श्याम 141
'जा, जागेवर जाऊन बस' मला सांगण्यात आले. मुलांनी प्रेमाने मला जागा दिली. मी जागेवर जाऊन बसलो; परंतु अश्रू मला आवरत नव्हते. मला अश्रू पुसावयास मजजवळ रुमालही नव्हता. माझ्या सुजलेल्या हातांनी मला अश्रू पुसवतही नव्हते. मी माझ्या नेसूच्या पंचानेच माझे अश्रू बावळटाप्रमाणे व गावंढळाप्रमाणे पुशीत होतो. शेजारच्या मुलाने आपला स्वच्छ रुमाल हळूच मला दिला व तो म्हणाला, 'श्याम ! याने नीट पूस डोळे. घे.' मला सहानुभूती दाखविण्यासाठी मुलांच्या मनात अपार इच्छा होती. ती सहानुभूती कशी प्रगट करावी, हे त्यांना समजेना. माझे हात पाहण्यासाठी ती अधीर होती. दोन गोड शब्द बोलण्यासाठी त्यांचे ओठ उतावीळ झाले होते. त्यांची हृदये अभ्यासात नव्हती. माझ्याभोवती त्यांची हृदये, त्यांचे डोळे घुटमळत होते; परंतु शिक्षक तशा वातावरणात अभ्यास घेऊ लागले ! शिस्त प्राणहीन व भावहीन असते. शिस्त म्हणजे निर्जीव यंत्र. शिस्त स्वत:निर्जीव असते व शिस्त पाळणा-यालाही ती निर्जीवच करते. सर्वत्र विवेक हवा.
मला मार मिळत असता राम वर्गात नव्हता. त्या दिवशी तो उशिरा शाळेत आला. तो कठोर देखावा रामला पहावा लागला नाही. शाळेत आल्यावर अर्थातच सारा वृत्तान्त त्याला कळला. मी स्तब्ध बसलो होतो. कोणाशी बोलत नव्हतो. शेवटी एकदाची मधली सुट्टी झाली. वर्गातील सारी मुले येऊन माझा हात पाहून गेली. 'श्याम ! शाबास तुझी ! तू हू का चू केले नाहीस.' अशी शाबासकीही कोणी देत होते. कोणी माझा हात आपल्या हातात घेत, तो कुरवाळीत व दु:खी होऊन निघून जात.
अनेक मुले आली. इतर वर्गातील मुलेही सहानुभूती दाखवून गेली; परंतु मी एकाची वाट पहात होतो. श्याम रामची वाट पहात होता. रामच्या तोंडातील सहानभूतीच्या एका शब्दाने मी माझे अनंत दु:ख विसरुन गेलो असतो. ज्याच्यावर आपण प्रेम करतो, त्याचा एक दृष्टिक्षेप, त्याचा एक शब्द, त्याचा एक स्पर्श, याच्यात जगातील सारी मलमे येऊन जातात. सारी व्रणविरोपणे येऊन जातात. राम येतो का मी पहात होतो. मी एका झाडाखाली जाऊन बसलो. छाया देणा-या त्या शीतल वृक्षाखाली जाऊन बसलो. माझे डोळे रामच्या येण्याची वाट पहात होते.
येतो का तो दुरुन । बघा तरि येतो का तो दुरुन ।।
येतो का मम जीवनराणा
येतो का मम अंतरराणा
हृदय येइ गहिवरुन । बघा तरि. ।।
केवळ त्याच्यासाठी जगलो
केवळ त्याच्यासाठी उरलो
प्राण कंठि हे धरुन । बघा तरि. ।।
रडुनी रडुनी त्याच्यासाठी
वाट बघुनी त्याच्यासाठी
डोळे गेले सुजून । बघा तरी. ।।
येताची मम जीवनराणा
ओवाळूनिया पंचप्राण
टाकिन त्याचेवरुन । । बघा तरि. ।।