श्याम 77
वाडयातील वडील मंडळींनी मामांचा राग शांत केला.
"नका मारु हो मामा. सापडला ना !' वाडयातील बायका म्हणाल्या.
"अहो नको मारु तर काय करु ? मागे एकदा गेला. पुन्हा काल गेला. पुन:पुन्हा तेच काय ? हा आमच्या मानेला फास लावावयाचा-' मामा रागाने व दु:खाने म्हणाले.
"श्याम ! चांगल्या देवादिकांच्या गोष्टी सांगतोस आणि असे वागावे का रे ? जा घरात. देवाला नमस्कार कर व म्हण पुन्हा असे करणार नाही.' एक पोक्त स्त्री म्हणाली.
मी मामांच्या दत्ताच्या तसबिरीच्या पाया पडलो. घरात गेलो व स्फुंदत स्फुंदत रडत होतो. मी माझे हसे करुन घेतलेच, परंतु मामांचेही हसे केले. त्यांनी स्वत:ची पदरमोड करुन भाच्याला शिकविण्याचे ठरविले होते. त्याचे उपकार स्मरण्याऐवजी मी त्यांच्याही नावाला काळिमा लावीत होतो. त्यांचे नाव बद्दद्न करीत होतो. ते का मला खात होते का काय करीत होते ? शिकविताना जरा रागवत. मग रागावले म्हणून काय झाले ? माझ्या हितासाठीच ते सोरे होते. मीच विद्यावान व्हावे म्हणून ते रागावत. त्यात त्यांना काय मिळावयाचे होते ? विद्येसाठी बाळ नचिकेता मरणासमोरही उभा राहावयास भ्याला नाही. मृत्यूजवळही त्याने ज्ञान मागितले. यमदेवापेक्षाही का मामा कठोर होते ? मामा कठोर नव्हते. त्यांचे मन उदार होते. म्हणून तर त्यांनी आम्हाला आणले होते. नाही तर सध्याच्या विपन्नावस्थेत कोण कोणाला विचारीत आहे ? स्वत:चा संसार धड चालविणे जेथे कठीण होत आहे तेथे दुस-यांची मुले कोण आणणार ? कोण त्यांना पोसणार ? कोण त्यांच्या शिक्षणाची सारी व्यवस्था लावणार !
परंतु हे सारे त्या वयात मला समजत नव्हते. त्या गोष्टीची आज आठवण येऊन मला अपार लज्जा वाटत आहे. माझ्या कृतघ्नपणाची मला खंत वाटत आहे. मी असा कसा त्या वेळेस वागलो याचे मला आश्चर्य वाटले. कधी कधी भुताने पछाडल्यासारखा मी वागत असतो. जणू त्या वेळेस माझा मी नसतो ! कोणी तरी मला ओढून नेतो. कोणी तरी मला नाचवितो. तो झटका गेला म्हणजे माझे मलाच पूर्ववर्तनाबद्दल आश्चर्य वाटू लागते.
दोन-चार दिवस मी घरातून बाहेर पडलो नाही. कोणाशी बोललो नाही. मामा फारच प्रेमळपणाने माझ्याजवळ बोलू लागले. त्यांनी मनात मला कोकणात पोचवून देण्याचे निश्चित केले होते. त्यांची रजा शिल्लक होतीच. एक दिवस त्यांच्या कमरेवर मी पाय देत होतो. पाय देऊन झाल्यावर ते म्हणाले, 'श्याम ! आपण कोकणात जाऊ या. माझे पोट दुखते त्याच्यावरही काही औषध तिकडे घेईन. तुझे कपडे धुऊन ठेव.'
त्या दिवसापासून मामांनी मला शिकविले नाही; पुन्हा पळून जावयास नको. एकदा आईबापांच्या स्वाधीन केले म्हणजे सुटलो, असे त्यांना वाटत असावे. मामांकडचे माझे शेवटचे ते चार दिवस होते. चार दिवस खेळीमेळीने चालले होते. कोकणात जावयाचा दिवस ठरला. कोकणातून मी बहुतेक परत येणार नाही, हे निश्चितच होते. मलाही ते अस्पष्ट कळून चुकले होते. वाडयातील मंडळीस मी नमस्कार केला. माणकताईस भेटलो. माझ्या जाण्याने त्या वाडयात जास्त वाईट जर कोणाला वाटले असेल तर ते माणकताईला. सासरच्या दु:खातील तिचा एकमात्र जो आधार तो जात होता. ज्याच्याजवळ हृदय हलके करावे तो जात होता. अशा रीतीने ही माझी पुण्याची पहिली षाण्मासिक यात्रा संपली.