श्याम 34
७. पुण्यास पहिले प्रयाण
माझे पुढे काय करावयाचे, हा प्रश्न होता. मराठी पाचवी इयत्ता तर माझी झाली. हो ना करता करता मलाही पुण्यास पाठविण्याचे ठरले. तेथे माझा मोठा भाऊ होताच. मुंबईच्या मामांची पुण्यास बदली झाली होती. त्यांच्याजवळ आम्ही दोघे भाऊ राहणार होतो.
मी पुण्यास आलो. प्रथम प्रथम मला अगदी चुकल्या चुकल्यासारखे होई. माझे शाळेत नाव घातले नाही. मामा म्हणाले, 'तुला घरीच शिकवीन व एकदम इंग्रजी तिसरीच्या परीक्षेस बसवीन.' माझा मोठा भाऊ मला लिपी शिकवू लागला. इंग्रजी शिक्षणाचे धडे सुरु झाले.
नेहमी मी थंड पाण्यानेच आंघोळ करीत असे. दादा व मी हौदावर आंघोळीस जात असू. येताना बादली भरुन आणीत असू. एके दिवशी माझ्या हातून हौदात बादली पडली. दादा मला रागे भरला. माझ्या डोळयांचे हौद भरुन आले. शेजारी स्नान करणा-या एका भल्या गृहस्थाने बुडी मारली व आमची बादली काढून दिली. कृतज्ञतापूर्वक त्या पाणबुडयाकडे मी पाहिले. मामांकडील देवांची पूजा करण्याचे काम माझ्याकडेच असे. मामांच्या घरी देवांमध्ये दत्ताची एक सुंदर मूर्ती होती. पारिजातकाच्या फुलांचा हार करुन मी त्या मूर्तीला घालावयाचा. वाडयात पारिजातकाचे झाड होते. गुरुवारी दत्ताची मूर्ती लिंबू लावून मी स्वच्छ करावयाचा. पूजा करण्याचा आनंद मी भरपूर लुटीत असे. पूजेला वेळ लागला म्हणजे पुण्य पदरात पडे व मामांजवळ शिकण्याचा वेळही कमी होई ! ही युक्ती मी शोधून काढली होती.
मामी आम्हाला चहा देत नसे. सकाळी मामी कण्हेरी करी. तिच्यात आल्याचे तुकडे घाली. ही कण्हेरी फार स्वादिष्ट लागे. आम्ही दोघे बंधू ती पीत असू. जेवावयाची वेळ होत आली म्हणजे मी पाटपाणी करीत असे. स्वच्छ पाण्याने भरलेले गडवे भरुन ठेवीत असे. मीठ, चटणी, लिंबू वाढीत असे.
जेवणे झाली म्हणजे मामा कचेरीत जात. दादा शाळेत जाई. घरी मी एकटाच असे. मला कंटाळा येई. आमच्या वाडयात जनार्दन नावाचा एक मुलगा होता. तो माझा मित्र होता. त्यांच्याबरोबर मी खेळत असे. तो व मी विटीदांडू खेळत असू. मी खेळण्यात पटाईत होतो. आम्ही भर दुपारी रस्त्यात विटीदांडू खेळत असू. एकदा मी विटीचा जोराने टोला हाणला ती सण् सण् करीत गेली व एका म्हाता-या बाईला लागली. ती बाई जोरजोराने भांडू लागली. बायका एकदा भांडू लागल्या म्हणजे सारी वाग्देवता त्यांच्या जिभेवर येऊन नाचत असते. मी व जनार्दन पळालो. घरात दडून राहिलो. ती बाई वाडयाच्या दारात उभी राहिली व तिने सर्वांचा उध्दार केला !
ती बाई निघून गेल्यावर मामी मला रागे भरु लागली. 'दोन प्रहरी का खेळावयाची वेळ ? बाहेरुन ऊन कोण मी म्हणत आहे आणि चालले विटीदांडू घेऊन ! येथे विटीदांडू खेळायला आलात वाटते ? पुस्तक उघडायला नको. इकडची काडी तिकडे करायला नको, खबरदार पुन्हा दुपारचा खेळशील तर ! आज त्या बाईला लागले; उद्या आणखी कोणाला लागेल. डोळा वगैरे फोडलास तर येथे आमच्या गळयाला फास लावायचास ! घे पुस्तक; नाहीतर या एशीला जरा झोपाळयावर घेऊन जा.'
मला रडू आले; परंतू रडण्याचीही चोरी होती. अश्रूंची तरी जगात कोण कदर करणार ? मी हातात पुस्तक घेतले व प्ले म्हणजे खेळणे, प्ले म्हणजे खेळणे असे घोकीत बसलो. खेळता येत नाही तर निदान खेळण्याचे शब्द तरी घोकावे असे मनात ठरविले !