श्याम 19
'नाही काही. अहंमद कोठे आणतो डबा ? माझ्यातले अहंमद खाईल. जाऊ का मामा ?' मी पुन्हा विचारले.
परंतु मामांचा रागावलेला चेहरा पाहून मी अधिक बोललो नाही. मी एकटयाने पोळी खाल्ली. हा अहंमदचा घास. असे मनात मी म्हणत होतो. एक माझा घास व एक अहंमदचा घास. माझ्या हृदयात बसलेल्या अहंमदला मी भरवीत होतो.
मी फराळ केला; परंतु मला वाईट वाटत होते. शाळेच्या नळाजवळ मी उभा होतो. इतक्यात अहंमद पळतच माझ्याकडे आला. माझा चेहरा उतरलेला होता. माझ्या हातात रिकामा डबा होता. परंतु माझे हृदय भरलेले होते. अहंमदला पाहताच माझे डोळेही भरुन आले.
'श्याम ! काय रे झाले ? पडलास नळावर ? कोणी मुलाने मारले ? का कावळयाने तुझा डबा उडविला ? रो मत भाई, क्या हुवा रे ?' अहंमद मला परोपरीने विचारीत होता, परंतु मला बोलण्याचा धीर झाला नाही. अहमदला काय करावे समजेना. त्याने आपला रुमाल काढला व तो माझे डोळे पुसू लागला. परंतु डोळे पुन्हा भरले. माझे डोळे पुन्हा भरुन आलेले पाहून अहंमद म्हणाला, 'श्याम ! तुझ्या डोळयांत का काही गेले ? डोळा दुखतो ?'
'अहंमद डोळा नाही दुखत. काही होत नाही. मी एकटयाने फराळ केला म्हणून मला वाईट वाटत आहे. मी तुझ्याकडे डबा घेऊन येत होतो; परंतु मामांनी येऊ दिले नाही.' मी सांगितले.
माझे शब्द ऐकून अहंमद गोरामोरा झाला. त्या वेळची त्याची दु:खी मुद्रा मी कधीही विसरणार नाही.
त्या दिवसानंतर मामांनी मला पुन्हा शाळेत नेले नाही.
'मामा ! मला न्या शाळेत !' मी रडत रडत म्हणे.
'काही नको शाळा, घरीच खेळ. लिही. वाच.' ते म्हणत.
मला घरी अहंमदची आठवण येई. उद्या येईल श्याम, अशी अहंमद रोज वाट पाहत असेल व माझ्यासाठी खाऊ आणीत असेल, असे मनात येई. मी पाटीवर काहीतरी चित्र काढीत बसे व त्याला अहंमद असे नाव देत असे. अहंमदजवळ मी मनाने खेळे. मला वाटे अहंमदच्या घरी जावे. परंतु मला काय माहीत अहंमदचे घर ? मला कोण दाखविणार ? कोण तेथे घेऊन जाणार ? अहंमदही माझ्याकडे कसा येणार ? कोण त्याला पत्ता सांगणार माझा ? मामांच्या घरी येण्यास तो धजेल तरी कसा ? आम्हा दोघा मित्रांची मामांनी ताटातूट केली.