श्याम 38
अकरा वाजून गेले होते. बाराच्या सुमारास मुंबईस जाणारी पॅसेंजर गाडी होती. त्या गाडीने मुंबईस जावयाचे मी ठरविले. माझी दोन भाषांतर-पाठमालेची पुस्तके; माझा मुकटा, माझे एक धोतर व माझे एक पांघरुण असे घेऊन मामी जेवीत असताना मी गुपचूप बाहेर पडलो. मी सारखा मागे पाहात होतो. कोणी पाहिले तर नाही, मागून कोणी येत तर नाही. अशी जिवाला धागधुग वाटत होती.
मी बुधवारात आलो. दोन आणे स्वारीच्या टांग्यात बसलो. मी स्टेशनवर आलो. मी अर्धे तिकिट काढले. दीड रुपयातील चौदा आणे गेले. दोन आणे टांगेवाल्यास दिले व बारा आणे अर्ध्या तिकिटाला. त्या वेळेस पुणे ते मुंबईस सव्वा किंवा दीड रुपया तिकिट होते मी गाडीत येऊन बसलो. माझी दृष्टी कावरीबावरी होती. चोरासारखा मी बसलो होतो. मध्येच माझ्या डोळयांतून पाणीही आले.
आमचा डबा भरुन गेला. मी साहजिकच खिडकीजवळ बसलो होतो. शिट्टी झाली व गाडी सुरु झाली. माझ्या जिवात जीव आला. परंतु मुंबईस पुढे कोठे जावयाचे ? मुंबईस माझा धाकटा मामा होता. त्याचा पत्ता मला माहीत होता. कारण लहानपणी मी तेथे होतोच. त्या मामाचे माझ्यावर त्या वेळेस थोडे प्रेमही होते. त्याच्याकडे जाऊ नाही तर त्या अफाट मुंबईत मी कोणाकडे जाणार ? मनात असे विचार चालले होते. मध्येच माझे भाषांतर उघडून मी शब्द वाचीत बसे. पुन्हा पुस्तक मिटून बाहेरची शोभा पहात असे.
ते पावसाळयाचे दिवस होते. लोणावळयापासून तर अप्रतिम सृष्टिसौंदर्य दिसत होते. कोठे कोठे दाट मेघ पसरल्यामुळे काहीच दिसत नसे. सारी दरी-खोरी मेघांनी भरुन गेल्याप्रमाणे दिसत. आकाशात विहरणारे ढग ! त्यांना खोल दरीतून बुडया मारावयास मजा वाटत होती. कोठे कोठे पर्वताच्या शिखराभोवती फक्त मेघवलये दिसत. त्या मेघपटलातून मध्येच एखादा प्रवाह डोंगरमाथ्यावरुन खाली पडताना दिसे. जेथे मेघ आड नसत तेथे पर्वतांच्या अंगाअंगातून वाहणारे स्वच्छ पाण्याचे पाट दिसत. पर्वतांनी शेकडो जानवीच घातली आहेत की काय असे वाटे. त्या पुरातन ऋषींनी श्रावण महिन्यात श्रावणी केली होती की काय ! पर्वत म्हणजे पुरातन ऋषीच ! हजारो वर्षांपासून त्यांची तपश्चर्या चालली आहे. थंडी असो, ऊनपाऊस असो; पर्वत उभे ते उभे ! ईश्वराचे ते पाईक कधी कुरकुर करीत नाहीत.
पर्वताकडे पाहिले म्हणजे एक प्रकारची भव्यता वाटते, मग एक प्रकारे मूक बनते. पर्वताची दृष्टी नेहमी वरवर. 'मानवा नेहमी वर पहा ! वर जा मानवा ! निराशेने मान खाली नको घालू ! मान स्वाभिमानाने वर ठेव.' असे जणू ते सांगत असतात ! उंच पर्वत पाहिले म्हणजे शेकडो विचार मनात येतात. उंच पर्वतावर पाऊस फार पडतो. पाऊस म्हणजे देवाची कृपाच. जे पर्वत उंच वर देवाजवळ गुजगोष्टी करावयास जातात त्यांच्या डोक्यावर देव कृपेची अपरंपार वृष्टी करतो. ज्याप्रमाणे उंच पर्वतावर खूप पाऊस, त्याचप्रमाणे समाजातील जे परमोच्च पुरुष असतात त्यांच्यावरही ईश्वरी दयेचा अपार पाऊस पडत असतो. उंच पर्वत मेघांना ओढून घेतात त्याचप्रमाणे उंच पुरुष दिव्य ध्येयांना, सुंदर विचारांना आपल्याकडेच ओढून घेत असतात. पर्वतावर पडलेले पाणी शेकडो नदीनाल्यांच्या रुपाने जगाच्या उपयोगी पडते. त्याचप्रमाणे महान पुरुषांच्या डोक्यावर सद्विचारांचा पाऊस, सत् कल्पनांचा पाऊस पडला म्हणजे त्या विचारांचा, त्या सत्कल्पनांचा प्रवाह खालच्या सर्व जनतेला मिळतो. या विचारगंगा अक्षय्य टिकतात. शंकराच्या डोक्यातून गंगा वाहणार. जगाचे कल्याण व्हावे म्हणून हालाहल प्राशन करणारा, जगाला सर्वस्व देऊन संसाराची होळी करुन केवळ भस्म शरीरास फासणारा, योगियांचा राणा शिवशंकर, त्याच्या डोक्यातून भव्य विचारांची गंगा वाहणार व ती जगाला मिळणार. उंच पर्वताच्या डोक्यातून, हृदयातून वाहणा-या शेकडो नद्या आठवल्या की, उंच पुरुषांच्या जीवनातून वाहणा-या विचारगंगा मला आठवतात. वाल्मिकींच्या दिव्य प्रतिभेतून वाहणारी मंगल पवित्र रामायणाची गंगा, व्यासांच्या प्रखर प्रज्ञेतून वाहणारी भारत-भागवताची, श्रीगीतेची गंगा, भगवान बुध्दाच्या अनंत हृदयातून निघणारी ती अहिंसा, प्रेमाची मंदाकिनी, भगवान आद्य शंकराचार्यांच्या वैराग्यातून निघणारी अद्वैताची ती भागीरथी, हे सारे सारे मला आठवते. उंच पर्वतावर पडणा-या पावसामुळे जगाला संपन्न करणा-या, जगाला अन्नधान्य देणा-या, फुलेफळे पिकविणा-या, ओसाड पृथ्वीला हरितश्यामल, सस्यसंपन्न करणा-या, जगातील खळबळ धुवून नेणा-या अनंत नद्या निर्माण होतात; आणि परमोच्च असे परमहंस पुरुषही मनुष्यांचे हृदयमळे पिकविणा-या, प्रेम, बंधुभाव, संयम इत्यादी सद्गुण देणा-या, मानवी समाजाला संपन्न, सुसंस्कृत करणा-या अशा विचारगंगा देत असतात. नद्या पर्वतातून पाणीच आणतात असे नाही. पर्वत स्वत:चा तिळतिळ देहही खालची अनंत पृथ्वी सुपीक व्हावी म्हणून देत असतात. पर्वत म्हणजे पृथ्वीला सुपीक करणारे खतांचे प्रचंड ढीग. डोंगरातून प्रवाहांबरोबर वहात येणारी माती खाली येते व शेतेभाते सुपीक होतात. पर्वत स्वत: देह झिजवून पृथ्वीला नटवितात. त्याप्रमाणे थोर महात्मे स्वत:चे देह तिळतिळ प्रत्यही झिजवीत असतात. मानवी समाज उदार व्हावा, ज्ञानवंत व्हावा, माणुसकीने शोभावा, म्हणून महात्मे देहाचे बलिदान करतात. गडयांनो ! पर्वत पाहिले म्हणजे थोर महात्मे आठवतात व थोर महात्मे पाहिले म्हणजे या पर्वतांचे मला स्मरण होते.