Get it on Google Play
Download on the App Store

श्याम 121

वर्गनायक परशुराम गंभीरपणे म्हणाला, 'मी मुले शोधावयास गेलो. घंटा झाली तरी मुले दिसत नाही. मुलांचे झाले तरी काय, याची मला चिंता पडली. शिक्षकांच्या गैरहजेरीत मुलांची जबाबदारी वर्गनायकावर असते. मुलांकडे त्याने पहावयाचे असते; परंतु वर्गात मुले असतील तर ना तो मुलांकडे पहाणार ?

मुले माझा अपमान करतात, असे मला वाटले. शिक्षकांच्या गैरहजेरीत मी का या मुलांच्या या टेबलाजवळ उभा राहून पाहू ? मला हे अपमानशल्य विषसमची वाटले. मन धिक्कार साहिना. मी त्यांना पहावयास गेलो. एकेकाला शोधून वर्गात चल, असे सांगत होतो. मी माझे कर्तव्य अत्यंत दक्षतेने बजावले आहे.'

अपमानशल्य विषसमची वाटले, मन धिक्कार साहिना, वगैरे शब्द ऐकून वर्गात हास्याचे फवारे उडत होते; परंतु संयममूर्ती परशुराम, अमर्याद पुरुषोत्तम, तो आमचा वर्गनायक स्वत: हसला नाही. गंभीरपणे त्याचे विधान चालले होते. तो पुढे म्हणाला, 'आता शेवटचा मुद्दा राहिला व तो म्हणजे किल्लिकेचा.' प्रचंड हशा वर्गात पिकला. तो पुन्हा बोलू लागला,' पेटीची जबाबदारी माझ्यावर आहे. पेटीतील नवीन काठी जर कुणी पळविली असतील किंवा मोडली असती तर जबाबदार कोण ? मी किल्लीका कोणच्या अंगी लावणार ! आणि वर्गात होते तरी कोण ? सारी मुले बाहेर गेली असता जी दोन-तीन मुले वर्गात राहिली त्यांच्यावर तर माझा मुळीच विश्वास नव्हता. कारण ही मागे का राहिली ? चोरासारखी मागे का राहिली ? शिपाई पुढे जातात व पेंढारी आणि बाजारबुणगे मागे रहातात. वर्गातील झुंझार मुले काही होवो, आकाश पडो, पृथ्वी उडो, एका निश्चयाने कंटाळवाण्या तासाला रजा देऊन बाहेर वनस्पतिशास्त्राचा अभ्यास करावयास जातात; तर या दोघां-तिघांनी का मागे रहावे ? अशा माघार    घेणा-या नामर्दावर मी पेटीचे पंचप्राण कसे सोपवू ? माझे बोलणे संपले. सरकारने मुलांकडे पाहून मुलांची मनोबुध्दी लक्षात घेऊन योग्य तो निकाल सहानुभूतीने द्यावा.'

वर्गशिक्षक म्हणाले, 'मुलांनो ! तुमच्या या नायकाने तुम्ही का गेलात याचे खरे कारण नकळत सांगून टाकिले आहे. तुम्हाला सायन्सचा तास कंटाळवाणा वाटतो म्हणून तुम्ही जाण्याचे निश्चित केलेत, ही सत्य गोष्ट याच्या तोंडून मघा बाहेर पडली. तुम्ही सर्वांनी खोटी कारणे सांगितलीत; परंतु सत्य लपत नसते. ढगातून व धुक्यातून शेवटी किरण विजयी होऊन बाहेर येणारच यात शंका नाही. एखादा तास कंटाळवाणी वाटला तरी संयमपूर्वक वर्गात बसावे. ज्या शिक्षकाचा जो विषय नाही तो त्याच्या जर बोकांडी बसविला तर असे व्हावयाचेच. शिक्षकाच्या स्थितीकडेही तुम्ही पाहिले पाहिजे. संस्कृत-मराठीच्या मास्तरास सायन्स नीट कसे शिकविता येणार ? हा शाळेचा दोष आहे.'

"तुम्ही शिस्तभंग केला आहे. परंतु शाकुंलतात शकुंतलेच्या अपराधाबद्दल तिच्या मैत्रिणी रागीट दुर्वासाला म्हणतात, 'हा शकुंतलेचा पहिला अपराध आहे; तर क्षमा करा !' कोणी दुर्वासाने क्षमा केली. मीही तुम्हाला हा तुमचा पहिला अपराध आहे म्हणून क्षमा करतो. परंतु जर या अपराधाची पुनरावृत्ती झाली तर मग मात्र लक्षण नीट दिसत नाही, हे ध्यानात धरा. मी तुमचा वर्गशिक्षक आहे. पुन्हा असे काही करुन माझी मान खाली करु नका.'

दयेने व सहानुभूतीने संमिश्रित असा तो न्याय ऐकून मुले प्रसन्न झाली. वर्गशिक्षकाबद्दल आदर शतपटीने त्यांच्या मनात वाढला. शिक्षकांचा निकाल सांगून होताच घंटा झाली. मुले म्हणाली, 'सत्य आहे. काळपुरुषसुध्दा घंटा वाजवून म्हणतो आहे की, 'हा निकाल मंजूर आहे.' आपला पांडू शिपाई म्हणजे काळपुरुष !' एक मुलगा हसत म्हणाला. घंटा वाजविण्याचे काम पांडू शिपायाकडे असे. एक विचारवंत मुलगा म्हणाला, 'आपण त्या शिक्षकांची क्षमा मागू या. त्यांचा काय दोष त्यांना सायन्स नाही शिकविता आले तर ? त्यांच्यावर ते बळेच लादले गेले आहे. त्यांच्या मनाला किती वाईट वाटत असेल ! आपणास वर्गशिक्षकांनीही शिक्षा केली नाही. आपणही मनाचा मोठेपणा दाखवू या. आपला वर्ग खोडकर असला तरी दिलदारही आहे, हे आपण शाळाचालकांच्या नजरेस आणून दिले पाहिजे. इतर शिक्षकांच्या दृष्टीस आणून दिले पाहिजे.'

श्याम

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
श्याम 1 श्याम 2 श्याम 3 श्याम 4 श्याम 5 श्याम 6 श्याम 7 श्याम 8 श्याम 9 श्याम 10 श्याम 11 श्याम 12 श्याम 13 श्याम 14 श्याम 15 श्याम 16 श्याम 17 श्याम 18 श्याम 19 श्याम 20 श्याम 21 श्याम 22 श्याम 23 श्याम 24 श्याम 25 श्याम 26 श्याम 27 श्याम 28 श्याम 29 श्याम 30 श्याम 31 श्याम 32 श्याम 33 श्याम 34 श्याम 35 श्याम 36 श्याम 38 श्याम 39 श्याम 40 श्याम 41 श्याम 42 श्याम 43 श्याम 44 श्याम 45 श्याम 46 श्याम 47 श्याम 48 श्याम 49 श्याम 50 श्याम 51 श्याम 52 श्याम 53 श्याम 54 श्याम 55 श्याम 56 श्याम 57 श्याम 58 श्याम 59 श्याम 60 श्याम 61 श्याम 62 श्याम 63 श्याम 64 श्याम 65 श्याम 66 श्याम 67 श्याम 68 श्याम 69 श्याम 70 श्याम 71 श्याम 72 श्याम 73 श्याम 74 श्याम 75 श्याम 76 श्याम 77 श्याम 78 श्याम 79 श्याम 80 श्याम 81 श्याम 82 श्याम 83 श्याम 84 श्याम 85 श्याम 86 श्याम 87 श्याम 88 श्याम 89 श्याम 90 श्याम 91 श्याम 92 श्याम 93 श्याम 94 श्याम 95 श्याम 96 श्याम 97 श्याम 98 श्याम 99 श्याम 100 श्याम 101 श्याम 102 श्याम 103 श्याम 104 श्याम 105 श्याम 106 श्याम 107 श्याम 108 श्याम 109 श्याम 110 श्याम 111 श्याम 112 श्याम 113 श्याम 114 श्याम 115 श्याम 116 श्याम 117 श्याम 118 श्याम 119 श्याम 120 श्याम 121 श्याम 122 श्याम 123 श्याम 124 श्याम 125 श्याम 126 श्याम 127 श्याम 128 श्याम 129 श्याम 130 श्याम 131 श्याम 132 श्याम 133 श्याम 134 श्याम 135 श्याम 136 श्याम 137 श्याम 138 श्याम 139 श्याम 140 श्याम 141 श्याम 142 श्याम 143 श्याम 144 श्याम 145 श्याम 146 श्याम 147 श्याम 148