Get it on Google Play
Download on the App Store

श्याम 146

२६.  दापोलीला रामराम

दापोलीहून राम गेला व श्यामही तेथून जावयास निघाला. राम गेल्यामुळे मला चैन पडेना हे खरे. ज्या वेळेस राम नाही तेथे कशाला रहा ? दापोलीच्या शाळेत पदोपदी मला रामची आठवण आल्याशिवाय राहिली नसती. या झाडाखाली आम्ही बसलो होतो, या झाडाखाली आम्ही आमचे भांडण मिटविले होते. या रस्त्याने आम्ही बोर्डिंगात जात असू. या मैदानात रामची आठवण येऊन मी एक दिवस रडत बसलो होतो. किती तरी स्मृतिचिन्हे, किती तरी भावबंधने तेथे होती !

राम पुण्याला गेला, आपणही चला जाऊ कुठे तरी, असे माझ्या मनात जोराने येऊ लागले. शाळेत शिकविण्यासाठी वडीलही कुरकुर करीत होते. दिवसेंदिवस मला फी वगैरे देणे त्यांच्या जिवावर येऊ लागले. 'तू नोकरी धर' असे ते मला म्हणू लागले होते. पंधरा-सोळा वर्षांचा श्याम नोकरी ती काय करणार ?

परंतु वडिलांवर विसंबून राहू नये, असे मला वाटू लागले. राम गेल्यापासून या प्रश्नाला माझ्या मनात जोराने चालना मिळाली. कोठे शिकण्यासाठी जावे, याचा मी विचार करु लागलो. तत्संबंधी माहिती मिळवू लागलो, जंजिरा येथे जावे, असे एकदा मनात आले. कोणी तरी माहिती सांगितली की, 'जंजि-यास हिवताप फार असतो.' म्हणून मी जंजि-यास जाणे तहकूब केले. दुसरी स्थाने, संस्थाने शोधू लागलो. एका मित्राने सांगितले की, 'औंध संस्थानात जा. औंध संस्थानात गरीब विद्यार्थ्यांस मोफत अन्न मिळते. तेथे संस्थानाचा पसोडा आहे. तेथून गरीब विद्यार्थी अन्न घेत असतात. श्याम तू तेथे जा. तेथे गेल्यावर सारी व्यवस्था होईल. आपल्या शाळेत मागे सखाराम दाते विद्यार्थी होता. तो तेथे आहे त्याचीही तुला मदत होईल. आणि तू काही कविता करतोस, त्यातील काही निवडक कविता औंधच्या महाराजांकडे पाठव. तुझ्या कविता पाहून ते तुला उत्तेजन देतील. ते कलांचे भोक्ते आहेत असे म्हणतात. नाहीतर औंधच्या महाराजांवर कर ना कविता, आणि दे त्यांच्याकडे पाठवून. खरेच छान होईल.'


मी म्हटले, 'माझ्या कविता त्या काय ? त्या कशाला कोणाकडे पाठवा ? आणि उगीच स्तुतिस्तोत्रे तरी कुणाची कशाला करा ? आपणाला ज्यांची माहिती नाही, त्यांची उगीच स्तुती करणे म्हणजे दंभ आहे. मी वाटेल तर साधा अर्ज पाठवितो.'

तो मित्र म्हणाला, 'समक्षच जाणे बरे. असा येथून अर्ज करण्यात अर्थ नाही.'

शेवटी मी औंधला जाण्याचे निश्चित केले. मी दापोलीस जवळजवळ चार वर्षे होतो. ती दापोली मी सोडणार होतो. दापोलीची ती शाळा, त्या टेकडया, ती माझी आवडती सुरुची घनदाट जंगले, ते सारे सोडणार होतो. दापोलीच्या शाळेत माझ्यावर प्रेम करणारे अनेक मित्र. त्यांना मी सोडून जाणार होतो. अनोळखी जगात मी जाणार होतो. दापोलीच्या शाळेत मी होतकरु विद्यार्थी, हुशार विद्यार्थी म्हणून मानला जात असे. मी या शाळेत खूप धिंगामस्तीही केली. नाना खोडयाही केल्या. मारामा-या केल्या. माझा हाच स्वभाव नवीन परकीय शाळेत राहील का ? असाच मोकळा, स्वच्छंदी, स्वाभिमानी, दोन घे दोन दे करणारा, चळवळया असा मी राहीन का ? तेथे मला कोण मित्र, कोण माझी बाजू घेईल ? तेथे मी एकटा असणार !

दापोलीची शाळा सोडणे माझ्या जिवावर येत होते. ज्या झाडाची मुळे चांगली खोल गेली आहेत ते झाड उपटून दुसरीकडे लावणे बरे नसते. मी माझ्या जीवनाचे रोपटे पुन्हा उपटून दुसरीकडे घेऊन जाणार होतो. तेथे ते जगेल का मरेल ! फोफावेल का खुरटेल ? कोणी सांगावे ?

श्याम

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
श्याम 1 श्याम 2 श्याम 3 श्याम 4 श्याम 5 श्याम 6 श्याम 7 श्याम 8 श्याम 9 श्याम 10 श्याम 11 श्याम 12 श्याम 13 श्याम 14 श्याम 15 श्याम 16 श्याम 17 श्याम 18 श्याम 19 श्याम 20 श्याम 21 श्याम 22 श्याम 23 श्याम 24 श्याम 25 श्याम 26 श्याम 27 श्याम 28 श्याम 29 श्याम 30 श्याम 31 श्याम 32 श्याम 33 श्याम 34 श्याम 35 श्याम 36 श्याम 38 श्याम 39 श्याम 40 श्याम 41 श्याम 42 श्याम 43 श्याम 44 श्याम 45 श्याम 46 श्याम 47 श्याम 48 श्याम 49 श्याम 50 श्याम 51 श्याम 52 श्याम 53 श्याम 54 श्याम 55 श्याम 56 श्याम 57 श्याम 58 श्याम 59 श्याम 60 श्याम 61 श्याम 62 श्याम 63 श्याम 64 श्याम 65 श्याम 66 श्याम 67 श्याम 68 श्याम 69 श्याम 70 श्याम 71 श्याम 72 श्याम 73 श्याम 74 श्याम 75 श्याम 76 श्याम 77 श्याम 78 श्याम 79 श्याम 80 श्याम 81 श्याम 82 श्याम 83 श्याम 84 श्याम 85 श्याम 86 श्याम 87 श्याम 88 श्याम 89 श्याम 90 श्याम 91 श्याम 92 श्याम 93 श्याम 94 श्याम 95 श्याम 96 श्याम 97 श्याम 98 श्याम 99 श्याम 100 श्याम 101 श्याम 102 श्याम 103 श्याम 104 श्याम 105 श्याम 106 श्याम 107 श्याम 108 श्याम 109 श्याम 110 श्याम 111 श्याम 112 श्याम 113 श्याम 114 श्याम 115 श्याम 116 श्याम 117 श्याम 118 श्याम 119 श्याम 120 श्याम 121 श्याम 122 श्याम 123 श्याम 124 श्याम 125 श्याम 126 श्याम 127 श्याम 128 श्याम 129 श्याम 130 श्याम 131 श्याम 132 श्याम 133 श्याम 134 श्याम 135 श्याम 136 श्याम 137 श्याम 138 श्याम 139 श्याम 140 श्याम 141 श्याम 142 श्याम 143 श्याम 144 श्याम 145 श्याम 146 श्याम 147 श्याम 148