श्याम 117
२३. वर्गातील व शाळेतील मौजा
शाळा म्हटली म्हणजे अनेक गमती डोळयांसमोर उभ्या राहावयाच्या. कोणालाही आपले शाळेतील दिवस आठवावयास सांगा; म्हणजे हसावयास लावणारे व रडावयास लावणारे प्रसंग त्याला आठवल्याशिवाय राहणार नाहीत. मुलांनी केलेले अनेक खोडसाळपणाचे प्रकार आठवून क्षणभर मौज वाटेल. शाळा म्हणजे अनेक वृत्तींच्या भिन्नभिन्न स्वभावांच्या माणसांचे एक प्रदर्शनच असते.
आम्हाला एक शिक्षक होते. ते शिकविणारे होते चांगले, परंतु ते मुलांना वाटेल ती नावे ठेवावयाचे. कोणाचे नाव पी.जी.असेल तर ते 'पाजी' अशी त्याला हाक मारावयाचे. शब्दांवर कोटया करण्याची त्यांना सवयच असे. त्यांचे अनुकरण मग मुलेही करीत. शाळेच्या नावावरही मुले अश्लील टीका करत. ज्या शाळेत आपण शिक्षण घेतो त्या शाळे-बद्दल असे शब्द विद्यार्थ्यांच्या तोंडून बाहेर पडणे निंद्य होते; परंतु अलीकडे अलीकडे शाळांबद्दल मुलांना आपलेपणा क्वचितच वाटतो. शाळेबद्दल अभिमान ही वस्तू नाहीशीच होत चालली आहे. शाळेबद्दल कृतज्ञताही दिसत नाही. जेथे आपण पशूचे माणूस झालो. माकडाचे विचार करणारे मानव झालो, त्या शाळेबद्दल मातेसाठी वाटते तशी पूज्यबुध्दी वाटावयास पाहिजे; परंतु तशी का बरे वाटत नाही ?
शाळेतील शिक्षकांनाच शाळेबद्दल आपलेपणा नसतो तर तो विद्यार्थ्यांना तरी का वाटावा ? शिक्षकाला वाटत असते- 'मी या वर्षी येथे आहे' कायम झालेले शिक्षक फारच थोडे असतात. जून-जुलैत घ्यावयाचे व मार्चअखेर हाकलून द्यावयाचे. असेच शिक्षक बरेच असतात. असे फुटबॉलप्रमाणे फेकले जाणारे शिक्षक आपले हृदय त्या शाळेतील कामात काय म्हणून ओततील ? ही शाळा आपली आहे, असे जेव्हा त्यांना वाटेल त्या वेळेसच त्या शाळेच्या कामात तन-मन-धनाने ते पडतील. त्या वेळेसच मुलांच्याही मनावर शाळेबद्दल आपुलकीची भावना ते उमटवू शकतील.
शिवाय शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांचा प्रत्यक्ष परिचय फारसा होत नाही. शिक्षकांच्या निकट सान्निध्यात आल्याशिवाय
खरे जिव्हाळयाचे संबंध जडत नाहीत. जेथे छात्रालये शाळांना जोडलेली आहेत तेथे अशा प्रकारचे काही जिवंत संबंध जोडता येतात; परंतु अन्यत्र तसे काही एक होत नाही. विद्यार्थ्यांशी संबंध जडावयास शिक्षकाजवळ भरपूर ज्ञान तर हवेच; परंतु ज्ञानालाही अलंकृत करणारे थोर हृदय हवे. शिक्षकाला कळवळ हवी. तो ध्येयवादी असावा. अशा शिक्षकाला मुलांच्या जीवनात, मुलांच्या हृदयात शिरता येते. परंतु हे जाऊ दे सारे. मी तुम्हाला गुंडोपंत नावाच्या शिक्षकाबद्दल गमती सांगत होतो. एखादे वेळेस एखादा मुलगा एक-दोन दिवस रजेशिवाय गैरहजर राहून जर शाळेत आला तर गुंडोपंत विचारायचे, 'काय रे पोरा, काल परवा कोठे होतास ?' मुलगा उत्तर देई, 'घरी होतो.' मग गुंडोपंत म्हणावयाचे, 'अरे घरी होतास हे माहीत आहे. कोठे रानात असतास तर येथे कशाला पुन्हा येतास तोंड दाखवायला ? वाघाने खाऊन टाकले असते तुला,' एखादा मुलाचे जर काही चुकले तर ते रागावून म्हणत, 'कोणा मुलाला शब्दाचे स्पेलिंग नाही आले तर ते त्याला सांगत, 'हे बघ, आता घरी जा, एक भला मोठा जांभ्या दगडाचा टेंगळा-टेंगळाचा चिरा घे. शब्द एकदा घोक व आपट त्या चि-यावर डोके असे ब-याच वेळा कर; म्हणजे शब्द डोक्यात कायमचा बसेल. समजलास ना !'
आमच्या वर्गात आठवले म्हणून एक मुलगा होता. तो फार गंमत करावयाचा. त्याला छडी मारण्यासाठी म्हणून गुंडोपंत टेबलाजवळ बोलावीत. आठवले टेबलाजवळ उभा राही. गुंडोपंत म्हणत, 'हात कर पुढे !' आठवल्याचा हात पुढे होई. परंतु छडीचा धाव आता बसणार इतक्यात तो आपला हात मागे घेई. आपला हात तो शिताफीने मागेपुढे करावयाचा व छडी चुकवायचा. शेवटी गुंडोपंत हसू लागत. सारा वर्ग हसू लागे. शेवटी आठवल्याचा हात एका हाताने धरुन मग त्यावर गुंडोपंत छडी मारीत. 'लागते सर, फार लागते.' असे आठवले म्हणावयाचा. 'मग लागण्यासाठीच छडी असते. ती काही गमतीसाठी नसते. चांगली आठवण रहावी म्हणून ती असते.' असे गुंडोपंत म्हणत.