श्याम 143
"हो.' मी म्हटले.
"तुम्ही रामला कवितात पत्र लिहीत असा. तेच ना तुम्ही ?'
"हो.'
ती व्यक्ती पुन्हा अंतर्धान पावली; परंतु सतरंजी घेऊन बाहेर आली.
"हिच्यावर बसा.' मला सांगण्यात आले.
"पाणी पाहिजे का ?' मला विचारण्यात आले.
"नको' मी म्हटले.
अंगणात चिमण्या चिंव चिंव करीत होत्या. मला चिमणीचे चित्र आठवले. आम्हा दोघां जिवांची मैत्री जोडणारी ती चिमणी. तेथे एक कोळशाचा तुकडा पडला होता. मी तो घेतला व तेथे जमिनीवर चिमणीचे चित्र काढू लागलो. हे राम पाहील. ही रेखाचिमणी रामजवळ सारे सारे बोलेल. ते चित्र म्हणजे माझे पत्र होते; परंतु त्या पत्राची भाषा कोणाला समजली असती ?
परमेश्वर प्रत्यही आपणास पत्रे पाठवितो. रंगीबेरंगी लिफाफ्यांची पत्रे. नाना रंगाच्या शाईत लिहिलेली पत्रे. परमेश्वरासारखा प्रचंड पत्रलेखक कोण आहे ? फुले, पाखरे, मेघ, तारा, वारे, नद्या, झरे, समुद्र, लाटा, नवपल्लव ही सारी परमेश्वराचीच पत्रे आहेत. परंतु कोण वाचणार ? कोणाला ही भाषा समजणार ? हिरवे हिरवे गवत पाहून व्हिटमन् कवीला वाटले की, हा देवाचा हातरुमाल पडला आहे. त्या हातरुमालावरच देवाचे नाव घातलेले त्याला दिसले; परंतु आणखी कोणाला दिसले का ?
माझ्या चिमणीच्या चित्रातील, चिमणीच्या पत्रातील भाव कोणाला समजला असता ? केवळ रामच जाणता; परंतु राम येईपर्यंत हे माझे चित्र राहील का ? ते पायांनी पुसले तर नाही जाणार ? त्या चित्राच्या रुपाने जे दु:खी हृदय मी तेथे ठेवून जात होतो ते कोणी कुसकरणार तर नाही ? कोळशाने काढलेले चित्र ! रामचे भाऊ हसतील. मला म्हणतील. मी ते चित्र पुसून टाकले. आपल्या चित्राची उपेक्षा होण्यापेक्षा ते पुसून टाकलेले काय वाईट ?
मी तेथून निघालो. माझ्या डोळयांतून पाणी गळत होते. लोक हसतील म्हणून मी ते पटकन् पुसून टाकीत होतो. राम कदाचित वाटेत कोठे भेटेल, अशी भीती मला वाटत होती. राम भेटू नये, असेच मला वाटत होते. रामला नकळत त्याची प्रेमपूजा करावी, असे मला वाटत होते. देवाला नकळत त्याला फूल वाहून जाण्यात, त्याच्या मंदिरात बसून जाण्यात एक प्रकारची विशेष गोडी आहे.
सायंकाळ होत आली तरी त्याचे मला भान नव्हते. मी मैदानात एके ठिकाणी बसलो. बाहेर अंधार पडू लागला. मैदान गार गार होऊ लागले; परंतु प्रेमाची ऊब रोमरोमांत भरलेल्या मला त्या गारठयाचे भानच नव्हते. त्या गार होणा-या जमिनीला मी माझी ऊब देत होतो. वरती काळयासावळया आकाशात दीपावली लागल्या. देवाच्या घरी सदैव दिवाळी रवी, शनी, तारे सदैव तेवतच आहेत; परंतु या दिवाळीत आपण ठेवतो का ? आपला लहानमोठा दिवा घेऊन यात सामील होतो का ? प्रभू म्हणतो, 'माझ्या घरी दिवाळी आहे. तुम्हीही आणा आपापले दीप. माझ्या घरी अनंत संगीत अखंड चालले आहे. तुम्हीही आणा आपापली गाने, आपापली गीते, आपापल्या तारा. माझ्या या संगीतसिंधूत तुमचाही संगीत-बिंदू मिसळा.' परंतु कोण उठतो, कोण दिवा लावतो, कोण गुणगुणतो ?