श्याम 90
शास्त्रीबोवांचा मला फारसा त्रास होत नसे; परंतु रात्री दिव्याजवळ ते वाचू देत नसत. 'सारा दिवस काय करता ? रात्री नाही दिवे जाळून अभ्यास करावयाचा.' असे ते म्हणत. त्यामुळे माझा दिवसाचा वेळ मी शक्य तो फुकट दवडत नसे. तात्यांच्या मृगाजिन घातलेल्या बैठकीवर दादा आम्हास बसू देत नसत. ते मृगाजिन जुने होत आले होते. त्यामुळे त्याच्यावरचे केस पुष्कळसे झडून गेले होते. दादांना वाटे की, आम्ही त्याच्यावर बसतो म्हणून केस झडतात. एके दिवशी मी मृगाजिनावर वाचीत बसलो होतो, तर दादांनी शेवटी मला हात धरुन उठविले. दादा घरात असले म्हणजे मृगाजिनाच्या बैठकीवर मी कधी बसत नसे. ते बसणे नको व अपमान करुन घेणे नको.
आत्याकडच्या चार वर्षांच्या आयुष्यक्रमात माझा पुष्कळ फायदा झाला. मी कधी आजारी पडलो नाही. वेळ फुकट न दवडण्यास मी शिकलो. लौकर निजणे व लौकर उठणे हा नियम येथे सहज पाळला जाई. व्यवस्थितपणाची सवय लागली. कामाचा कंटाळा गेला. कोणतेही काम करण्याची लाज वाटेनाशी झाली. कितीही कष्ट पडले तरी ते विद्येसाठी केले पाहिजेत हे शिकलो. माझ्या वर्तनामुळे माझ्या मायबापांस पुष्कळ समाधान वाटू लागले. 'श्याम काही अगदीच टाकाऊ नाही,' असे त्यांना वाटू लागले. आजोबा तर मला म्हणत, 'श्याम, तू इतका निवळशील असे कधीही वाटले नव्हते. जमीन-अस्मानाचा फरक तुझ्यात झाला आहे. भांडखोर व हट्टी शाम कष्टाळू व गुणी होत आहे. तसाच चांगला हो व नाव काढ.'
कधी सुट्टीत घरी गेलो व असे शब्द कानावर पडले म्हणजे मला धन्य धन्य वाटे. माझ्या अंगावर मूठभर मांस चढे. आत्याच्या घरी राहिल्यामुळे जसा फायदा झाला तसा दापोलीच्या शाळेतही माझ्या हृदयाचा व बुध्दीचा चांगला विकास झाला. तो कसा ते उद्या सांगेन.