श्याम 62
लहानपणापासून कुत्र्यामांजरांची मला भीतीच वाटे. कुत्रा चावला तर मनुष्य कुत्र्यासारखा होतो. कुत्र्यासारखा ओरडू लागतो, वगैरे गोष्ट लोक बोलावयाचे; त्याचाही तो परिणाम असेल. मी पुष्कळ प्रयत्नांनी ही भीती कमी केली आहे. माझे बहुतेक मित्र मांजराचे भोक्ते आहेत. मांजरे पांघरुणात घेऊन ते झोपावयाचे. शेजारच्या पांघरुणात मांजर आहे या जाणिवेने मला झोप येणे अशक्य होई. मांजराचे गुरगुरणे माझ्या कानात सारखे घुमत राहावयाचे.
मामांनी उशीर का होतो. असे विचारले की काही तरी सांगून मी वेळ मारुन नेत असे. मग दुस-या दिवसापासून पुन्हा त्या कुत्र्याच्या रस्त्याने, त्या पिराच्या रस्त्याने जावयाचा. पीर आला की, ओंकारेश्वराच्या हौदापर्यंत मी झपझप जावयाचा. मला ते रात्रीचे जाणे अजून आठवते आहे. खळग्यात तर नाही ना पडणार, कुत्रे तर नाही ना चावणार, तिकडून साप तर नाही ना येणार, पिराच्या जवळून भूत तर नाही ना येणार, हे सारे विचार मनात येऊन मी अगरी भांबावून गेलेला असावयाचा आणि घामाघूम होऊन व धडपड करणा-या छातीने त्या दूधवाल्याच्या घरात एकदम शिरावयाचा.
दूध घेऊन येताना तर फारच तारांबळ असावयाची. कारण दूध सांडेल या भीतीचीही आणखी एक भर पडे. मला माझी मनात खूप चीड येई; माझा तिरस्कार वाटे. भीती ही वस्तू माणसाला शोभत नाही. निर्भयता म्हणजे मोक्ष व भीती म्हणजे नरक, हे स्पष्ट आहे. ज्या राष्ट्रातील मुले भित्री असतील ती स्वतंत्र कशी होतील ? आपल्या राष्ट्रातील मुलांना लहानपणापासून घरीदारी, शाळेत निर्भयपणाचे शिक्षण दिले पाहिजे. आमच्या कुटुंबातून सर्वत्र भीतीचेच वातावरण मुलांभोवती उभारलेले असते. नळावर जाऊ नको, पडशील; पाण्यात पाय बुडवू नको, भिजशील; पावसात जाऊ नको, पडसे येईल; झाडावर चढू नको, पडशील; पाण्यात पाय बुडवू नको, बुडशील; सायकलवर बसू नको, गर्दी असेल; एकटा जाऊ नको, चुकशील; चाकू नको घेऊ, हात कापशील; दिवा उचलू नको, पाडशील; चुलीजवळ बसू नको, भाजशील; सारे नकार मुलांच्या कानात घुमत असतात. इंग्लंडमधील कोणत्या तरी एका मुलाची गोष्ट सांगतात की, एकदा त्याला कोणी विचारले, 'बाळ तुझे नाव काय ? तर तो मुलगा म्हणाला 'डोन्ट (Dont)" त्याला सारखे 'हे नको करु ते नको करु' हे सांगण्यात येत असे. 'हे नको करु' हेच माझे नाव, असे त्या मुलाने सांगितले. पाहुण्याचे मुलाचे उत्तर ऐकून आईबापांकडे पाहिले. आईबापांचे चेहरे फोटो घेण्यासारखे झाले होते.
मुले उपजत भीतिग्रस्त नसतात. परंतु आपण त्यांना तशी बनवितो. मुलांच्या आत्मचंद्राला भीतीचे ग्रहण लागणार नाही, यासाठी फार दक्षता घेणे जरुरीचे आहे, इकडे शिक्षकांचे, पालकांचे, राष्ट्रातील लोकांचे जितके लक्ष जाईल तितके थोडेच !