श्याम 75
मला आता रडे आवरेना. मी भरपूर मुकाटयाने रडलो. परंतु किती वेळ रडणार ? उद्या सकाळी माझ्या नशिबी काय आहे, ते मला कळेना. ते पुजारी मला मामांकडे का घेऊन जातील ? मामा काय म्हणतील ? त्या वाडयातील सारे काय म्हणतील ? माझ्या तोंडात सर्वजण शेण घालतील. ते सारे अपमान, तो फजितवाडा माझ्या डोळयांसमोर उभा राहिला. दिंडीदरवाजा उघडून पळून जाऊ या, असेही मनात आले. मी खरोखरच उठलो व अंगणातील दरवाज्याजवळ गेलो. आकाशातील प्रशांत तारे माझ्याकडे पहात होते. दरवाज्याजवळ मी उभा राहिलो; परंतु कडी काढण्याचे धैर्य होईना. मी रात्री कोठे जाऊ ? पोलीस पकडतील अशी भीती वाटे. शेवटी मी पुन्हा त्या घोंगडीवर येऊन बसलो.
गार वारा सुटला. मला थंडी वाजू लागली. ते थंडीचे दिवस होते. मी जमिनीवर निजलो व ती घोंगडी अंगावर घेतली. त्या फाटक्या घोंगडीने माझा थंडीपासून बचाव केला. या श्यामचा तिने सांभाळ केला. विचारात व चिंतेत मग्न असताना केव्हा तरी हळूच निद्रामाउलीने येऊन माझे डोळे मिटले. सकाळी मला उठवीपर्यंत मी त्या घोंगडीखाली-गोपाळ कृष्णालाही आवडणा-या त्या घोंगडीखाली-शांत झोपलो होतो.