प्रकरण ६ : नवीन समस्या 9
या काव्यमय वर्णनावरून महमुदाने केलेल्या संहाराची थोडीशी कल्पना येते, पण त्याबरोबरच हे लक्षात ठेवले पाहिजे की, महमुदाने उत्तर हिंदुस्थानाच्या एकाच भागाची आणि तीही जो स्वारीच्या वाटेवर लागला तेवढ्याच भागाची जाताजाता ही कत्तल, जाळपोळ, लुटालूट केली. मध्य, पूर्व व दक्षिण हिंदुस्थान त्याच्या तडाख्यातून संपूर्ण वाचला.
-------------------------
* मी तुर्क किंवा तुर्की असा शब्द बरेच वेळा वापरला आहे. हल्ली तुर्कस्थानातील लोकांना जे उस्मान अली किंवा आयेमन तुर्कांचे वंशज आहेत त्यांनाच हा शब्द वापरण्यात येतो, त्यामुळे गोंधळ होण्याचा संभव आहे. परंतु तुर्क अनेक प्रकारचे होते. सेल्जुक तुर्कांचा एक प्रकार होता. मध्य आशिया, चिनी तुर्कस्थान यांतील सर्वच तुरानियन जातिजमातींना तुर्क, तुर्की असा शब्द लावायला हरकत नाही.
दक्षिण हिंदुस्थानात त्या वेळेस आणि त्यानंतरही चोलांचे प्रबळ राज्य होते. समुद्रावर त्यांची सत्ता होती, आणि जावा-सुमात्रातील श्रीविजयापर्यंत ते पोचले होते. पूर्व समुद्रातील हिंदी वसाहती बलवान होत्या, भरभराटीत होत्या, त्यांच्यात आणि दक्षिण हिंदुस्थानात समुद्रसत्ता विभागलेली होती. परंतु उत्तर हिंदुस्थानावर जमिनीच्या मार्गाने हल्ला आल्यामुळे या समुद्रसत्तेने तो टळला नाही.
महमुदाने पंजाब व सिंध आपल्या राज्यास जोडून टाकले व प्रत्येक स्वारीनंतर तो गझनीस परत गेला. काश्मीर तो जिंकू शकला नाही. हा डोंगराळ, पहाडी प्रदेश होता, त्यामुळे महमुदाला हटावे लागले, हरावे लागले. राजपुतान्यातही त्याला चांगला मार खावा लागला. काठेवाडातील सोमनाथच्या स्वारीहून परत जात असता त्याला हा तडाका बसला.* ही त्याची शेवटची स्वारी होती. तो पुन्हा परत आला नाही.
महमुदाचे धर्मापेक्षा युध्दाकडेच फार लक्ष होते, आणि इतर अनेक जेत्यांप्रमाणे धर्माच्या नावाचा स्वत:च्या स्वार्थासाठी त्याने उपयोग करून घेतला. आपल्या देशाला जेथून लूट नेता येईल, इतर अनेक प्रकारची साधनसंपत्ती नेता येईल, असा एक देश या नात्यानेच तो हिंदुस्थानाकडे पाही. त्याने हिंदुस्थानातही सैन्यभरती केली, आणि त्याच्या विश्वासातल्या तिलक नावाच्या एका हिंदू सेनापतीच्या हाताखाली ती सेना दिली. या सैन्याचा मध्य आशियातील स्वधर्मीयांशी लढताना त्याने उपयोग केला.
--------------------
* या पराजयाची हकीकत ''तारीख-इ-सोरठ'' या जुन्या पर्शियन पुस्तकात आहे. (रणछोडजी अमरजी यांनी याचे भाषांतर केले आहे-मुंबई १८८२) पृष्ठ ११२ वर पुढील हकीकत आहे : ''शहा महमूद विस्मयचकित होऊन पळून गेला. त्याने आपला प्राण वाचविला, परंतु त्याच्या सैन्याचे पुष्कळसे चाकर, बाजारबुणग्यांतले पुष्कळ पुरुष, स्त्रिया यांना पकडण्यात आले...तुर्क, अफगाण, मोगल स्त्री-कैद्यांना, जर त्या कुमारिका असतील तर त्यांचे हिंदी सैनिकांनी पाणिग्रहण केले;...दुसर्या स्त्रियांना रेचके आणि वमनके देण्यात येऊन त्यांच्या पोटाची शुध्दी करून त्यांचीही लग्ने लावून देण्यात आली. त्यांच्या त्यांच्या दर्जाप्रमाणे त्यांना पती देण्यात आले. खालच्या दर्जाच्या स्त्रियांना खालच्या दर्जाचे पती मिळाले. जे पुरुष कैदी होते, त्यांतील प्रतिष्ठितांची सक्तीने दाढी काढण्यात आली; राजपुतांच्या शेकावत आणि वढेल जातीत त्यांना समाविष्ट करून घेण्यात आले. खालच्या जातीचे जे होते, त्यांना कोळी, खंत, बारी, मेर वगैरे जातींत वाटून दिले.'' तारीख-इ-सोरठ हे पुस्तक मला माहीत नाही. त्याच्यावर कितपत विश्वास ठेवावा ते मला सांगता येत नाही. 'गुजराथचे वैभव', 'The Glory that was Gurjardesa' या के. एम. मुन्शींच्या ग्रंथाच्या तिसर्या भागातील १४० पानावर हा उतारा आहे. परकीयांनाही रजपूत कुळात कसे अंतर्भूत करून घेण्यात आले आणि स्त्रियांना पत्नी म्हणून घेण्यात आले याचे आश्चर्य वाटते. शुध्दीची तर्हाही अभिनव आहे.