Get it on Google Play
Download on the App Store

श्याम 61

अशी ही लवलक्षणे म्हशीच्या मांद्य निर्माण करणा-या दुधातुपाच्या सेवनाने निर्माण झाली आहेत. 'पिईन तर गाईचेच दूध पिईन, नाही तर नको.' अशी व्रते घेणारे लोक निघाले पाहिजेत. गाईच्या दुधाला मागणी येऊ लागल्याशिवाय गाईचे संवर्धन व संगोपन नीट होणार नाही. ज्याप्रमाणे प्रथम सहासहा सातसात रुपये देऊनही खादीचेच धोतर काही लोक वापरु लागले व त्यामुळेच पुढे खादी वाढू लागली. त्याचप्रमाणेच गाईचे दूधही प्रथम महाग पडेल; परंतु पुढे ते मुबलक व स्वस्तही होईल. परंतु आरंभ हा झालाच पाहिजे. गाईचे दूध पिणा-यांचे संघ निघाले पाहिजेत. तेथे गोदुग्ध प्राशनाचे समारंभ झाले पाहिजेत. मनुष्याला व्रते पाहिजेत. परंतु ती कालमानाप्रमाणे बदलतील एवढेच. व्रताविणे मनुष्य म्हणजे गाढव होय, असे संतांनी लिहिले आहे. आजच्या काळात मी खादी वापरीन, मी गाईचे दूध सेवन करीन, मी इतर वस्तू शक्यतो स्वदेशी वापरीन, काही तरी रोज शरीरश्रम करीन, अस्पृश्यता मानणार नाही, इत्यादी व्रतांची सर्वांनी दीक्षा घेणे योग्य आहे. हे कठीण आहे म्हणूनच करण्यासारखे आहे, पतित राष्ट्राने वर येण्यासाठी कठीण हा शब्द कधी वापरता कामा नये. त्याला सर्वच सोपे पाहिजे असेल, स्वस्त पाहिजे असेल तर त्याचा उत्कर्ष कदापि होणार नाही.

मामांकडे म्हशीचेच दूध घेण्यात येई; परंतु लहान मुलीसाठी गाईचे दूध घेण्यात येई. गवळयाकडे जाऊन म्हशीचे दूध समक्ष पिळून घेण्यासाठी आम्ही जात असू. मी व माझा दादा आम्ही गवळयाकडे जात असू. परंतु आमच्या समक्षही गवळी आम्हाला फसवावयाचा. तो चरवी हातात घेऊन म्हशीखाली बसे. पहिली धार तो चरवीच्या बाजूला वाजवी. धारेचा आवाज ऐकला की, आम्हाला वाटे भांडयात पाणी वगैरे नाही. परंतु त्या चरवीत पाणी असे. परंतु एके दिवशी आम्ही त्याला पकडले. तो नेहमीप्रमाणे भांडे घेऊन म्हशीखाली जाऊन बसला. त्यात भांडयात काहीतरी आहे अशी मला शंका आली. गवळयाने धार टणकन वाजवली; परंतु मी त्या शेणाच्या घाणीतून पुढे गेलो. 'म्हैस बुजेल, पुढे नका येऊ. लाथ मारील, बिथरेल;' असे गवळी व त्याची बायको म्हणू लागली. मी पुढे गेलोच, भांडे हातात घेतले तो आत पाणी. त्या सर्वांच्या माना खाली झाल्या. 'सड धुवायला आणले होते ते राहिले' वगैरे तो बोलू लागला; परंतु त्यात अर्थ नव्हता. आम्हा दोघा भावांना राग आला; परंतु आमच्या पायाची शपथ घेऊन पुन्हा असे करणार नाही असी गवळयाने ग्वाही दिली. आम्ही लहान मुलांनी त्याला क्षमा केली.

गाईचे दूध रात्री आणावे लागे. ओंकारेश्वराच्या देवळाजवळ एक घर होते. तेथे एकाजवळ गाय होती. तेथून दूध आणावे लागे व ते आम्हाला रात्रीच मिळे. सकाळी मिळत नसे. ते दूध आणण्यासाठी मी रात्री जात असे. मला भीती वाटे. त्या वेळेस पुण्यात ड्रेनेजचे काम चालले होते. रस्त्यावर जिकडे तिकडे खोल खणलेले होते. लाल दिवे रात्री सर्वत्र रस्त्यावर असावयाचे. ओंकारेश्वराच्या रस्त्यावरही हे खोल खळगे होते. लाल दिवे रात्री सर्वत्र रस्त्यावर असावयाचे. ओंकारेश्वराच्या रस्त्यावरही हे खोल खळगे होते. नारायण पेठेच्या पोलिस चौकीवरुन ओंकारेश्वराकडे जाणारा जो रस्ता आहे तो त्या वेळेस भयाण वाटे. वाटेत एके ठिकाणी पीर आहे. तेथे उदबत्त्या वगैरे लावलेल्या असावयाच्या. रात्रीच्या काळोखात त्या चमकायच्या. पाऊस पडत असला म्हणजे हया बाजूची भीषणता रात्री फारच वाढे. शिवाय त्या बाजूला एक दोन कुत्री होती. त्यांना सर्वांवर भुंकत धावण्याची सवयच होती. या एकंदर परिस्थितीमुळे रात्री गाईचे दूध आणावयास जाणे माझ्या जिवावर येई. पिराजवळची कुत्री टाळावी म्हणून मी लांबच्या रस्त्याने दुधासाठी जावयाचा. गायकवाडवाडयावरुन व वर्तकांच्या हौदावरुन, न्यू इंग्लिश स्कूलच्या छात्रालयाजवळून त्या बाजूने ओंकारेश्वराकडे मी जावयाचा. अर्थातच मला घरी येण्यास उशीर होई. मामा म्हणत, 'तुला इतका वेळ कसा लागतो ?' कुत्र्यांच्या भीतीमुळे मी लांबच्या रस्त्याने जातो, असे सांगावयास मला लाज वाटे. भित्रेपणाचा कोणाला अभिमान वाटेल ? परंतु आजच्या मुलांना लहानपणापासून भित्रेपणा शिकविण्यात येत असतो. 'बाहेर नको जाऊ, बाऊ आहे बाहेर. नीज आता, नाही तर मांजर येईल हो !' असे आया मुलांना निजवताना म्हणतात. एखादा जवळच्या कोप-यातून किंवा खोलीतून कोणी मांजराचा किंवा कुत्र्याचा आवाज काढतो. मुलाला भय वाटते. ते पांघरुणात हातपाय घेऊन झोपते. लहानपणाचे हे संस्कार वज्रलेप होतात. पुढे मोठेपणीही मग कुत्र्याचा आवाज ऐकताच, मांजराचे भांडण ऐकताच, भीती वाटते व अंगाला थरकाप सुटतो. स्वामी श्रध्दानंद गुरुकुलातील मुलांना निर्भयतेचे प्रत्यक्ष धडे देत. त्यांचे गुरुकुल हिमालयातील वनात होते. ते भित्र्या मुलांना रात्री सांगावयाचे 'जा रे नदीवर जाऊन पाणी आण किंवा त्या जंगलात जाऊन पाला आणा.' तो मुलगा भीत भीत निघावयाचा. त्याच्या पाठोपाठ श्रध्दानंद इतर मुले स्ट्रेचर देऊन पाठवावयाचे. जरा सळसळले की, त्या भित्र्याला वाटे, 'वाघ आला का साप गेला ? भूत आले का गि-हा गेला ?' शेवटी भीतीने बोबडी वळून तो मुलगा पडावयाचा. पाठीमागची मंडळी मग त्या मुलाला घेऊन येत. पुन्हा पाच-सात दिवसांनी, त्याला मुलाला पाठविण्यात येई. अशा रीतीने प्रत्यक्ष प्रयोगांनी स्वामीजी मुलांची भीती दवडीत, मग मुले इतकी निर्भय बनत की, सापाला गांडूळ समजून लाथाडून देत व वाघाला मांजर समजून दंडयाने हाकून लावीत.

श्याम

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
श्याम 1 श्याम 2 श्याम 3 श्याम 4 श्याम 5 श्याम 6 श्याम 7 श्याम 8 श्याम 9 श्याम 10 श्याम 11 श्याम 12 श्याम 13 श्याम 14 श्याम 15 श्याम 16 श्याम 17 श्याम 18 श्याम 19 श्याम 20 श्याम 21 श्याम 22 श्याम 23 श्याम 24 श्याम 25 श्याम 26 श्याम 27 श्याम 28 श्याम 29 श्याम 30 श्याम 31 श्याम 32 श्याम 33 श्याम 34 श्याम 35 श्याम 36 श्याम 38 श्याम 39 श्याम 40 श्याम 41 श्याम 42 श्याम 43 श्याम 44 श्याम 45 श्याम 46 श्याम 47 श्याम 48 श्याम 49 श्याम 50 श्याम 51 श्याम 52 श्याम 53 श्याम 54 श्याम 55 श्याम 56 श्याम 57 श्याम 58 श्याम 59 श्याम 60 श्याम 61 श्याम 62 श्याम 63 श्याम 64 श्याम 65 श्याम 66 श्याम 67 श्याम 68 श्याम 69 श्याम 70 श्याम 71 श्याम 72 श्याम 73 श्याम 74 श्याम 75 श्याम 76 श्याम 77 श्याम 78 श्याम 79 श्याम 80 श्याम 81 श्याम 82 श्याम 83 श्याम 84 श्याम 85 श्याम 86 श्याम 87 श्याम 88 श्याम 89 श्याम 90 श्याम 91 श्याम 92 श्याम 93 श्याम 94 श्याम 95 श्याम 96 श्याम 97 श्याम 98 श्याम 99 श्याम 100 श्याम 101 श्याम 102 श्याम 103 श्याम 104 श्याम 105 श्याम 106 श्याम 107 श्याम 108 श्याम 109 श्याम 110 श्याम 111 श्याम 112 श्याम 113 श्याम 114 श्याम 115 श्याम 116 श्याम 117 श्याम 118 श्याम 119 श्याम 120 श्याम 121 श्याम 122 श्याम 123 श्याम 124 श्याम 125 श्याम 126 श्याम 127 श्याम 128 श्याम 129 श्याम 130 श्याम 131 श्याम 132 श्याम 133 श्याम 134 श्याम 135 श्याम 136 श्याम 137 श्याम 138 श्याम 139 श्याम 140 श्याम 141 श्याम 142 श्याम 143 श्याम 144 श्याम 145 श्याम 146 श्याम 147 श्याम 148