श्याम 103
गंगू म्हणाली, 'माझ्या हातात काय आहे ओळख.'
मी म्हटले, 'ओळखले तर काय देशील'
गंगू म्हणाली, 'काय देऊ ?'
मी म्हटले, 'तुझ्या हातात असेल ते दे.'
गंगू म्हणाली, 'हातात विंचू असला तर ?'
मी म्हटले, 'हातात विंचू धरशील का ? तू का जादुगारीण आहेस ? हातात विंचू नाहीच मुळी.'
गंगू म्हणाली, 'पण समज असला तर ?'
मी म्हटले, 'मग तो मलाही दे. जो विंचू तुझ्या हातांना चावला नाही तो का माझ्या हाताला चावेल ? माझा हात का पापी आहे ?'
गंगू म्हणाली, 'तूच सांगत होतास की, पुण्यास मामांकडे दत्ताच्या पोथीतील पैसे चोरले म्हणून. देवाजवळचे पैसे चोरणारा हात का पुण्यवान ?'
मी म्हटले, 'पण त्यासाठी मी रडलो आहे.'
गंगू म्हणाली, 'तू रडयाच आहेस. मला नाही रडणारे कोणी आवडत.'
मी म्हटले, 'मग हाक कशाला मारलीस ? नाही आवडत तर नाही. तुझ्या आईला तर आवडतो ?'
गंगू म्हणाली, 'माझ्या आईलाही तू आवडत नाहीस. आई परवा म्हणत होती की, श्याम अगदी-वाईट आहे.'
मी रडू लागलो. दिगंबराची आई चुलीजवळ होती. ती गंगूला रागे भरली व म्हणाली, 'का ग त्याला रडवतेस ? उगी हो श्याम.'
गंगू म्हणाली, 'रडणा-या मनुष्याला माझ्या हातात वस्तू आहे तशी देतात. आता तरी सांग.'
मी म्हटले, 'खाऊ आहे काहीतरी !'
गंगू म्हणाली, 'पण कसला खाऊ ?'
मी विचारले 'लाडू आहे का वडी आहे ?'
गंगू म्हणाली, 'वाटोळे नाही; पण चौकोनी आहे !'