणे शक्य असलेल्या धनसंपदेचे प्रमाणही पूर्वीच्या मानाने खूप वाढले आहे. तसेच पाहिले तर संयुक्त रशियन लोकराज्यांची या युध्दात पुष्कळच प्रचंड प्रमाणावर नासधूस झाल्यामुळे निदान आजच्या स्थितीत युध्दापूर्वीच्या मानाने ते धनसंपन्न नाही, पण मनात आणल्यास सर्व प्रकारची संपादन करण्याची त्या राज्याची सुप्तशक्ती फारच प्रचंड आहे, त्यामुळे युध्दात झालेली हानी ते राज्य तेव्हाच भरून काढून झपाट्याने पुढे जाणार. भौतिक आणि आर्थिक सामर्थ्याच्या दृष्टीने रशियाच्या तोडीचे राज्य युरोप व आशिया मिळून होणार्या युरेशियाखंडात दुसरे कोणतेही नाही. आता एवढ्यातच त्यांची वृत्ती आपल्या राज्याचा विस्तार वाढविण्याची दिसू लागली आहे, आणि पूर्वी रशियाच्या झारचे जे साम्राज्य होते त्याच प्रदेशावर हल्लीच्या ह्या रशियन लोकराज्याने आपला राज्यविस्तार वाढविणे चालविणे आहे. हा त्यांचा क्रम कोठपावतो चालेल ते सांगणे कठीण आहे. त्यांचा राज्यकारभार समाजसत्तावादाच्या तत्त्वावर चालविला जात असल्यामुळे वास्तविक, त्यांना आपल्या राज्याचा विस्तार करण्याची काही आवश्यकता नाही, कारण त्यांना लागणार्या सर्व वस्तू त्यांच्याच लोकराज्यात निर्माण करून आपले राज्य स्वयंपूर्ण करणे त्यांना शक्य आहे. परंतु समाजसत्तावादाशिवाय आणखीही इतर विचारप्रवाह त्या राज्यात प्रबल झाले आहेत व इतर देशांविषयी त्यांना पूर्वी वाटत असलेले संशय आजही त्यांना वाटत आहेतच, त्यामुळे रशियालाही भोवतालच्या राष्ट्रांची, तो तथाकथित शत्रुव्यूह आपल्याभोवती रचला जाण्याची भीती भेडसावू लागली आहे असे दिसू लागले आहे. परंतु ते काहीही असले तरी यापुढे अनेक वर्षे रशिया युध्दात झालेली स्वत:ची हानी भरून काढण्याच्या कामी गर्क राहणार असे दिसते. पण ही वर्धिष्णुवृत्ती, प्रत्यक्ष क्षेत्रविस्तार होत नसला तरी अन्य मार्गाने आपला राज्यविस्तार वाढविण्याची प्रवृत्ती रशियाच्या ठायी उघड दिसते आहे. रशियाच्या अनेक जुन्या भगत मंडळींनी आश्चर्याचा धक्का बसण्यासारखे काही प्रकार अलीकडच्या काही वर्षांत तेथे घडले असले तरी एवढे मात्र खरे की राजकीय दृष्ट्या एकवटलेले व आर्थिक दृष्ट्या यथाप्रमाण व्यवस्था असलेले राज्य म्हणून जे रशियाचे चित्र मांडले जाते तसले चित्र दुसर्या कोणत्याही देशाचे आढळत नाही. रशियाचे जे सध्याचे पुढारी आहेत त्यांचे नेतृत्व अढळ आहे, आणि त्यांच्या मनात भावी कालाचे जे बेत असतील त्यावर पुढचे सारे काही अवलंबून आहे.
अमेरिकन संयुक्त राज्यात प्रत्येक प्रकारच्या नानाविध वस्तूंचे व मालाचे जे प्रचंड प्रमाणावर उत्पादन होते आहे, योग्य त्या माणसांची व सामग्रीची जुळवाजुळव करून त्या कामाच्या कारभाराची सांगोपांग व्यवस्था लावण्यात तेथे जी कार्यक्षमता दिसून येते आहे ती पाहून सारे जग चकित होऊन गेले आहे. अमेरिकेच्या महत्त्वाची कामगिरी बजावली खरी, पण त्याबरोबरच दुसरे एक असे घडले की, अमेरिकन अर्थव्यवस्थेतच अंगीभूत असलेल्या दुसर्या एका क्रियापध्दतीची गतीही त्याबरोबर वाढली व त्यामुळे त्यांच्यापुढे आता असा काही पेच उभा राहिला आहे की, तो सोडविण्याकरिता त्यांना आपली सारी बुध्दी, सारी शक्ती वापरावी लागेल असा प्रसंग आला आहे. त्यांच्या देशाची जी अर्थव्यवहारपध्दती ठरलेली आहे तिच्या मर्यादा संभाळून त्या कक्षेतच हा प्रश्न सोडवू म्हटले तर अंतर्गत व बहिर्गत संघर्ष होऊ न देता ते करणे त्यांना कितपत शक्य आहे ते सांगणे कठीण आहे. अमेरिकेने आपले एकलकोंडेपणाचे, इतर राष्ट्रांच्या कारभारात न पडण्याचे आतापर्यंतचे आपले धोरण सोडून दिले आहे असे म्हणतात. तसे व्हायचेच, कारण आता त्यांना त्यांच्या मालाला बाहेरदेशी गिर्हाईक शोधणे प्राप्तच आहे. परदेशात आपला माल खपवणे ही बाब, त्यांच्या महायुध्दापूर्वीच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची नव्हती, पण आता यापुढे नेमकी तीच बाब महत्त्वाची होऊन बसणार. महायुध्दातल्या काळात जगभर माल खपत होता त्या हिशेबाने उत्पादन चालले, वाढले. पण आता शांततेच्या काळात हा सारा माल कटकटी केल्याशिवाय, इतरांना विरोध केल्याशिवाय खपणार कुठे? आणि सैन्यात गुंतलेले दशलक्षावधी सैनिक युध्दातून व सैन्यातून रिकामे झाले की परत त्यांच्या योगक्षेमाची व्यवस्था लावावयाची कोठे? हा सैन्यातून कमी केलेल्या सैनिकांचा प्रश्न प्रत्येक युध्यमान राष्ट्रापुढे आहेच, पण तो अमेरिकेच्या इतका कोणापुढे नाही. निरनिराळ्या व्यवहारोपयोगी मालाचे उत्पादन करण्याला लागणारी यंत्रे व रसायने यांच्यात जे नवेनवे शोध लागून मोठे प्रचंड स्थित्यंतर घडून आले आहे त्यामुळे एकतर मालाचे उत्पादन व त्याचा खप यांचे प्रमाण भलतेच व्यस्त होईल, किंवा नव्या लागलेल्या या शोधामुळे त्या त्या कामाला लागणार्या कामकर्यांची संख्या घटून जिकडे तिकडे बेकारी वाढेल, किंवा या दोन्ही आपत्ती कमी-अधिक प्रमाणात पण एकदमच देशावर येतील. कामकर्यांची संख्या कमी करू गेले तर त्यामुळे तीव्र असंतोष मातेल, व संयुक्त अमेरिकन राज्याने आपले असे धोरण प्रसिध्द केले आहे की, कामकर्यांची संख्या कोणत्याही कारखान्यातून कमी होऊ नये, सैन्यातून कमी केलेल्या व युध्देपयोगी कार्यातून निघालेल्या लोकांची कामधंद्यांची सोय कशी व कोठे लावावी, त्यांना कोणत्या उपयुक्त कार्यात गुंतवावे व देशात बेकारी कशी टाळावी याबद्दल अमेरिकेत खूपच विचार चालला आहे. त्या देशातील अंतर्गत स्थितीवर या सार्या घडामोडींचा काहीतरी परिणाम होणारच आणि तेथील अर्थव्यवहारपध्दतीत काही मूलगामी फरक केले नाहीत तर ते परिणाम विशेषच होणार; परंतु या अंतर्गत परिणामाखेरीज इतर देशांवर होणारे आंतरराष्ट्रीय परिणामही तितकेच महत्त्वाचे ठरतील.