श्याम 8
ती तरी काय सांगणार बिचारी ! सारे प्रयत्न ती करीत होती. कढत पाणी घेऊन माझे चिकटलेले डोळे ती सकाळी सोडवावयाची. माझा फडका धुऊन द्यावयाची. 'श्याम ! रडू नकोस. रडून डोळे जास्त होतील.' असे सांगावयाची. होता होता मला अजिबात दिसत नाहीसे झाले. सारी मंडळी घाबरली. शेवटी मुंबईस मामांकडे मला पाठविण्याचे ठरले.
मला काही दिसत नव्हते. हात धरुन मला बोटीत चढविण्यात आले. मी मुंबईला आलो. माझे दोन मामा मुंबईस होते. एकाच लग्न झाले होते. एकाचे व्हावयाचे होते. दोघांना नोकरी होती.
मामांनी मला हात धरुन डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांकडे किती तरी गर्दी होती ! मुंबईचे डॉक्टर ते. त्या दिवशी शेवटी डॉक्टरांची गाठ नाहीच पडली. आम्ही माघारी आलो. 'देवा ! कर ना रे माझे डोळे बरे !' मी मनात म्हटले.
दुस-या दिवशी डॉक्टर भेटले. त्यांनी डोळे तपासले. डॉक्टर काही बोलले नाहीत. माझ्या डोळयांत त्यांनी औषध घातले. डॉक्टर फार गर्दीत होते. ते गेले. मामांनी काही विचारले नाही.
मी घरी एकटास बसे. शेजारची मुले खेळत. मला खेळावयास जाता येत नसे. मला त्यांचा हेवा वाटे. शेजारी मुले गोष्टी वाचीत. मला वाटे आपण केव्हा गोष्टींची पुस्तके वाचू, त्यांतील चित्रे पाहू ! डोळे केव्हा बरे होणार !
एके दिवशी मामांनी डॉक्टरांना विचारले, 'डोळे सुधारतील की नाही ?' डॉक्टर म्हणाले, 'डावा डोळा सुधारेल. परंतु उजवा डोळा अधूच राहील. बरेच दिवस औषध घालावे लागेल. डोळयांची पुष्कळ दिवस आबाळ झाली आहे. तुम्ही लौकर आले असते तर एकाही डोळयात दोष राहाता ना; परंतु तुम्ही आधी निजता व मग धावाधाव करता !'
डॉक्टरांचे शब्द ऐकून मला धीर आला. 'मी आंधळा झालो तर माझे कसे होईल.' याचे मला भय वाटत असे. नेहमी मला कोप-यात बसावे लागेल असे मनात येई. 'डोळे सुधारतील' ही डॉक्टरांची वाणी मला अमृताप्रमाणे गोड वाटली. निदान एक तरी डोळा चांगला होईल. काही हरकत नाही. खरेच डोळा म्हणजे केवढी अमोल वस्तू. या डोळयांची किंमत कोण करील ? तुम्हांला ती फकिराची गोष्ट माहित आहे का ?'
राम म्हणाला, 'नाही. सांगा ती गोष्ट.'
सारे हसले.
श्याम म्हणाला, 'नसणारच माहीत; ऐका तर ती गोष्ट.'
एकदा एक फकीर 'देवाने मला काही दिले नाही,' असे ओरडत रस्त्याने चालला होता. हिंडता हिंडता तो राजवाडयाजवळ आला. राजाने ते फकिराचे शब्द ऐकले. तो राजा आंधळा होता. राजा प्रधानाला म्हणाला,
'प्रधानजी ! त्या फकिराला माझ्यासमोर बोलावून जाणा.' शिपाई धावले व त्या फकिराला घेऊन ते राजापाशी आले.