श्याम 13
दुसरे दिवशी सकाळी माधवराव आले होते. मामा बाहेर गेले होते. मी एका पुस्तकातील चित्रे पहात होतो. माधवरावांना बघताच माझी कळी फुलली. मी एकदम त्यांच्याजवळ गेलो.
'काय श्याम ! डोळे काय म्हणतात ?' त्यांनी हसत हसत विचारले.
'चांगले आहेत डोळे. तुम्ही मला आता एक मोठे पुस्तक आणून द्या. ही लहान पुस्तके लवकर संपतात.'
'लहान मुलांना मोठी पुस्तके कशाला ?' माधवरावांनी विचारले.
'पण मोठे पुस्तक मला दिलेत म्हणजे मी मोठा होईन.' मी म्हटले.
'मोठे पुस्तक जवळ ठेवून मोठे होता येते वाटते ? श्याम ! तू अजून लहान आहेस; लहान पुस्तकेच वाच. मोठमोठया अक्षरांची पुस्तके वाच; म्हणजे डोळे बिघडणार नाहीत, समजलास.' ते मला म्हणाले.
'वाचून वाचून का डोळे बिघडतात ?' मी विचारले.
'श्याम ! डोळयांचे मुख्य काम वाचणे नसून बघणे आहे. समुद्रावर जावे. गलबते पहावीत, लाटा बघाव्यात, खेळ पहावेत, पतंग पहावेत. रात्री चमचम करणारे तारे बघावेत. चांदोबा बघावा, फुले, पाखरे बघावीत, पाहून डोळे दमत नाहीत.' माधवराव सांगत होते.
'मग मी मुळीच वाचू नको ?' मी विचारले.
'थोडे वाचावे; पुष्कळ बघावे; ऐकावे.' ते म्हणाले.
'मी एकटा कसा बघावयास जाऊ ?'
'तू फिरायला का नाही जात समुद्रावर ? शेजारची चंपू तर रोज जाते. तिच्याबरोबर जावे. समुद्रावरची गंमत बघावी.' माधवरावांनी सांगितले.