श्याम 111
मी म्हटले, 'हो.'
मी माझ्या ओळखीच्या शिंप्याकडे गेलो व खूप चिंध्या एका फडक्यात बांधून गंगूला आणून दिल्या. गंगूला आनंद झाला.
एके दिवशी गंगू रुमालावर चित्रे गुंफीत होती. त्या रुमालावर एक वेल आखलेली होती व वेलीवर चिमणी होती ! चिमणी मला फार आवडत असे. या चिमणीचे रामायण मी पुढे एखादे दिवशी सांगेन.
मी गंगूला विचारले, 'हा रुमाल कोणासाठी ?'
गंगू म्हणाली, 'तुझ्यासाठी नाही काही !'
मी म्हटले, 'चिमणीचे चित्र असलेला रुमाल माझ्यासाठी असणार ! तू मलाच देशील. चिमणी दुस-या कोणाला ग आवडते ?'
गंगू म्हणाली पण हा रुमाल नाहीच ! या रुमालाचे मी दुसरे काही करणार आहे. त्याची पिशवी करणार आहे ?'
मी म्हटले, 'माझ्या पुस्तकांना ? हे कापड तर लौकर फाटेल !'
गंगू म्हणाली, 'पण तुला देते आहे कोण ?'
मी म्हटले, 'तू देशीलच !'
गंगू म्हणाली, 'जा ना रे तू. सारखी बडबड हवी करायला तुला.'
मी म्हटले, 'आणि मी बडबड करायला आलो नाही म्हणजे मात्र मला शोधायला तू येतेस. जातो हो मी.'
गंगू म्हणाली, 'आणि अभ्यास कर.'
मी म्हटले, 'तू नको सांगायला मला आजीबाई !'
गंगूने माझ्यासाठी चिंध्यांची उशी तयार केली होती. त्या उशीला त्या रुमालाचा तिने अभ्रा केला होता.
गंगू मला म्हणाली, 'श्याम ! आज आमच्याकडे ये निजायला. मी आता जाणार दोन दिशी. आपण खेळू. आईसुध्दा येणार आहे.'
मी म्हटले 'कशाने खेळायचे ?'
गंगू म्हणाली, 'कवडयांनी.'
मी म्हटले, मी नाही येणार. मला दान पडत नाही. माझ्यावर येते नेहमी हार.'
गंगू म्हणाली, 'तू अगदी रडया आहेस. चांगल्याने जोराने कवडया टाक म्हणजे दान पडेल दान.'
मी म्हटले, 'हळू टाका, जोराने टाका. मला दान पडणार नाही. दान पडत नाहीसे झाले की मला मग वाईट वाटू लागले.'
गंगू म्हणाली, 'तू व मी एका बाजूला होऊ. आई विरुध्द बाजूला.'