श्याम 104
मी म्हटले, 'मग वडी आहे. नारळीपाकाची वडी !'
गंगू म्हणाली, 'कसे रे ओळखलेस ?'
मी म्हटले, 'भूमितीच्या ज्ञानाने.'
गंगू म्हणाली, 'भूमिती म्हणजे काय ?'
मी म्हटले, 'ते इंग्रजी शाळेत पाचव्या इयत्तेत गेल्याने समजते.'
गंगू म्हणाली, 'नको सांगू जा !'
मी म्हटले, 'आता तू रड म्हणजे जे समजावून सांगतो. हे बघ. घरात नारळ आणला, गूळ आणला. यावरुन नारळीपाकाच्या वडया हे नाही का सिध्द होता ? गूळ व नारळ ही गृहीत कृत्ये मानावयाची व नारळीपाकाच्या वडया ही वस्तू सिध्द मानवयाची. दिलेल्या दोन गोष्टी वरुन तिसरी एक गोष्ट सिध्द करावयाची याला भूमिती म्हणतात.
गंगू म्हणाली, 'मग हे शिकायला काही इंग्रजी पाचव्या इयत्तेत नको जायला ! चुलीजवळ रोज आम्ही शिकतो. तांदूळ, पाणी व जाळ दिला की भात तयार होतो. तवा व पीठ दिले तर भाकरी तयार होते, हे का शिकवावे लागते ?'
मी म्हटले, 'आधी वडी तर दे. मी ओळखले आहे. मला बाहेर जायचे आहे.'
गंगू म्हणाली, 'आता रे कोठे जायचे आहे ?'
मी म्हटले, 'जरा खेळायला जाईन.'
गंगू म्हणाली, 'आपण येथेच खेळू. तू मला लंगडीने धर. मी पळेन.'
मी म्हटले, 'म्हणजे आम्हाला दमवायला. मी नाही येत.'
गंगू म्हणाली, 'बरे, मी पकडीन तुला. म्हणजे तर झाले ?' इतक्यात आत्याने मला हाक मारली.
गंगूने विचारले, 'कशाला रे बोलावते ?'
मी म्हटले, 'पाणी घालावयाचे असेल भाजीला, संपला आपला खेळ.'
गंगू म्हणाली, 'मी येऊ का पाणी घालायला ? म्हणजे लवकर संपेल.'