श्याम 122
एक दत्तू नावाचा मुलगा एकदम म्हणाला, 'क्षमा वगैरे नको मागायला. असा बावळटपणा मला नाही पसंत. एकदा क्षमा मागण्याचा पायंडा पडला म्हणजे नेहमी तेच शुक्लकाष्ठ आमच्या सर्वांच्या मागे लागावयाचे. नसत्या उठाठेवीत आपण पडू नये. प्रकरण मिटले आहे. एक प्रकारे आपला विजय झाला आहे. मला कोणी दहा छडया मारल्या, चार आणे दंड केला तरी परवडेल; परंतु नाक घासण्याची मला अत्यंत चीड आहे. जरी माझे हे असे मत असले तरी आपल्या वर्गात बहुमताने जे ठरेल ते पाळीन. सवतासुभा निर्माण करुन माझा स्वतंत्र पक्ष अभिमानाने निराळा काढून आपल्या वर्गाचे स्पृहणीय व अधिका-यांच्या डोळयांत खुपणारे ऐक्य मी मातीत मिळवणार नाही. आज तीन वर्षे आपण ऐक्य निर्माण करीत आलो ते एका क्षणात आततायीपणाने मी मोडणार नाही.'
दामोदर वैद्य म्हणाला, 'मी या बाबतीत स्वतंत्र वृत्तीचा आहे. नाक घासण्याचा सभेचा ठराव बहुमताने पास झाला तरी ते बहुमत मी मानणार नाही. स्वाभिमान हा महाराष्ट्राचा प्राण आहे. महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा मी राखीन. श्रीसमर्थांची शिकवण माझ्या रोम-रोमात भरलेली आहे.'
शंकर पतंगे म्हणाला, 'महाराष्ट्राचा अभिमान आम्हालाही थोडाफार समजतो. महाराष्ट्रातील हे उंच डोंगर, हे उंच पर्वत सांगत आहेत की, मन उंच ठेवा. विचाराने उंच रहा. क्षमा मागणे यात कमीपणा नसून उलट आपल्या मनाचा तो मोठेपणा आहे. मनाने मोठे होण्याची संधी वारंवार येत नसते.'
शिवराम पटवर्धन म्हणाला, 'पतंग्याचे मन पतंगाप्रमाणे आकाशात उंच जात आहे; परंतु आपले पाय पृथ्वीवर असतात, हे विसरुन चालणार नाही. व्यवहार पाहिलाच पाहिजे.'
पुष्कळ भवती न भवती झाली. मुलांनी विचारले, 'आपल्या वर्गनायकाचे मत काय आहे ? त्याचा सल्ला समतोल असावयाचा. परशुरामभाऊ, परशुरामपंत बोला,' असे मुले म्हणू लागली. वीरवर, मुत्सद्दी व व्यवहारचतुर वर्गनायक परशुराम उभा राहिला. तो म्हणाला, 'आपण क्षमा मागावी; परंतु मी सांगतो त्या पध्दतीने मागावी. आम्हा विद्यार्थ्यांचे तासाला गैरहजर राहण्यात थोर नीतिदृष्टया काही चुकले आहे, असे आम्हाला वाटत नाही; परंतु आपल्या मनाला जर त्रास झाला असेल तर त्यासाठी म्हणून आम्ही क्षमा मागतो. क्षमा मागा असे कोणीही शिक्षकाने वि अधिका-याने आम्हास आज्ञापिले नाही. आमचे आम्ही मुलांनी सर्वानुमते ठरविले आहे.'
"शाबास परशुराम !' एक जण म्हणाला. 'नाक खाली म्हटले तर वर आहे आणि वर आहे म्हटले तर ते तसे खालीही आहे.' 'आपला वर्गनायक म्हणजे आपल्या वर्गातील राजनीतीचा आधार आहे. स्वराज्यात परराष्ट्रीय मंत्री म्हणून परशुरामपंत चांगली जागा भरुन काढतील,' असे दुसरी काही मुले म्हणू लागली. शेवटी ठरल्याप्रमाणे त्या शिक्षकांचा तास जेव्हा परत आला तेव्हा तो अर्ज गैरहजर राहिलेल्या मुलांच्या सह्यानिशी वर्गनायकाने शिक्षकांच्या हाती दिला. ते शिक्षक जरा स्मित करुन म्हणाले, 'तुम्ही वर्गात न बसता जरा स्वतंत्र वृत्ती दाखविली याचे मी माझ्या मनात कौतुकच केले होते. तुम्हाला तास कंटाळवाणा वाटत असेल याची जाणीव व खंत सर्वाआधी मला होती; परंतु मी तरी काय करणार ! असो. परंतु कंटाळवाण्या तासालाही शिस्त म्हणून बसा. आपल्या राष्ट्राला शिस्त शिकावयाची आहे. तुम्ही माझ्या तासाला सायन्स न शिकलेत तरी संयम शिकाल. आणि जे संयम शिकले ते पुष्कळच शिकले यात संशय नाही.'
आमच्या वर्गातील पुष्कळ मुले हळूहळू तपकीर ओढू लागली. वर्गात दोघातिघांजवळ तपकिरीच्या बाटल्या होत्या. त्या बाटल्या सर्व वर्गात फिरत. मुले फटाफट शिकत. शिंकांची साथ पाच मिनिटांपूर्वी उजव्या बाजूस असे; तर दुस-या पाच मिनिटांत डाव्या बाजूस पसरे. दोहोंकडची साथ शमलीसे वाटावे तो वर्गातील मध्यप्रांतात ती सुरु होई. मी काही तपकीर ओढीत नसे. परंतु आपणही काही पराक्रम करावा, असे माझ्यातील आनुवंशिक वानरसंस्कारास वाटले. एके दिवशी मी जरा खोकू लागलो. शिक्षकांनी माझ्याकडे पाहिले. मी अधिकच खोकू लागलो. खोकून कावराबावरा झालो असे दाखविले. शिक्षकही जरा घाबरले. ते एका मुलाला म्हणाले, 'थोडे पाणी आणून श्यामभाऊंना द्या.' एक मुलगा खरेच गेला तो पाणी घेऊन आला. मी पाणी प्यायलो, डोळयांना पाणी लावले. तो कासविक्रम सा-या शाळेत प्रसिध्द झाला. वर्गातील मुले तास संपल्यावर म्हणाली, 'श्याम, आज तू मात्र कमाल केलीस. वर्गाच्या कीर्तीत भर घातलीस.' श्याम म्हणाला, 'तुमच्या शिंकांनी मला स्फूर्ती दिली. शिंकांची हिप् हिप् हुर्रे !'
पुष्कळ वेळा मुले गुलाबाची, सोनचाफ्याची फुले घेऊन येत आणि आपापल्या प्रिय व पूज्य शिक्षकांस देत असत; परंतु काही शिक्षक असे असत की, त्यांना कधीच फूल मिळत नसे. एके दिवशी एका मुलाने गुलाबाचे सुंदर फूल आपल्या बटनहोलमध्ये लाविले होते. तो शाळा सुरु होता क्षणीचा पहिलाच तास होता. शिक्षक आले. ते शिक्षक जरा खुनशी म्हणून प्रसिध्द होते. हसताना फारसे कधी त्यांना कोणी पाहिले नव्हते. पहिली घंटा होताच ते वर्गात येऊन बसत; परंतु मुले वर्गात कोणीच नसत. दुस-या घंटेची वाट पहात मुले बाहेर घुटमळत असावयाचीच. स्वातंत्र्याचा प्रत्येक मोलवान क्षण आम्ही वाया दवडीत नसू. त्या क्षणाचा आम्ही संपूर्णतया उपभोग घेत असू.