श्याम 15
'मामांची का बरे भीती वाटते ?' माधवरावांनी डोक्यावरुन हात फिरवीत विचारले.
'मामा शिकवतात, हिशेब घालतात म्हणून' मी सांगितले.
'मी सुध्दा तुला प्रश्न विचारतो. मग माझी का नाही भीती वाटत ?' त्यांनी विचारले, 'तुम्ही चूक झाली तरी रागावत नाही. तुम्ही घाबरवीत नाही. मामा वस्कन् अंगावर येतात. मी घाबरतो.' मी चुकलो तर तुम्ही हसून म्हणता 'वेडया ! अरे असे नाही. तुमची भीती वाटत नाही. खरेच नाही.' मी माधवरावांकडे पहात म्हटले.
माधवरावांनी मला जवळ घेतले. इतक्यात मामा बाहेरुन आले. माधवराव मामांना म्हणाले, 'गणपतराव ! तुम्हाला एक गोष्ट सांगू का ? आज मी एक शोध लावला आहे.' मी माधवरावांच्या कानात 'नका ना सांगू, नका ना' असे सांगत होतो.
'श्याम सांगू नका असे मला म्हणतो आहे ! अरे मामांचीच फजिती होईल. गणपतराव ! श्याम रोज झोपेचे सोंग घेऊन पडतो. इतक्या लौकर त्याला काही झोप येत नसते. तुम्ही शिकवाल म्हणून तो भितो. मामा एकदम अंगावर येतात, असे तो म्हणाला. तुम्ही त्याला घाबरवता. अस्वल, वाघ होऊन श्यामला शिकवू नका, हसत खेळत शिकवा. मी तुमच्या वतीने श्यामला तशी कबुली दिली आहे.' माधवराव म्हणाले.
मामा मला जवळ घेऊन म्हणाले, 'वेडया ! मी का तुला मारीन ? माझा तो स्वभाव आहे. माझ्या धाकाने अंथरुणात गुदमरत नको जाऊ. मी वाटले तर शिकवणार नाही. शेजारी शास्त्रीबुवांजवळ जाऊन गोष्टी ऐक समजलास ना ?'
इतक्यात मामीने मला आंघोळीस बोलाविले व मी निघून गेलो; परंतु मामा माधवरावांस म्हणाले ते शब्द कानावर आलेच. मामा म्हणाले, 'माधवराव ! तू मुलांच्या पोटात शिरतोस, आम्हांला ते जमत नाही, प्रेमाची किल्ली घेऊनच मुलांच्या हृदयात शिरले पाहिजे. आडदांड पक्ष्याला कोमल फुलांतील मध चाखता येणार नाही. ते काम गूं गूं करणा-या भुंग्यांनाच साधेल; नाचत नाचत येऊन हळूच बसणा-या फुलपाखरांनाच साधेल.'