श्याम 72
मी :- मी काही चोर नाही. मी एक अनाथ मुलगा आहे. मला येथे निजू द्या. मला नाही म्हणू नका. मी रात्री कोठे जाऊ ?
पुजारी :- वाटेल तेथे मसणात जा. येथून चालता हो. सतरा पंचायती नकोत. चावटच दिसतोस. ऊठ म्हटले तरी हालत नाहीस जागचा ! अकरा वाजायला आले.
मी :- तुम्हाला लहान मुलांची दया नाही का हो येत ? तुम्ही रामाचे पुजारी ? देव तर गरिबांवर दया करतो. मला हाकललेत तर त्या समोरच्या रामाला काय वाटेल ?
पुजारी :- लहान म्हणतोस परंतु गोष्टी तर पंडितांच्या सांगतोस. तू कोण आहेस ?
मी :- मी एक गरीब मुलगा आहे.
पुजारी :- ते समजलो. परंतु तुझी जात कोण ?
मी :- ब्राम्हण.
पुजारी :- येथे कोठून आलास ?
मी :- पुण्यास माझे मामा रहातात. त्यांच्याकडून मी पळून आलो.
पुजारी :- का पळून आलास ?
मी :- मला तेथे राहणे आवडत नाही. ते फार रागवतात.
पुजारी :- का रागवतात ?
मी :- त्यांचा स्वभाव म्हणून.
पुजारी :- तू वाईट नाही ना वागत ?
मी :- नाही.
तुझे घर कोठे आहे ?
मी :- कोकणात.
पुजारी :- मग तिकडे का जात नाही ?
मी :- येथे मी शिकण्यासाठी आलो आहे.
पुजारी :- आता कोणाकडे राहून शिकशील ?
जेवायला कोण वाढील ?
मी :- मी माधुकरी मागेन.
पुजारी :- परंतु राहशील कोणाकडे ?
मी :- तुमच्याकडे मला ठेवाल का ? मी खरेच माधुकरी मागेन. तुमच्या घरी मी काम करीन. मला ठेवा ना तुमच्या घरी. मला कोणी नाही. मला तुमच्या घरी घेऊन जा.
पुजा-याचे चित्त द्रवले. त्याच्या हृदयातील राम जागा झाला. त्याच्या डोळयांत करुणा दिसू लागली. तो रागीट चेहरा मृदू दिसू लागला. अंधारात उजेड आला. पशुत्वात माणुसकी आली.