श्याम 142
राम कोठून येतो, दुरुन दिसतो का, मी पहात होतो; परंतु मधली सुट्टी संपली. राम येत नाही, असे त्या घण घण घंटेने माझ्या कानांना सांगितले.
मोठया दु:खाने मी उठलो. शिक्षकांच्या त्या मारण्याने मला दु:ख झाले नाही, इतके रामच्या न येण्याने झाले. तो सर्वांत मोठा प्रहार होता. निर्दय आघात होता. माझ्या हृदयातील भूक त्याला समजत नव्हती का ? हृदयाची भाषा हृदयाला समजत नव्हती का ?
परंतु श्यामजवळ आपण आधी जाऊन कसे बोलावे, याचे कोडे रामला पडले होते. इतक्या दिवसांचा आमचा अबोला; परंतु तो आधी कोणी मोडावा ? आधी कोणी सोडावा ? अभिमान ! परंतु जेथे अभिमान आहे तेथे प्रेमाला कोठून वाव मिळणार ? काही गोष्टी नाइलाज म्हणून, कर्तव्य म्हणून मनुष्य करतो; परंतु फारच थोडया गोष्टी प्रेमाने केलेल्या असतात. प्रेम म्हणजे निरहंकारता. प्रेम म्हणजे प्रिय वस्तूत बुडून जाणे. प्रेमाला स्वत:ला शून्य करणे आवडते. प्रेम म्हणजे स्वत:चे मरण, स्वत:चे विस्मरण.
मी तरी रामजवळ आपण होऊन का गेलो नाही ? मी एकदम त्याच्याजवळ जाऊन पोटभर का रडलो नाही ? आपला तिरस्कार होईल, असे मला वाटे. रामच्याजवळ जाताच तो उठून जाईल असे मला वाटे; परंतु प्रेमाला तिरस्काराची तरी पर्वा कशाला ? माझ्याही प्रेमात कमतरता होती. माझाही अहं जागृत होता.
रामजवळ किती दिवस अबोला धरणार ? मी प्रेमाचा यात्रेकरु होतो. प्रेमशोधक, प्रेमसंपादक होतो. रामच्या घरी जावे, असे माझ्या मनात येऊ लागले. एके रविवारी दुपारी मी खरेच रामच्या घरी जावयास निघालो. बाहेर ऊन होते, पाय चटचट भाजत होते. मी अनवाणी होतो. रामचा विचार करीत चाललो होतो. जसजसे घर जवळ जवळ येऊ लागले तसतसे माझे मन कचरु लागले. मी क्षणात मागे वळे; परंतु पुन्हा जाण्याचे मनात येई. मी वेडगळासारखा पुढेमागे करीत होतो.
शेवटी सद्गदित वृत्तीने मी रामच्या घराशी तर आलो. मी पाय-या चढलो. ओसरीवर गेलो. त्या घरातील कोणाशीही माझी ओळख नव्हती. मी ओसरीवर घुटमळत उभा राहिलो. घरात कसे जावयाचे ? इतक्यात कोणीतरी बाहेर येऊन विचारले, 'कोण पाहिजे ?'
"राम.' एवढेच मी उत्तर दिले.
"राम घरी नाही. काही काम आहे का ?'
"काम काही नाही. मी येथेच थोडा वेळ बसतो.'
"तो लवकर येणार नाही. पाहू का त्याला कोठे गेला आहे तो ?'
"नको.' मी म्हटले.
मी तेथेच ओसरीच्या टोकाला पाय खाली सोडून बसलो होतो. समोरच्या उंच उंच आंब्याच्या झाडांकडे, त्यांच्या टिटाळयांकडे पहात होतो. घरातील रामची लहान भावंडे दारातून डोकावून आत जात व घरात कुजबुज करीत. शेवटी एक जण धिटाईने पुढे आला.
"तुमचे नाव काय ?' त्याने विचारले.
"श्याम.' मी म्हटले.
"कवी श्याम ?' त्याने विचारले.