श्याम 116
मी म्हटले, 'हो.'
गंगूने ते फळ आणले. किती सुंदर दिसत होते ! लालसर रंग होता व त्यात क्वचित फिकट हिरव्या रंगाची छटा होती. त्या फळाकडे आम्ही दोघे पहात राहिलो. ते सुंदर फळ फोडून या पोटात ठेवण्याची इच्छा मला होईना.
मी म्हणले, 'असे सुंदर फळ फोडून का खायचे ?'
गंगू म्हणाली, 'ती खाण्यासाठीच आहेत. खाल्ली गेल्यानेच फळे कृतार्थ होतात. मला कोणी गुलाबाचे फूल दिले तर ते मला केसात घालावयाला आवडत नाही. मी ते खाऊन टाकते. जे चांगले दिसेल त्याला मी पोटात ठेवीन.'
मी म्हटले, 'गुलाबाच्या फुलाला मी दुरुनच नमस्कार करीन. माझ्या हाताने ते मळेल, कोमेजेल असे मला वाटते.'
गंगू म्हणाली, 'जे चांगले आहे, पवित्र आहे, रसाळ आहे त्यांच्यापासून का दूर रहावे ? हे हृदयाशी धरावे, डोक्यावर धरावे, पोटात साठवावे. हे बघ, मी फोडते हो !' असे म्हणून गंगूने रामफळ फोडले. त्यातील मोठा भाग तिने मला दिला. लहान भाग तिने खाल्ला.
मी विचारले, 'गंगूताई, तू लहान भाग का घेतलास ?'
गंगू म्हणाली, 'तुझ्यापेक्षा मोठी आहे म्हणून. तुझ्या अक्काने असेच केले असते.'
मी म्हटले, 'हो. मागे अक्काच्या नव-याने मोसंबी आणली होती. तिने दोनच फोडी खाल्ल्या व बाकीचे सारे तिने मला दिले. लहान असणे एकंदरीत चांगले.'
गंगू म्हणाली, 'श्याम तू लहान रहा. मोठे झाले की खोटे झाले.'
त्या दिवशी रात्री गंगू जाणार होती. सायंकाळी मी तिच्याकडे जेवावयाला गेली होतो. दिगंबर, गंगू व मी तिघे एकदम जेवायला बसलो होतो. गंगूच्या आईने गंगूला दही वाढले. कोंढीतील दही हलवून वाढवताना एकदम सारेच गंगूच्या पानात पडले. गंगूने पानातील दही एकदम उचलून माझ्या पानात पण वाढले.
गंगूची आई म्हणाली, 'हे काय गंगू ! त्याची मुंज झालेली आहे !'
गंगू म्हणाली, 'लग्न नाही ना झाले पण ? श्याम लहानच आहे व लहानच राहो. म्हणजे पुन्हा मी आल्ये तर असेच दही त्याला वाढीन. श्याम लहानच रहा बरे का.'
जेवणे झाली. गंगूची गाडी आली. वळकटी मी नेऊन ठेवली. गाडीत दिगंबर बसला. गंगू बसली. मी पण गाडीत असतो. मी गाव संपताच उतरणार होतो. गाडी निघाली. गंगूची आई दिसेनाशी झाली. रात्रीची वेळ होती. नगरपालिकेचे दिवे दूर दूर अंतरावर मिणमिण करीत होते.
गाडीत कोणी बोलले नाही. न बोलता सारी बोलत होती. हुंदक्यांची व श्वासोश्वासाची भाषा तेथे चालली होती. भावना व विचार एकमेकांना कळवितांना भाषेचे वाहनही शेवटी निरुपयोगी व बोजड वाटू लागते.
दिगंबर म्हणाला, 'श्याम ! उतर. तुला एकटयाला घरी परत जावयाचे आहे. पायातही काही नाही. हातातही काही नाही. ना लाठी ना दिवा.'
गंगूने माझ्या पाठीवरुन हात फिरवला व मी खाली उतरलो. बैलांचे ओझे कमी झाल्यामुळे ते एकदम पळू लागले; परंतु माझ्या हृदयावरील दु:खाचे ओझे वाढले व माझ्याने हलवेना, चालवेना ! मी तेथेच 'क्षणे तिवाटा रचिल्या तिघात' असे करणा-या त्या तिठयाजवळ उभा होतो. शेवटी जड अंत:करणाने मी माघारा वळलो.
थोडयाच दिवसांनी दिगंबराची बदली झाली. थोडयाच महिन्यांनी मीही दापोली सोडली. कितीतरी वर्षांत मला गंगूचे स्मरणही झाले नाही. त्यानंतर दिगंबर व त्याची आई, त्याची बहीण कोणी मला भेटली नाहीत. तुम्ही मला माझ्या सर्व आठवणी विचारता व मी माझ्या सर्व गतजीवनाच्या तळाशी बुडया मारीत आहे. किती गोड प्रसंग, किती सहानुभूती किती भावोत्कटता ! गंगू म्हणजे निर्मळ भावगंगा होती.'