श्याम 148
मी रामचा निरोप घेतला. पुण्यास माझी मावशी होती. ती मामांकडे होती. ज्या मामांकडून मी पळून गेलो होतो तेथे मी गेलो. मामा व मामी यांस नमस्कार केला. मामा माझे पूर्वीचे सारे विसरुन गेले होते. त्या वाडयातील मंडळींनी मला ओळखले. माणक मरुन गेली होती. तिची लहान मुले तेथे होती. त्या मुलांना मी प्रेमाने पाहिले. माणकची मला आठवण झाली. त्या आईवेगळया लहान मुलांची मला करुणा वाटली.
मावशीला फार वाईट वाटले. तिचे माझ्यावर लहानपणापासून फार प्रेम होते. लहानपणी आजोळी मावशीजवळ जाऊन निजण्यासाठी मी रडत असे. रोज उठून आजोळी नाही जावयाचे, असे म्हणून मला घरी रागे भरत, मारीत, रडवीत; परंतु मी टाहो फोडीत राहिलो म्हणजे रात्री गडयाबरोबर आजोळी मला पाठवीत व मी मावशीजवळ निजून जाई.
मावशीने माझा सर्वांत धाकटा भाऊ सदानंद आणला होता. सदानंदाला माझा फार लळा होता. कारण आई आजारी असल्यामुळे लहानपणी मीच त्याला वाढविले होते. मी त्याला खूप श्लोक, स्तोत्रे, कविता शिकविल्या होत्या. सदानंदाला खूप वाईट वाटले. 'अण्णा ! तू कधी भेटशील ? तू तिकडे अगदी एकटा राहणार ?' त्याने विचारले.
मी म्हटले, 'होय सदानंद. तू पत्र लिहीत जा. मोठे अक्षर असले तरी चालेल. मावशीचे, तुझे पत्र आले म्हणजे मला कितीतरी आनंद वाटेल ! तू शहाणा हो. खूप शीक.'
मावशी म्हणाली, 'श्याम ! तिकडे एकंदर तुझे कसे काय जमते ते सर्व कळव. खरीखुरी हकीकत कळव. प्रकृतीस जप. डोळयांस जप. तुझे डोळे अधू आहेत. पायात वहाणा आहेतच. रात्री दिव्याजवळ फार वेळ वाचीत नको बसू.'
मी म्हटले, 'मावशी ! तुझा आशीर्वाद हेच माझे बळ. तुमच्या सर्वांच्या प्रेमाने माझे भलेच होईल. श्यामचे सारे सोनेच होईल.'
मी सदर्न मराठा रेल्वेच्या गाडीत बसलो. रात्रीची वेळ होती. मावशी, सदानंद सारी निरोप द्यावयास आली होती. मावशीने अंजीर घेऊन दिले होते. आम्ही सारी मुकाटयाने उभी होतो. शेवटी शिट्टी झाली. मी गाडीत चढलो. माझे डोळे वाहू लागले. हाताने आम्ही एकमेकांस खुणा केल्या.
गाडी निघाली. मावशी, सदानंद सारी गेली. मी खिडकीच्या बाहेर तोंड काढून बघत होतो. कोणाला बघत होतो ? आता कोण दिसत होते ? कल्पनेच्या दिव्य चक्षूंना सारे दिसत होते. कोकणातील माझी कृश झालेली कश्टमूर्ती आई, माझे सहनशील आशावादी वडील, खोडकर पाठचा भाऊ पुरुषोत्तम, दापोलीची शाळा, सारे दिसत होते. मला गंगू आठवली ! दिगंबर आठवला. रामच्या शेकडो आठवणी आल्या. मुंबईस नोकरी करणारा माझा कर्तव्यपालक व थोर मनाचा मोठा भाऊ, तोही आठवला. माझे पुण्याचे लहानपणाचे जीवन आठवले. कितीतरी वेळ मी खिडकीच्या बाहेर पहात होतो.
शेवटी मी माझे अंथरुण पसरले व त्यावर झोपलो. झोपलो तो झोपलो. औंधला जाण्यासाठी रहिमतपूर स्टेशन असे. रहिमतपूर स्टेशन आले. तेव्हा मी जागा झालो. डब्याला बाहेरुन कुलूप होते. शेवटी मी खिडकीतून खाली उडी मारली व एका भल्या गृहस्थाने आतील सामान दिले. रहिमतपूर स्टेशनवर उतरण्यापासूनच अडचणींना सुरुवात झाली ! परंतु शेवटी सारे चांगलेच होणार होते.